नवीन लेखन...

आहारातील बदल भाग ७ -शाकाहारी भाग दोन

शाकाहारी प्राण्यांचा जबडा आगदी आ वासून उघडत नाही. (अपवाद पाणघोडा ) थोडासाच उघडतो, पण यांचा खालील जबडा वर खाली तर होतोच, पण आजुबाजुला पण हलतो. रवंथ करायचे असते ना. तुकडे करून गिळायचे असतील तर जबडा मोठ्ठा उघडावा लागतो, पण छोटे छोटे घास करीत चावून बारीक करायचे असल्याने खालचा जबडा आणि वरचा जबडा विशिष्ट पद्धतीने एकमेकांवर घासावा लागतो, तेव्हाच अन्न भरडले जाते, बारीक होते. पण मांसाहारी प्राण्यांचा खालचा जबडा फक्त वर आणि खालीच हलतो.
त्यामुळे मांसाहारीना भक्ष्य परत आत ढकलण्यासाठी मानेची हालचाल करावी लागते. मानेला हिसका देऊन, मान थोडीशी मागे नेऊन, तोंड पुढे आणावे लागते, तेव्हाच ते भक्ष्य आत ढकलले जाते. मगर कशी खाते आठवून पहा. पकडलेल्या हरणाला, दातांनी आवळून मारल्यावर, त्याला पुनः वर उडवून खायची सवय असते. जबडा मोठा असला तरी भक्ष्याला गिळताना, त्यांच्यावरील दातांची पकड थोडी सैल करून, काही क्षणांसाठी त्याला सोडावे लागते, म्हणून एकदा भक्ष्याला धरल्यावर मरेपर्यंत काही काळ भक्ष्यावरील आपली दातांची पकड सैल होऊ देत नाही.
पण घोडा गाढवाला चारा खाताना मान हलवावी लागत नाही, की चारा उडवून खावा लागत नाही.

शाकाहारी प्राण्यांच्या दाढा खूप मजबूत असतात. पसरट असतात. हत्तीसारख्या प्राण्यांच्या दाढा, एका मोठ्या वीटेएवढ्या आकारात असतात. दोन्ही जबड्यात वर खाली समान संख्येत असतात.

शाकाहारी प्राणी जेवताना समुहाने आणि शांतपणे जेवतात. त्यांची वृत्ती स्थिर असते. गाय बैल म्हैशी चरताना एकत्रच चरत असतात. आपले अन्न फक्त आपल्यालाच मिळावे, असे यांना वाटत नाही. दुसऱ्यांना मिळू नये, अशी भावना अजिबात नसते. शांतपणे एकमेकांवर डूक न धरता खातात.

नजर शांत असते. खुनशी नसते. त्यांच्या डोळ्यात डोळे घालून आपण बघू शकतो. निरागस दिसतात. जेवत असताना सुद्धा नजर बदलत नाहीत. चोरून, घाबरून खाल्ल्यासारखे करत नाहीत. भरभर खातील पण वचावचा खाणार नाहीत.

सर्व शाकाहारी प्राणी मस्त आंघोळ करतात. पाण्याचा द्वेष, तिटकारा करीत नाहीत. अंगावर पाणी घातले तरी पळून जात नाहीत. कुत्र्यांना आंघोळ घालताना काय नाकीनऊ येतात, ते ज्यांचे त्यांनाच ठावूक.
हत्तींचे स्नान आठवून पहा. कसे पाण्यात मस्त डुंबतात आणि म्हैशी, पाणघोडे चिखलात कसे लोळतात. मुळात पाण्याची, आंघोळीची आवड असणे महत्वाचे, जी शाकाहारी प्राण्यांच्या रक्तात जन्मापूर्वी पासूनच असते.

यांच्या अंगाला घाण वास येत नाही. थोड्या कमी जास्त प्रमाणात घाम येतो, सूर्याच्या उष्णतेने बाष्पीभवन पण होते.

शाकाहारी प्राणी अंग स्वच्छ करायला सारखे चाटत बसत नाहीत. की यांना अंगाचे तापमान संतुलीत ठेवण्यासाठी जीभ बाहेर काढून, सारखी सारखी शीतकारी, शीतली करावी लागत नाही. बघीतलंय कधी बैलाला, कुत्र्यांसारखं फासण्या मारताना. ( फासण्या मारणे म्हणजे तोंड उघडे ठेवून जोरजोरात श्वासोच्छ्वास करणे )

आवाजामधे पण किती सौम्यता असते ना, भसाडा आवाज मुळीच नसतो. गाईच्या हंबरण्यात देखील हम्माऽऽऽ, मां असते. माया असते, वात्सल्य ऐकू येते. एक प्रकारचा गोडवा असतो. आवाज ऐकून भीती तर नक्कीच वाटत नाही.

एकदा खाल्लेतरी पचन पूर्ण झाल्यावर साधारणपणे आठ ते सोळा तासात परत भूक लागते. पुनः खावे लागते. भूक लवकर लागली तरी, अन्न पचायला मात्र वेळ जास्ती लागतो. खाल्लेल्या अन्नामधे विशेष अहितकर काहीच नसल्याने अन्न पोटात पुढे पुढे ढकलून त्याज्य भाग बाहेर काढायला बारा सोळा तास लागले तरी विशेष नुकसान होत नाही. यांची आतडी लांबीला जास्ती असतात. पाचक स्राव कमी अधिक प्रमाणात टप्प्यानुसार पाझरत जातात.

ईश्वराने यांना खायला भरभर शिकवले, पण पचवायला मात्र पुरेपुर वेळ दिला.

भगवान के घर देर है पर अंधेर नही !!

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
28.09.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..