जिथून समुद्र फक्त पन्नाससाठ किमी च्या अंतरावर आहे, तिथे तांदुळ हे मुख्य अन्न आहे, हे कदापि विसरून चालणार नाही. जरी ग्रंथामधे गोधूम म्हणजे गहू, प्रमेह म्हणजे प्रचलीत नावानुसार साखरेच्या आजारात, सांगितला गेला असला तरी, प्रदेश विचारानुसार आणि गुणधर्मांचा विचार करून, गहू अपथ्य (म्हणजे खाऊ नये ), म्हणून सांगायला सुरवात केल्यावर रूग्णांच्या लक्षणामधे खूप फरक पडलेला, मी व्यवहारात पहातोय.
ज्यांच्या खाण्यात गहू आहेत, त्यांनी भरपूर श्रम करणे अपेक्षित आहे. पचायला जड असलेला गहू श्रम केल्याने पचू शकेल. कष्टकरी वर्गाने गहू खावा आणि कष्टाची कामे करावीत. तर त्यांना आवश्यक असलेली उर्जा पण मिळते आणि काम केल्याने अनावश्यक साखर जाळली पण जाते.
मेह नत (म्हणजे नाहीसा) होण्यासाठी, मेहनत कर, हा मधुमेहावर उत्तम उपाय आहे.
पण आम्ही बुद्धिमान वर्ग, बुद्धी गहाण टाकल्याप्रमाणे, सुटबूट घालून, एसीत बसून टेबल खुर्चीवर काम करणार, किबोर्ड वरची चार दोन बटणे बडवणार आणि डब्यातून दिलेली बटाट्याची नाहीतर कोबीची भाजी आणि गव्हाची पोळी खाणार ! आणि ती पचण्यासाठी परत वरून औषधांचा मारा करणार, फरक पडला नाहीतर डाॅक्टरला बोल लावणार, मग कसे जमणार ?
ज्यांना गहू सोडणे अजिबात जमणारच नाही, त्यांनी गहू दोन वर्षे जुना वापरावा. यासाठी तो सणसणीत उन्हे देऊन वाळवून ठेवावा. सध्याच्या काळात ‘वाळवण’ करून धान्याची बेगमी करणे हा प्रकारच कालबाह्य झाला आहे.
जर हे पण शक्य नसेल तर बाजारातून गहू आणून, निवडून, दोन तीन वेळा पाण्याने धुवुन, ऊन्हात वाळवून, लोखंडी कढईत मंद विस्तवावर भाजून साठवून ठेवावा. आणि नंतर दळून आणावा. आणलेले पीठ सुध्दा थोडे गरम करून मग मळायला घ्यावे. पीठात भरपूर तेल घालावे, म्हणजे पीठातील चिकटपणा थोऽडाऽ फार कमी व्हायला मदत होते. एवढे केले तरी गव्हाला, पैकीच्या पैकी मार्क मिळतील, असे नाही.
ही पळवाट सांगून ठेवतोय.
मुख्य वाट तांदुळाची धरावी, नाहीतर खिशाला चाट पडेल आणि आरोग्याची वाट लागेल. शंभर वर्षाची वाटचाल करायची असेल तर योग्य वाट ओळखावी लागेल. वाटलं नव्हंत, गहू एवढा वाटलाव्या असेल !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
27.10.2016
Leave a Reply