गहू खायचा नाहीतर तांदुळ !
एखाद्या गोष्टीची इतकी सवय होते, की नंतर सोडताना खूप त्रास होतो.
गहू बंद केला तर
कल्पना सुद्धा करवत नाही.
मग डब्यात काय देणार ?
यांना काय सांगायला जातेय,
आम्हाला वेळच नाही,
आता एवढ्या वर्षात काही झालं नाही, आता काय होणारे ?
नुसतं हॅवाॅक आहे झालं !!
सुशिक्षित, विचार करणाऱ्या सुगृहिणीकडून अश्या काॅमेंटस ऐकाल्या की, त्यांना सांगावेसे वाटते, एक महिनाभर गंमत म्हणून, व्रत म्हणून, अक्कल गहाण टाकून, पूर्वग्रहदूषित ठेवून, गहू बंद करून पहावा. गहू बंद केला तर, अनेक नवीन पर्याय सुचु लागतील. याचा वापर केल्याने सजण आणि सर्वजण खुश होतील.
गव्हाऐवजी कोकणात तीन चार पर्याय उरतात. तांदुळ, नाचणी, उडीद आणि मका
कोकणाशिवाय अन्य प्रदेशात ज्वारी, बाजरी, मका ही धान्ये पण पोटभरतीची आहेत. किंवा धान्ये एकत्र करून पण वापरता येतील. भाजून ठेवली तर आणखीन चांगले. थालीपीठ आणि लोणी, एकत्र केलेल्या पीठाची धिरडी, उत्तप्पा, दशम्या, पराठे, घावन, वडे, एवढे उत्तम प्रतीचे पर्याय असताना त्या चपातीत जीव का गुंततो ते कळत नाही. ( चपाती एकेकाळी मलापण खूप आवडत होती. पण एकदा (प्र)देशप्रेमाचे भरते आले आणि आवडतीची, नावडती झाली ! )
मुंबैत तर चपाती पण नाही. नुसता वीतभर लांबीचा फुलका. पीठाचा गोळा चार पाच वेळा इकडून तिकडून फिरवला, एका बाजूने भाजल्या सारखा होईपर्यंत परतून लगेच तवा बाजुला करून गॅसवर शेकलं की लगेच डब्यात.
कोळश्याच्या शेगडीवर भाजलेला फुलका मात्र मस्त दिसतो. कमी वेळात कोणताही अन्नपदार्थ तयार करू नये, त्याच्यावर पूर्ण अग्निसंस्कार झाला पाहिजे. हे लक्षात ठेवावे.
पोळी करण्याचं कसब वेगळंच असतं. कणीक थोडीशी लाटून घेऊन, तेल पीठ लावून त्रिकोणी घडी करून पुनः तिचा आकार गोल करणं ही कला आहे. नाहीतर ऑस्ट्रेलिया, जपान भाजले जातात. थोडा वेळ जास्ती जातो, म्हणून सेकंदावर धावणाऱ्या मुंबईत पोळी नाही. पोळीला चपाती हा शब्द कुठुन आला माहीत नाही.
पोळी म्हटली की, पुरणाची पोळी, गुळाची पोळी, बेसनाची खमंग पोळी आठवते. प्रदेशानुसार यांची नावे बदलत जातात. काहीजण यालाच मांडे पण म्हणतात. बेसन तव्यावर ऑम्लेटसारखे फ्राय केलेतर त्याला पोळा असेही म्हणतात.
ज्यांना उपाय करायचा असेल त्यांनी जरूर असा बदल करून पहावा, नाहीतर आहेच मग. बटाट्याची भाजी आणि चपाती….
सांगायचे काय तर एवढे प्रकार उपलब्ध आहेत.
नाहीतर मराठमोळ्या सदाबहार भाकऱ्या. आफळेबुवांच्या भाषेत, तानाजी भाकरी म्हणजे दीड फूट लांब रूंद. फक्त हातावर वाढवत नेलेली ही भली मोठ्ठी भाकरी न तुटता, गरगरून फुगत, तव्यावरून ताटात येईपर्यंत तश्शीच रहाते, हे वैशिष्ट्य.
बाजरीच्या तीळ लावून खमंग खरपूस भाजलेल्या भाकरीवर लोण्याचा गोळा. आणि बरोबर वांग्याची भाजी आणि लसणाचे तिखट.
आठवणींच्या प्रदेशात जायचं नाही असं ठरवलं तरी मन सारखं जात रहातं. जायला काही हरकत नाही, पण येताना येववत नाही. इतकंच.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
30.10.2016
Leave a Reply