जे आपले नाही, त्याला आपले म्हणण्याचा अट्टाहास भारतीय संस्कृतीमधे नाही.
जे आपले आहे, त्यावरील हक्क सोडू नये.
जे आपले नाही, त्यावर आपला हक्क गाजवू नये.
आणि जे मुळात आपले नाही, त्याला ओढून ताणून आपले का म्हणा ?
एका गावातील एका पारावर एक बाहेर गावचा साधू येऊन बसला होता. अचानक त्याचे लक्ष रस्त्यावर पडलेल्या एका सोन्याच्या नाण्याकडे गेले. दुसऱ्या बाजूने एक पाणी भरायला येणारी बाई येत होती. त्या बाईच्या मनात त्या नाण्याविषयी मोह उत्पन्न होऊ नये म्हणून साधू धावतच त्या नाण्याजवळ आला आणि त्या नाण्यावर पाय देऊन सहजपणे उभा राहिला.
ती बाई तिथून पलीकडे गेली, पुनः साधु पारावर बसला. पाणी भरून येताना ती बाई जशी जवळ आली तशी साधु पुनः उठला आणि रस्त्यावर येऊन नाण्यावर पाय ठेवून उभा राहिला. असं तीनचार झाल्यावर त्या बाईच्या मनात आलेला विचार तिने बोलून दाखवला. त्यावर प्रामाणिकपणे त्या साधूने बाईला सांगितले. तिथे एक सोन्याचे नाणे आहे, ते नाणे पाहून ते घेण्याचा मोह तुला उत्पन्न होऊ नये म्हणून, मी धावत येऊन त्या नाण्यावर उभा रहात होतो.
त्यावर ती बाई म्हणाली,
“त्यात एवढं काय आहे, ते नाणं गेले चार पाच दिवस तिथंच पडलेलं होतं. सगळ्यांना दिसतही होतं. पण पडलेलं घ्यायचं असतं हे आज प्रथमच आपण येऊन शिकवलंत महाराज. जे आपलं नाही, ते आपण घेऊ नये. हे गावातील सर्वांनाच माहिती आहे. म्हणून कुणालासुद्धा ते दिसून घेण्याचा मोह झालाच नव्हता. पण महाराज, आता मात्र आपण आलात आणि त्या नाण्यावर उभे राहिलात, तेव्हा मला शिकवलंत की, असं काहीजण घेतात ते !”
जे नाण्याचे झाले ते ग्लोबलायझेशनच्या काळात आमचे प्रत्येक वस्तू आणि अन्नप्रकाराचे होतेय. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला आपला बिझनेस दिसतोय. चकचकीत वेष्टण आणि जाहीरातबाजीला भुलुन, सारासार विवेक बाजुला होतोय. तसं पौष्टिक भाजी भाकरी भाताऐवजी चपाती जवळची वाटू लागली आहे. कोकणातील भाकरी तांदळाची किंवा नाचण्याची आणि बाकी सर्व ठिकाणी ज्वारी बाजरी मका हे विसरू नका.
मोह निर्माण होण्याआधी वैराग्याचे धडे मिळाले तर अधिक चांगले.
निरोगी कसे रहायचे असते, ते रोगी होण्याअगोदर समजले तर सोपे होईल ना !
आपणला हे सांगत नाहीये, आपल्या पुढच्या पिढीसाठी सांगतोय.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
31.10.2016
Leave a Reply