पाला तो पालाच. फक्त एक दिवस जिवंत राहू शकतो. त्यामुळे रोज खावा लागतो. आणि जो स्वतः जिवंत राहू शकत नाही, तो माणसाचे आयुष्य शंभर वर्षे कसे वाढवणार ?
पालेभाज्या या चोथा जास्त, पचायला जड, पोषणमूल्य कमी आणि जवळपास ऐशी नव्वद टक्के पाणीच अश्या (अव)गुणाच्या आहेत.
जे काही दहा वीस टक्के चांगले गुण दिसतात, तेही काही कामाचे नाहीत.
मुंबई सारख्या शहरात पालेभाज्या रेल्वे लाईनच्या बाजुला कसल्या पाण्यावर पिकवतात ते सर्वजण बघतात.
पालेभाज्या जमिनीलगत वाढतात, म्हणून त्या नीट धुवूनच घ्याव्या लागतात. शहरात तर चक्क गटाराच्या पाण्यात धुवुन मार्केटमधे आणतात. अश्या धुण्याने किती जंतुसंसर्ग वाढेल?
कधी विचार केलाय याचा ?
बरं या पालेभाज्या अधिक हिरव्यागार दिसण्यासाठी, अधिक टवटवीत दिसण्यासाठी, अधिक लवकर तयार होण्यासाठी त्यावर रासायनिक खतांचा बेसुमार वापर केला जातोय. एका सर्वेक्षणात तर असे आढळले आहे की जंतुनाश होण्यासाठी जे प्रमाण वापरले जायला हवे त्यापेक्षा किमान पाचशेपट अधिक जहाल रसायन या पालेभाज्यांवर फवारले जातेय. ही माहिती खते आणि फवारणीची रसायने विकणाऱ्या एका होलसेल विक्रेत्यानेच एका व्हिडिओ द्वारे सांगितली आहे. तो म्हणतो, “इसी से हमारे मार्केट मे माल जल्दी खतम हो रहा है, हमारा धंदा बढ रहा है ।”
स्वतःचा व्यवसाय तो वाढवून घेतोच, पण व्यवहारात तो डाॅक्टर मंडळींचा व्यवसाय देखील काही हजार पटीने वाढवित असतो. ते तर पुरस्कार करणारच. त्यांच्या टेक्समधे जे आहे, ते करायलाच हवे ना.
शुद्ध स्वच्छ निर्जंतुक हे शब्द केवळ पुस्तकात वाचण्यासाठीच शिल्लक राहिले आहेत की काय असे वाटते.
प्रत्येक जण आपला व्यवसाय कसा वाढेल हेच बघतोय.
इथे, कुणी कुणाचे नाही राऽजा,
कुणी कुणाचे नाऽही
मग काय करायचं ?
पालेभाज्या खायच्याच असतील तर त्या अगदी खात्रीच्या माणसाकडून विकत घ्याव्यात, ज्याने त्या चांगल्या पाण्यावर वाढवलेल्या आहेत. त्याच्या मुळात कोणतेही रासायनिक खत वापरलेले नाही आणि वरून फवारणीसाठी कोणतेही जहाल विष फवारलेले नाही.
दुर्दैवाने असा माणूस नाहीच मिळाला तर मार्केटमधील पालेभाज्या नीट पहाव्यात.
ज्या आकाराने लहान, ज्यांची पाने किडींनी कातरलेली आणि खाल्लेली असतील, ज्यांच्या पानावर भोके पडलेली दिसतील, त्या भाज्या जगायला योग्य वाटल्यामुळे त्या किडींनी खाल्लेली असतात, असा उदात्त विचार करून घरी आणावीत……..
पालेभाज्याविषयी यापूर्वी तीन चार टीपांमधून बराच उहापोह झाला आहे. तरी पण नवीन सदस्यांना हा महत्वाचा विषय कळणे आवश्यक वाटते, म्हणून अजून एखादा भाग पालेभाज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ…….
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
19.10.2016
Leave a Reply