पालेभाज्यांचा पार अगदीच चोथा करून टाकलात हो,
आम्ही डोक्यावर घेऊन नाचत होतो, आज एकदम पायाखाली ?
आपण अगदी टोकाचे अतिरंजित लिहित आहात,
खरं वाटत नाही.
पालेभाज्यामधे जीवनमूल्यच नाहीत ? असे कसे म्हणू शकता ?
आम्ही तर रोज पालेभाज्या खातोय.
नाॅनव्हेज बंद केलेत, एकवेळ समजू शकतो. पण आता पालेभाज्यापण बंद. मग खायचे तरी काय ?
कालच्या आरोग्यटीपेवरील काही व्यक्त काही अव्यक्त टीका ….
आपण आपल्या धारणाच बदलून टाकल्या आहेत. म्हणजे जे मूलतः भारतीय विचार होते, ते कालबाह्य म्हणून टाकून दिले आणि ज्या लोकांना संस्कृती म्हणजे काय ? जेवावे कसे, हे माहिती नव्हते, त्यांना हे सर्व आपण भारतीयांनी शिकवले. आज त्यांचा अनुनय आपण करतोय ? ते सांगतात, त्यावर पूर्णसत्य म्हणून विश्वास ठेवतोय. कालाय तस्मै नमः । दुसरं काय ?
या लेख मालेतून आपण भारतीय आरोग्य ( आजच्या काळात किती श्रेष्ठ आहे हे ) जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, हे आपण आधीच ठरवलेले आहे. त्यादृष्टीने सर्व लेखन चाललेले आपल्या लक्षात येत असेल.
आज आमची धारणा अशी झाली आहे, की जे जे पाश्चात्य ते ते चांगले. पण हे आमच्या लक्षात येत नाही, की त्यांच्या धारणा, जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन, हा भारतीय जीवनपद्धतीपेक्षा कितीतरी भिन्न आहे.
आजच्या शिक्षणपद्धतीमधला हा दोष आहे की आमचे ते सर्व वाईट आणि पाश्चात्यांचे सर्व योग्य असे शिकवले जाते. हे पण पटणारे नाही काही जणांना.
टाय बांधला की माणूस सुसंस्कृत, सुशिक्षित वाटतो. हे खरंही असेल पण तो खरंच तसा होतो का ? मग शेंबुड सुद्धा पुसता येत नाही अशा शाळेत जाणाऱ्या पोरांना टाय बांधायची आवश्यकताच काय आहे ? ( टायचा उपयोग शेंबुड पुसण्यापेक्षा आणखी चांगला काय असू शकेल ? ) केवळ दिसण्यापेक्षा आतून तसे भारतीय असणे आवश्यक वाटते.
मी मोदींची भलावण करतोय असं नाही, पण टाय न लावतादेखील भारतीय पोशाखात आपले व्यक्तिमत्व खुलवता येऊ शकते. विचार भारतीय असला की सगळं शक्य असतं.
पण काय भुललासी वरलीया रंगा… ही आमची स्थिती झाली आहे. भारताबद्दलचे प्रेम सोडता येत नाही आणि पाश्चात्य संस्कृतीचा मोह टाळता येत नाही. न घर का ना घाट का अशी अवस्था आपली झाली आहे.
त्याची कित्ती उदाहरणे सांगू. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती पाश्चात्य विचारांनी वागतोय, सहज हिशोब करीत बसलो होतो, तेव्हा असे लक्षात आले की तब्बल 127 ठिकाणी आम्ही आमच्या मूळ परंपरा, रितीरिवाज, भाषा, पोशाख, चालीरिती बदललेल्या आहेत, ज्याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होत चालला आहे.
म्हणून मी सुरवातीलाच म्हटले, मूळ भारतीय आरोग्यापासून आपण खूप लांब चाललो आहोत.
पालेभाज्यांच्या पार्श्वभूमीवर डोक्यात येणारे उलटसुलट विचार आजच्या ग्लोबलायझेशनच्या फास्ट ट्रॅक युगात रूचणारे नाहीत, पटणारे मुळीच नाहीत पण काय योग्य होते, आणि आपण काय करीत होतो, ज्यामुळे आपले शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य चांगले राहात होते.
कुठेही शास्त्रीय आधार न सोडता, व्यवहारात काय चालले आहे, याचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न आहे.
मी संपूर्णपणे भारतीय बनण्याचे ठरवलेले आहे. आत्ता सुरवात झालेली आहे. वेळ गेलेली नाही. आजपासून अजून पन्नास वर्षे शिल्लक आहेत.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
20.10.2016
Leave a Reply