शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये बघीतली असता काही मुलभूत फरक आपणाला दिसले. अगदीच एकदोन अपवाद सोडले तर कोणीही प्राणी निसर्गदत्त नियम मोडत नाहीत, असे लक्षात येते.
या दोन प्रकारात माणूस कुठे बसतो ? हा प्रश्न आहे.
काही जण समजत होते, माणूस शाकाहारी.
काही जण समजत होते, माणूस मांसाहारी. काही मध्यम मार्गी मिश्राहारी या प्रकाराला चिकटून होते. पण “त्याच्या” नियमानुसार, ना माणूस शाकाहारी ना मांसाहारी ना मिश्राहारी.
मिश्राहारी ही अगदी सोयीस्कर पळवाट झाली.
म्हणजे उपवासाच्या दिवशी फळाहार पण करायचा आणि वडे भजी पण खायची. तसे झाले.
त्याच्या डिक्शनरीमधे मिश्राहारी हा हायब्रीड शब्दच नाही.
माणसाची वैशिष्ट्ये बघूया. म्हणजे त्याला अपेक्षित असलेले माणसाचे नियम आपोआप समजून येतील. .
शाकाहारी प्रमाणेच पाणी ओठानेच पितो, जीभेने चाटत बसत नाही.
समुहाने शांतपणे एकमेकांवर डूक न धरता जेवतो.
रोज आंघोळ करतो. पाण्याची आवड आहे.
अंगाला घाम येतो आणि शरीराचे तापमान संतुलीत ठेवायला मदतच होते.
जेवताना अगदी सावकाश जेवतो. मांसाहारी प्राण्यांप्रमाणे वचावचा किंवा शाकाहारी प्राण्यांप्रमाणे भराभरा जेवत नाही.
खाल्लेले अन्न पुनः पचनासाठी परत तोंडात आणत नाही. रवंथ करीत नाही.
तोंडातील लाळेचे रासायनिक पृथक्करण केले असता, शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांपेक्षा वेगळे दिसते. आतड्यांची रचना, लांबी पण वेगळीच असते.
मांसाहारी प्रमाणे माणसाची नखे आत बाहेर करता येत नाही. शाकाहारी प्रमाणे स्थिर आहेत. धारदार टोकदार नाहीत. त्यामुळे नखांनी शिकार करता येत नाही.
शिकार करण्यासाठी वेगळ्या साधनांचा वापर करावा लागतो. एवढेच नव्हे तर समोरचे मांस खाण्यासाठी भाजणे, जाळणे, तळणे, शिजवणे इ.इ. वेगळ्या संस्काराची आवश्यकता पडते. खाण्यासाठी सुद्धा काटे चमचे सुऱ्या घेऊन जणुकाही लुटुपुटुचे आभासी युद्ध करावे लागते.
शिवाजी महाराजांना अफजल्ल्याचे पोट फाडण्यासाठी वेगळी वाघनखे वापरावी लागली, आणि हिरण्यकश्यपूला ठार मारण्यासाठी प्रत्यक्ष भगवंताना देखील सिंहनखे धारण करावी लागली. त्यासाठी मानवरूप सोडून नरसिंह अवतार घ्यावा लागला. पण भगवंतांनी पण नियम नाही मोडला.
इथे प्रत्येकाचे नियम वेगळे. ज्याला जो नियम घालून दिला आहे, तोच नियम प्रत्येकाने पाळावा.
आणि नियम मोडला तर शिक्षा ही होणारच.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
1.10.2016
Leave a Reply