पशुंना मारताना कधी बघीतलंय ?
त्यांच्या डोळ्यात कधी डोळे घालून पाहिलंय ?
डोळ्यात येणारे अश्रु, मृत्युची दिसत असलेली भीती, ज्यांचा नंबर आता कापण्यासाठी लागणार आहे, त्यांची होणारी घालमेल कधी दिसलीच नाही का ?
कल्पना करून बघूया, त्यांच्या जागी आपण असतो तर ?
आपल्या मनात मारणाऱ्याविषयी किती घृणा निर्माण झाली असती ?
हे इमोशनल ब्लॅकमेलींग नाहीये, पण त्या पशुंच्या भावना बदलतात, त्यांच्या रक्तातील स्राव, हार्मोन्स बदलतात, अवयवांची कामे बदलतात, रक्ताचा पुरवठा बदलतो, दिशा बदलते, परिणाम बदलतो. हे सर्व नासा मधे सिद्ध झालेले फक्त सांगतोय.
मांसाहार केल्याने मेंदुमधील न्युरोट्रान्स्मीटर बदलतात, त्याने भावना बदलतात, विचार बदलतात, कृती बदलते, परिणाम बदलतात. पशुंमधे जे बदल होत जात आहेत, त्याचा परिणाम, त्यांना खाणाऱ्या माणसांवर होताना दिसतोय, पण ज्यांची उत्तरे जाणुनबुजुन शोधायचीच नाहीत, असंच ठरवल्यावर काय बोलणार ना ?
सगळ्या मेडीकल, स्लाॅटर, ट्रान्स्पोर्टस्, स्पोर्टस, चर्मोद्योग, काॅस्मेटीक्स या सारख्या बड्याबड्या इंडस्ट्रीज एका बाजुला आणि एका बाजूला मूठभर निसर्ग प्रेमी. विजय कुणाचा होणार ?
भरडली जात आहे ती सामान्य अज्ञानी जनता, जिच्या जीवावर हे सर्व जीवाशी खेळ चालले आहेत.
मधुमेह, रक्तदाब, पीसीओडी सारखे मनोशारीरिक आजार, ओव्हरवेटींग, मानसिक अस्वास्थ्य, कॅन्सर, कमी होत जाणारी रोग प्रतिकारक्षमता, या सारख्या अवस्था का निर्माण होताहेत ?
कोणत्या दिशेत संशोधन चालले आहे? गेली कित्येक वर्षे यावर संशोधन चाललेले आहे,
ते फक्त नवीन औषधे शोधून काढण्यासाठी.
रोग घालवण्यासाठी नाही.
हे सर्व रोग ज्या कारणाने नाहीसे होणारे आहेत त्यांच्याकडे जाणूनबुजुन दुर्लक्ष ?
जर मधुमेह रक्तदाब आदि रोग कायमचे गेले तर ?
सहज हिशोब केला….
एका चार जणांच्या कुटुंबातील फक्त एका माणसाला, आयुष्यभर औषधे घ्यावा लागणारा एखादाच आजार, त्याच्या वयाच्या चाळीसाव्या वर्षी झाला, तर त्याला आजच्या बाजारभावांचा विचार केला तरी, महिन्यातून फक्त एक दिवस जरी, कोणत्याही पॅथीच्या डाॅक्टरांकडे जावून यायचे म्हटले तरी, एका माणसाला, रिक्शा, बरोबर एक माणूस, तपासण्या, औषधे, डाॅक्टरची फी, स्वतःचा गेलेला वेळ, हे सर्व धरून कमीत कमी खर्च एक हजार रूपये नक्कीच.
असे बारा महिन्यांचे एका आजाराचे, बारा हजार रूपये,
असे पुढील आणखी कमीत कमी चाळीस वर्षे.
म्हणजे बारा चोक अठ्ठेचाळीस. वर एक मोठे शून्य.
चाळीसच वर्षे का ? कारण एवढी औषध खाऊन, शंभर वर्षे जगताच येणार नाही, ( औषधांवरच जगायचं असेल तर किंवा जीवनावरचा विश्वासच उडाल्याने, असे जगणेच नको असेही वाटू लागल्याने, सरासरी आयुष्य ऐशी वर्षे धरले आहे.)
या उरलेल्या चाळीस वर्षांचे चार लाख ऐशी हजार म्हणजे सरासरी पाच लाख रूपये हे एका माणसाच्या इझी गोईंग आयुष्यासाठी खर्च होणार आहेत.
आणि हे फक्त आरोग्यावरच.
त्यातही बाकीच्या तीन माणसांचा,
त्यांना होणाऱ्या संभावित आजारांचा,
अपघातांचा,
इमर्जन्सीच्या नावाखाली होणाऱ्या अपेंडिक्स ते बायपास ऑपरेशनचा खर्च धरलेला नाही. आयुष्यभर पै पै जपत जमा केलेली बचत एका दिवसात आपल्या बॅकेतून गायब होते. असो. (इमर्जन्सी साठीच आपला प्राॅव्हिडंट फंड वापरता येतो ना. असाही शहाणपणाचा सूज्ञ विचार करता येतो काही जणाना. )
पुढील चाळीस वर्षात होणाऱ्या गुडघेबदली, मोतीबिंदू, हर्निया, प्रोस्टेट, गर्भाशय, या छोट्या पण लाख लाख मोलाच्या अवयवांचा विचार पण केलेला नाही.
ही सर्व इंडस्ट्री कोणाच्या जीवावर पोसली जातेय ? जरा विचार करा.
……… मग कोणाला वाटेल सर्वजण निरोगी व्हावेत.?
म्हणून रोग समूळ नष्ट व्हावेत, त्यांची कारणे शोधून काढावीत, या दिशेत संशोधन होतच नाही.
खरं सांगतो, इथे तुमच्या आयुष्याची कोणाला काही पडलेली नाही.
ज्याची त्याला प्यार झोपडी…
असो.
या सर्व रोगांचे मूळ जर आपल्या चुकीच्या आहारात असेल तर वेळीच सावध होणे गरजेचे.
योग्य वेळी घातलेला एक टाका पुढील नऊ टाके वाचवतो, अशा अर्थाची एक इंग्रजी भाषेतील म्हण रूढ आहे.
इथे सुद्धा भारतीय म्हण दिली नाही.
कारण भारतात आजकल किसीपे भरोसा भी नही कर सकते असं म्हणणाऱ्या विश्वासरावांची संख्या दुर्दैवाने वाढली आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
12.10.2016
Leave a Reply