दूध न देणारी गाय, शेतीसाठी निरूपयोगी ठरलेला बैल, शेरडू न देणारी शेळी, रेस हरणारा घोडा, यांना पोसून काय उपयोग? असा विचार करणारी पिढी भारतात जन्माला येतेय. हे संस्कारवान भारतीय संस्कृतीचे दुर्दैव नव्हे काय ? मग आईबाबांना देखील वृद्धाश्रमात टाकायला यांना लाज वाटेनाशी होतेय….
……आणि यात गैर ते काय ?
…….पोराच्या बोटाला धरून पाळणाघरात नेणाऱ्या आईबाबांना नंतर त्यांचे पोर हाताला धरून वृद्धाश्रमाची वाट दाखवणारच…….
…….त्यात नवीन पिढीचे काय चुकले ?
…….प्रत्येक गोष्ट पैश्यावर मोजणाऱ्यांना हीच शिक्षा योग्य आहे. असे कधीतरी वाटते.
पाश्चात्यांच्या संस्कारांना एवढे डोक्यावर बसवले की, आपले हित कशात आहे हेच कळेनासे झाले आहे.
बरे जे कोणी संस्कृतीचे रक्षण करणारे आहेत, त्यांच्यावर तथाकथित संस्कृतीरक्षक अशी उपहासात्मक पदवी देणारेही भारतीयच आहेत. प्रत्येक गोष्टीत फक्त पैसा आणि पैसाच बघणे ही पाश्चात्य वैश्यवृत्ती आहे. हा भारतीय विचार नाही, हे सुद्धा आता कळेनासे झाले आहे.
मग आम्ही भारतीय संस्कृतीरक्षक गाईला गोमाता का म्हणतो हे यांच्या कसे लक्षात येणार ? आणि मातेचे संरक्षण करायचे असते, हे यांना कोणत्या स्तरावरून समजावणार ?
उपयोगिता संपली की या जनावरांना क्रूरपणे, निर्दयपणे खाटीकखान्यात पाठवावे ?
काय म्हणावे या वैचारिक गुलामीला ?
“यांना कत्तलखान्याची वाट दाखवली तर यात गैर ते काय, यांचे पोषण करण्याच्या हट्टापायी भारतीय शेतीचे आजवर नुकसान होत आले आहे. अनुत्पादक गोष्टी तात्काळ संपवल्या पाहिजेत,” असे आग्रहाने प्रतिपादन करणारे, एक महत्वाची गोष्ट विसरतात, कि भारतीय शेतकऱ्याच्या दृष्टी ने पशुधन ही प्रेमाची गोष्ट आहे. ज्या बैलांबरोबर आयुष्यभर त्याच्या साथीने आपली उपजिवीका वाहिली, कष्ट करवून घेतले, त्यांची उत्पादकता आणि उपयुक्तता यांचा पैशात हिशोब खऱ्या भारतीय शेतकऱ्याला मंजूर नसतो.
मोठ्यामोठ्या बंगल्यात राहून भाकड पशुधनावर, विनाकारण पोषणाचा आळ ठेवत, चर्चासत्रे झोडणारे मात्र, त्यांच्या बंगल्याची राखण करणाऱ्या कुत्र्याला किंवा लळा लावलेल्या मांजराला, ती वयस्कर झाल्याने आता नष्ट करू, ठार मारू असा विचार करताना दिसत नाहीत. असे का ? (अजून तरी कुत्र्यामांजराचे मांस खायला यांनी सुरवात केली नाही म्हणून असेल कदाचित…..)
एक भाकड गाय देखील नीट नियोजन केले तर दोन माणसाचे कुटुंब पोसू शकते, हे व्यावहारिक भारतीय सत्य आहे. याचा अभ्यास आता पाश्चात्य करू लागले आहेत.
तेव्हा पाश्चात्य संस्कारांनी बुद्धी भेद करणाऱ्यांनी एक लक्षात ठेवावे कि, भारतीय संदर्भ, भारतीय ग्रामीण जनतेची मानसिकता, त्यांची निरूपयोगी पशुंकडे पाहाण्याची दृष्टी, एकुण आर्थिक कुवत आणि सरकारी स्तरावरील पशुधनाची पैदास, ही इतर देशातील आकडेवारीपेक्षा, भारतीय आकडेवारीमधे आणि भारतीय मानसिकतेमधे फार वेगळे अंतर ठेवते.
दुर्दैवाने भारतातला एक मोठा वर्ग, जो पूर्णतः शाकाहारी म्हणून ओळखला जाई, त्या कुशाग्र बुद्धीतील काही जणांकडूनच आज मोठ्या प्रमाणात मांसाहाराचे समर्थन होताना दिसत आहे.
हा बुद्धि भेद करणाऱ्यांना लवकरच सद्बुद्धी दे रे परशुरामा !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
13.10.2016
Leave a Reply