संडे हो या मंडे रोज खाओ अंडे ची जाहीरात आपण बघतो.
अंडी खा, अशी जाहीरात का करावी लागते ?
कारणही तसेच आहे.अंडे हे शाकाहारीच आहे, असेही सांगितले जाते.
अंडे चांगले की वाईट, अंडे आरोग्य वाढवते की कोलेस्टेरॉल? यापैकी कशाचाही संदर्भ न देता, अंडे हे शाकाहारीच आहे, त्यात जीव नसतो, अशी जाहीरात करणे हा बुद्धी भेद करण्याचा दिशाभूल करण्याचाच प्रकार आहे.
असे ऐकीवात आहे की, दरमहा बाहेर पडणारा रजाचा स्राव म्हणजे म्हणे अफलीत अंडे. म्हणून त्याच्यात जीव नसतो. जसं ए1 ए2 दुधाबद्दल, साबुदाण्याबद्दल, अजूनही काही जणांच्या मनात संभ्रम आहेत, तसेच काहीसे अंड्याबद्दल आहेत. पण हे नक्की की, अंडे हे शाकाहारी नाहीच. त्यात रक्त आणि मांस असतेच. कोणतेही ब्राॅयलर उत्पादक व्यापारी आपल्या प्राॅडक्टविषयी संभ्रम निर्माण करणारी किंवा काॅन्ट्राडिक्टरी माहिती कशी जाहीर करतील ?
आयुर्वेदात जे अंडे औषधामधे वापरायला सांगितले आहे ते, जंगलात फिरणाऱ्या किंवा आपले अन्न आपल्याच पायांनी उकरून खाणाऱ्या गावठी पक्ष्यांचे सांगितले आहे. ब्राॅयलर नाही. त्याची कारणमीमांसा मागील आरोग्य टीपेमध्ये केलेली आहे.
जे खाऊ शकतात, त्या कुपोषित बालकांसाठी मात्र अंडी हा प्रोटीनचा मोठा स्त्रोत होऊ शकतो.
कोंबड्याची कृत्रिम पैदास वाढवली, पण दुर्दैवाने जेवढी विक्री व्हायला हवी, तेवढी झाली नाही. अगदी 1970 पासूनचा विचार केला तरी दहा वर्षात अंड्याची किंमत फक्त दुप्पट झाली, हे नुकसान खूप मोठं होतं.अंडी हा नाशवंत माल वेळीच माल खपला नाही तर सरळ नुकसान पुनः अंड्याच्या प्रवासात नासधुस , फुटणे इ नुकसान होणे स्वाभाविकच. म्हणून हा तोटा टाळण्यासाठी अंडी उत्पादकांना खोटी का होईना पण जाहीरात करणे भाग पडले.
मोठाले भांडवल घातल्यावर त्यात नुकसान होऊ नये म्हणून व्यवसायात नीती, संस्कृती, सभ्यता, संस्कार, प्रेमभाव, जीवदया, सर्व नियम अगदी धाब्यावर बसवले जातात, मग व्यवसाय कोणताही असो. खरं आहे ना ?
हा व्यापाराचा नियमच आहे. तिथे नातेगोते, ओळखपाळख, मित्र मैत्री, यामधे ‘बिझनेस’ सोडून काही पाहू नये असं म्हणतात. आताच्या पाश्चात्य कंपन्यांच्या कोणत्याही मल्टीलिंक मार्केटिंगच्या ट्रेनिंगमध्ये हेच शिकवले जाते. तेच भारतीय कंपन्याही शिकल्या आणि व्यापारवृद्धी केली जाऊ लागली. अगदी शिक्षण क्षेत्रापासून वैद्यकीय क्षेत्रापर्यंत हे पहायला मिळते. असो.
मुख्य विक्री मांसाची हे तत्व बाजूला होऊन मग अन्य अवयवांच्या विक्रीतून तूट भरून काढणे सुरू झाले. आणि बाय प्राॅडक्टची जागा मुख्य व्यवसायाने कधी घेतली हे कळलेसुद्धा नाही.
मांस उद्योगामधे सर्वात मोठा खर्च पाण्यावर केला जातो. पाण्याची किती मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो त्याची नुसती आकडेवारी पहा.
एक किलो भाजीपाला पिकवण्यासाठी शंभर दिवसात एकशेवीस लीटर पाणी लागते.
एक किलो फळे तयार करायला दीडशे लीटर, आणि एक किलो मांस निर्माण होण्यासाठी तब्बल पाच हजार लीटर पाण्याची गरज भासते.
एका बाजूने होळीच्या सणाला नजरेत भरणारी लाकुडतोड, रंगपंचमीच्या निमित्ताने वापरले जाणारे पाणी, दसरा, वटपौर्णिमेच्या निमित्ताने तोड होत असलेली बहुवर्षायु झाडे यांच्या तुलनेत दररोज होणारा हा पाण्याचा अपव्यय लक्षात नको का घ्यायला ? निदान महाराष्ट्रात तरी, जिथे पाण्याअभावी माणसेच तडफडून मरत आहेत !
अन्न (किंवा मांस ) ताजे असावे, हा अतिसामान्य नियम झाला, पण मोठाल्या कत्तलखान्यातून वेगळे केलेले मांस दुसरी कडे नेण्यासाठी वातानुकूलित यंत्रणा लागते. त्यासाठी वीजेचा खूप वापर होतो. या वीजेमधे भार नियमन चालत नाही. भारतात ही कोल्ड चेन मेन्टेन ठेवणं शक्य आहे ? काय वाटतं ?
नक्कीच नाही.
मांस तसेच पुढे पाठवले जाते. यातून खूप मोठा जंतुसंसर्ग होऊ शकतो.
उत्तम प्रतीची कोल्डचेन मेंटेन केलेले मांस परदेशात पाठवले जाते. पण त्यासाठी खर्च खूप जास्त येतो. कारण त्यासाठी वीज, पाणी जास्त खर्च होते. भारतात ते परवडत नाही.
विमानाने जाणाऱ्या मांसासाठी खर्च होणारे पाणी, वीज मात्र भारताकडून ! त्याच्यासाठी करावे लागणारे भारनियमन भारतीयांनीच सोसायचे. मांस प्रकल्पातून तयार होणारा जैवीक कचरा, त्याची दुर्गंधी, भारतीयांनी सहन करायची.. …
का म्हणून ???
या अवाढव्य प्रकल्पातून बाहेर पडणारे सांडपाणी, रक्त, मांस मिश्रीत कचरा नदीमधे तसाच सोडला जातो.
म्हणजे एकुणच या मोठ्याल्या प्रकल्पातून देखील निसर्गावर आक्रमणच केले जाते.
कधीतरी या गोष्टीचा विचार करावाच लागेल.
हा विषयच वादग्रस्त आहे. म्हणून चर्चा करणेच टाळावे, लिखाण थांबवावे, असे करणे पण योग्य होणार नाही. त्यामुळे हे सर्व लिहावे लागत आहे. नाहीतर हे असेच चालायचे, यात बदल होणे भारतात तरी शक्य नाही, असे म्हणून मौन धरणे पिंडाला पटत नाही. जे योग्य आहे, तिथे ते न बोलणे, हेदेखील पाप लागणारे आहे.
मी पापपुण्यावर विश्वास ठेवणारा श्रद्धाळू माणूस असल्याने लिहिण्याचे धाडस केले, एवढेच !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
14.10.2016
Leave a Reply