दुसऱ्याच्या ताटात बघण्याअगोदर स्वतःचे ताट बघावे, या अर्थाची एक म्हण आहे.
म्हणजे दुसरा काय करतोय, कसं करतोय, कशासाठी करतोय, हे पहाण्यापेक्षा मला कशाची गरज आहे ते पहावे, म्हणजे जीवनातील बहुतेक सर्व दुःखे नाहिशी होतील असे वाटते.
अगदी तिच गोष्ट जेवणाची सुद्धा !
दुसरा काय खातोय, कशासाठी खातोय, का खातोय, हे खरंतर बघूच नये.
कदाचित म्हणूनच माझी आजी मला लहानपणी ओरडायची,
“जेवताना दुसऱ्याच्या पानात लक्ष घालू नको, तो किती आणि काय खातोय यावर तुझं पोट भरणार आहे का ? तुला काय हवंय ते तू ( जे समोर आहे त्यातून ) घे.”
खरं होतं तिचं. प्रत्येकाची गरज वेगळी, प्रत्येकाचे समाधान वेगळेच असते.
तसं गटामधे एका विचाराची माणसं कुठे भेटतात ? आणि कितीवेळा सांगूनही अॅडमिनचं कुठं ऐकतात. ? आपण सांगतोय तेच बरोबर, तुम्ही पण तस्सच वागलं पाहिजे असा हट्ट पण प्रत्येकाचा असतो. असो !
माझी गरज काय आहे, माझी पचनशक्ती कशी आहे, मला काय केलं की बरं वाटतंय, माझ्यासाठी काय योग्य आहे, हे मला दुसऱ्या कुणी सांगण्याची गरज नसते. मी काय जेवायचे, हे घरातले, समोरचे उपलब्ध पदार्थ ठरवतात. माझा चाॅईस एवढाच मर्यादित ठेवायचा. त्यातीलच एक दोन अथवा सर्व पदार्थ निवडायचं स्वातंत्र्य मला आहे. हा नियम पाळला की अन्नपचन सोपे होते.
माणूस म्हणून जन्माला आलो तर माणूस म्हणून जगले पाहिजे एवढी माफक अपेक्षा स्वतःकडून ठेवायची. माणसासाठी जे नियम ” त्याने” ठरवून दिले आहेत, ते आत्मसात करून घ्यायचे. आणि मस्त जगायचं.
कोणत्या तरी पुस्तकात वाचलं म्हणून, कोणीतरी सांगितले म्हणून, मला वाटतं म्हणून, मी मांसाहारी पदार्थ खाणार हे म्हणजे पोटावर केलेले अत्याचारच आहेत. त्याचे परिणाम आज नाही तर उद्या भोगावेच लागणार, जर आपल्याला शंभर वर्षे निरोगी आणि औषधांशिवाय जगायचं असेल तर !!
मी शाकाहारी मांसाहारी यापैकी काय जेवावे ? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपलं पोट भरण्यासाठी, दुसरे अन्य पुरेसे सक्षम पर्याय उपलब्ध असताना, दुसऱ्याचा जीव घेणे ही कल्पनाच थोडी विचित्र वाटते.
मग अंडी शाकाहारी की मांसाहारी, दूध शाकाहारी की मांसाहारी, जीव तर पाण्यातही असतात. या सर्व गोष्टी गौण ठरतात.
मॅन व्हर्सेस वाईल्ड नावाचा एक डिस्कव्हरी शो आहे. त्यातील एॅकर काहीही चित्रविचित्र, रानटी पद्धतीने खाताना दाखवतात. ती क्रूरताच आहे. तो हे पण सांगतोय,
“अश्या अत्यंत वाईट आणि अन अॅव्हाॅईडेबल कंडीशनमध्ये जर जगायचे ठरवले तर काय फंडे वापरायचे, याचं हे प्रात्यक्षिक मी करून दाखवत आहे. असं खाणं, डे टू डे साठी योग्य नाही.”
आपण स्वतःला सोयीस्कर अर्थ काढणारी माणसं. मग जगण्यासाठी मांसाहार किती आवश्यक आहे हे प्रोटीन्सच्या चार्टवरून पटवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो. दोन चार वेगवेगळ्या पुस्तकातील संदर्भ बघीतले की, पुस्तकंपण सोयीस्कर बोलतात, असं लक्षात येतं.
प्राणी म्हणून जन्माला आलो. समाजाकडून माणूस म्हणून घडवले गेलो. काही कारणाने माणुसपण विसरलो. आचार विचाराने मांसाहारी झालो. आता परत सुलट्या दिशेने प्रवास सुरू करूया. जे मांसाहारी आहेत, त्यांनी शाकाहारी व्हावे, जे शाकाहारी आहेत, त्यांनी फ्रूगीव्होरस म्हणजे माणूस नावाचा प्राणी होण्याचा प्रयत्न करावा.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
3.10.2016
Leave a Reply