माणूस हा जन्मतः मांस न खाणारा प्राणी आहे. शरीर रचनेचा विचार केला असता, शारीरिक आणि मानसिक स्तरावर, मांस खाणाऱ्या प्राण्यांची तुलना, माणसाशी कधी होऊच शकत नाही. तरीदेखील माणूस मांस खाऊ लागला. काहीवेळा दुसरे अन्न मिळतच नाही म्हणून, तर काही वेळा केवळ चवीसाठी, काहीवेळा हाय प्रोटीन डाएट म्हणून तर काही वेळा औषध म्हणून.
शरीररचनेच्या विरोधात म्हणजे निसर्गदत्त नियमाच्या विरोधात जेव्हा आहार पोटात जाईल तेव्हा ते अनेक आजारांना जन्म देणारे असते.
माणसाच्या शरीराची रचना ही मांस खाण्यासाठी, बारीक करण्यासाठी, मांस पचवण्यासाठी, शरीरातून बाहेर काढण्यासाठी योग्य नाही, हे सिद्ध झालेले आहे. तरीदेखील कोणत्याही कारणांनी जर मांस खाल्ले गेले तर ते पचत नाही. किंवा काहीवेळा तर निसर्ग पुनः विरोधात जातो. आणि या द्वंद्वात नुकसान मानवी शरीराचे होते.
चरबी वाढणे, जाडी वाढणे, किडनीचे आजार, यकृताचे आजार, ह्रदयाचे आजार वाढलेले दिसतात, याचे एक कारण अति प्रमाणात खाल्ला जाणारा मांसाहार आहे.
कोकणात जी मंडळी मांसाहार करतात, त्यातील बहुतांश मंडळी “दिवस पाळून” मांसाहार करताना दिसतात. म्हणजे, रविवार आणि बुधवार या दोन दिवशी मांसाहार केला जातो. इतर दिवशी मात्र शुद्ध शाकाहारी जेवण घेतले जाते. यातील रविवार आणि बुधवार हे दिवस कोणी आणि कसे शोधून काढले माहिती नाही, पण औषध सुरू करताना ते रविवारी अथवा बुधवारी किंवा पुष्य नक्षत्रावर सुरू करावे, असं कुठेतरी वाचनात आलेलं आठवतंय.
काहीही मग जे औषध स्वरूपात घेतले जाते ते रविवारी किंवा बुधवारी घेतले जावे, या हेतुने आहार हाच औषधी स्वरूपात होण्यासाठी, मांसाहार करण्यासाठी, हे दोन दिवस गृहीत धरले गेले असावेत. असे मला वाटते.
म्हणजेच मांसाहार हा स्वस्थवृत्तार्थ नसून, व्याधी परीमोक्षार्थ सांगितला गेलाय. निरोगी रहाण्यासाठी नसून, रोगी अवस्था कमी होण्यासाठी, फक्त औषध स्वरूपात वापरावा असे म्हटले तर ते चुक ठरू नये.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
4.10.2016
Leave a Reply