शाकाहारी की मांसाहारी या द्वैतामधे आपण अजूनही आहोत. आपल्याला नीट निर्णय घेता येत नाहीत की योग्य काय आणि अयोग्य काय ?
मांसाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर माणूस शाकाहारी आहे हे सत्य पटते. पण लगेच आयुर्वेदात सांगितलेले मांसाहारी औषध पण आठवते. आपण सोयीस्कर अर्थ काढणारी जमात आहोत. बुद्धीचा अति वापर करतो, म्हणून गडबड उडते.
न मांसभक्षणे दोषः
न मद्येच न मैथुने
प्रवृत्तिरेषा भूतानां
निवृत्तिस्तु महाफला
असं स्मृतीग्रंथकार म्हणतात.
म्हणजे मांसभक्षणात दोष नाही. मद्यपानात दोष नाही. मैथुनातही दोष नाही. या गोष्टी करण्यामधे लोकांचा नैसर्गिक कल असतो. स्वभावतःच ओढ असते. ही प्रवृत्ती आहे. आणि त्यातून निवृत्ती मिळवता येणे हे महाफल आहे. हे जास्त महत्वाचे.
न मांसभक्षणे दोषः एवढाच (सोयीस्कर अर्थाचा) भाग सांगितला गेला तर अर्थाचा अनर्थ कसा होतो, एवढेच सांगायचे होते.
अर्धवट श्लोक वाचून सोयीस्कर अर्थ काढले की चुकीच्या गोष्टींची भलावण करता येते, असा सध्याचा प्रघातच आहे. योग्य आणि अयोग्य याचा सारासार विचार करणे आणि निर्णय घेणे याला विवेकबुद्धी म्हणतात.
मांसाहार करणारे लोक आपली सोय बघतात. शाकाहार करणारे आम्ही कसे योग्य ते सांगत बसतात. त्याचे पुरावे पण सादर करतात.
गरज आहे वर्तमानात रहाण्याची. इतिहास यासाठी अभ्यासायचा, की त्यावेळी ज्या चुका झाल्या, अज्ञानामुळे केल्या गेल्या, त्या उज्वल भविष्याचा विचार करता, वर्तमानात होऊ नयेत.
प्राचीन भारतात मांसाहार सर्रास चालत असे, सर्व वर्णाचे लोक मांस भक्षण करीत होते, यज्ञासाठी पण प्राण्यांची हत्या होत होती, स्मृतीग्रंथातही मांसाहाराची भलावण दिसते, आयुर्वेदातही मांसाचे वर्णन आढळते………
या सर्वात नाकारण्यासारखे काही नाही.
त्या काळात ते संमत होते. काळ बदललाय. आपणही नको का बदलायला ?
ज्या चुका पूर्वजांनी केल्या त्याच चुका आपणही परतपरत करायच्या का ?
नरबळींची प्रथा गेल्या शतकापर्यत भारतात सुरू होती. पण आज ? ती नाही. (अगदीच विकृत मनोवृत्तीतून नाकारता येत नाही.)
नरमांसभक्षक टोळ्या पूर्वी होत्या. आता नाहीत.
सतीची प्रथा, बालविवाह, जंगली प्राण्यांची शिकार, पुत्रप्राप्तीसाठी नियोग पद्धत, बहुपत्नीत्व इ.इ. गोष्टी संस्कारीत समाजाने अधिकृतपणे कायद्याने बंद केले आहे. आणि हे मोठे बदल जेमतेम साठ सत्तर वर्षातील आहेत.
वाल्या कोळ्याचा, वाल्मिकी ऋषी होऊन समाजमान्यता पावतो.
सार्वभौम राजा सम्राट अशोक आयुष्याच्या एका टप्प्यावर शाकाहारी बनला. जैन धर्माचे चौवीसावे तीर्थंकर महावीर जैन यांनी मांसभक्षण करू नये, अशी आज्ञाच काढली.
ज्यांच्या जन्मापासून मांसाहार सुरू असतो, अश्या अन्य धर्मातील लोक देखील आता मांसाहाराचा त्याग करू लागली आहेत. एवढेच नव्हे तर अमेरीका स्थित नासा या स्पेस रिसर्च सेंटरचा नियमच आहे, अवकाशात जावू इच्छीणाऱ्या अंतराळरवीरांनी शाकाहारी बनले पाहिजे !
भारतातील आताचा सर्वे असं सांगतोय की भारतात शाकाहारी लोकांची संख्या वाढली आहे. आपण चुकीच्या गोष्टींचा त्याग करतोय, बदल होतोय, ही चांगली गोष्ट आहे.
नवरात्रीच्या निमित्ताने, सण व्रतांच्या निमित्ताने चांगले आरोग्य मिळवण्यासाठी चाललेले ही प्रामाणिक प्रयत्न नक्कीच यशस्वी होतील, सर्व समाज पुनः सत्वगुणी बनेल अशी आशा आहे.
बदल हा होतच रहातो. चांगल्यासाठी स्थित्यंतर घडणे, हे कालानुरूप होतच आले आहे. होतच रहाणार.
प्रश्न आहे, आपण त्यात सामिल होणार की नाही याचा !!!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
6.10.2016
Leave a Reply