नवीन लेखन...

अहिल्योध्दार : गोमंतकीय रंगभूमीचा पाया

गोव्यात गावागावात जेवढी म्हणून देवस्थाने आहेत, तेवढाच नाट्यमंडळांचाही आकडा आहे. गोव्यातील नाट्यपरंपरा कधीपासून सुरू झाली, याला अनेकांचे दुमत आहे. परंतु “अहिल्योध्दार” नाटकाच्या मूळप्रतीवरून एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच गोमंतकीय रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली असावी असे अनेक जाणकारांचे मत.

गोव्याचे संतकवी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकर लिखित “अहिल्योध्दार” या नाटकाच्या प्रतीवरून आणि त्यांंच्या इतर लिखाणावरून जाणकारांनी कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकर यांचा आद्यनाटककार म्हणून उल्लेख केला आहे.

गोव्याचे अष्टपैलू व्यक्तीमत्व साहित्यिक, नाटककार, नट, गायक, लेखक विष्णू सुर्या वाघ हे गोव्यातील डोंगरी गावातले. याच डोंगरी गावात कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकर होऊन गेले. 2012च्या निवडणूकीत विष्णू वाघ विधासभेवर निवडून आले, तेव्हा गोमंतकीय कलाकारांनी, कलाकारांचा आवाज विधानसभेत पोचला अशा प्रतिक्रीया व्यक्त करून वाघांचे कौतुक केले. त्याच काळात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यांना कला अकादमीचे अध्यक्षपद प्रदान केले होते. वाघ कला अकादमीत आल्यावर अनेक नवे उपक्रम, नवकल्पना, स्पर्धांतील बक्षीसांच्या रक्कमेत वाढ अशा गोष्टी घडत गेल्या. यातील मुख्य गोष्ट म्हणजे वाघांनी गोमंत रंगभूमी दिनाची घोषणा केली. तीही बांदकरांच्या जन्मदिनी. तेव्हापासून गोव्यात रंगभूमी दिन जुलै महिन्यात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने ज्येष्ठ नाट्यकलाकारांचा सन्मान केला जातो. हा एकप्रकारे बांदकरांच्या कार्याचा गौरव म्हणावा लागेल.

उपलब्ध माहितीनुसार बांदकरांचा जन्म 1844 साली झाला. डोंगरीत राममंदिरात होणार्‍या रामनवमीला ते स्वत: लिहून नाटके सादर करायचे. हे नाटक म्हणजे संगितिकेच्या स्वरूपातील नाट्य. ते स्वत: मंदिरातील पुरोहित असल्याने स्थानिक तरूण त्यांच्या शब्दाला मान देत. त्यांना घेऊनच ते नाटकं सादर करायचे. कीर्तनी बाजातील ही मराठी नाटके तेव्हा प्रेक्षकांना फार आवडायची. त्यांची ख्याती दूरवर पसरली होती. गोव्यातीलच नव्हे शेजारील राज्यांमधूनही त्यांची नाटके पाहायला लोक यायचे. बांदकरांनी विपूल प्रमाणात लेखन केले आहे. त्याचा दाखलाही मिळतो. कीर्तने, श्लोक, अभंग हे तर आहेच. शिवाय काही नाटकांचा संदर्भही आढळतो. त्यांनी लिहिलेल्या नाटकांमध्ये “लोपामुद्रा संवाद”, “नटसुभद्रा विलास”, “शुक रंभा संवाद”, “अहिल्योध्दार” या नाटकांचा समावेश आहे. परंतु या नाटकांच्या प्रती कुठे गेल्या याचा ठाव लागत नाही. केवळ “अहिल्योध्दार” या नाटकाची मूळ प्रत त्यांचे पणतू सिताराम बांदकर यांच्याकडे आहे. गोमंतकीय नाट्यपरंपरा सांगताना अण्णासाहेब किर्लोसकरांचाही बांकरांच्या माहितीत उल्लेख झाला आहे.

गोमंतकीय विश्वकोषात बांदकरांच्या साहित्याविषयी थोडक्यात माहिती मिळते. अण्णासाहेब किर्लोसकर त्याकाळात मिठाच्या व्यवसायानिमित्त गोव्यात असताना त्यांना बांदकरांच्या “शुक रंभा संवाद” नाटकाचा प्रयोग पाहाण्याचा योग आला. किर्लोसकरांना त्यांना तो फार आवडला. त्यांनी बांदकरांना आपल्या सोबत मुंबईला येण्याचे आमंत्रण दिले. परंतु बांदकरांनी आमंत्रण स्वीकारले नाही. आणि वर हेही सांगितले की आपण श्रीराम भक्त असून, केवळ भग्वदभक्तीच्या मार्गाने श्रध्दाळू भक्तांना सुजाण करण्याचे काम करतो. ही केवळ आपली रामभक्ती असल्याचे त्यांनी किर्लोसकरांना सांगितले. हीच प्रेरणा घेऊन, बांदकर महाराजांच्या आशिर्वादाने पुढे किर्लोसकरांनी मुंबईत “संगीत शाकुंतल” नाटकाची निर्मिती केली असल्याची महिती विश्वकोषात सापडते. अशा काही गोष्टी त्यांच्या संदर्भातील आढळतात. आणि म्हणूनच “अहिल्योद्धार” ही नाट्यकृती गोमंत रंगभूमीचा पाया असे संबोधले जाते.

तसं पाहिल्यास गोव्यात कितितरी देवस्थाने आहेत, जिथे उत्सवी रंगभूमीची चळवळ आजतागायत चालू आहे. म्हापसा शहरातील श्री महारूद्र प्रासादिक नाट्य मंडळ हे 1843 सालचे जेव्हा महारूद्र देवस्थान सुरू झाल तेव्हाचे. या नाट्यमंडळाची परंपरा म्हणजे रामनवमी ते हनुमानजयंतीपर्यंत उत्सव चालतो. या मंडळाच्या नाट्यपरंपरेचा उल्लेख आढळतो तो गौळणकाला सादर करण्यापासून. सुरूवातीला पाच दिवस उत्सव झाल्यावर शेवटच्या दिवशी गौळणकाला व्हायचा. स्थानिक बालकलाकार या गौळणकाल्यात सहभागी व्हायचे. पुढे याच उत्सवातून दर्जेदार, अभिजात अशी नाटके सादर होऊ लागली. महाराष्ट्रात मराठी रंगभूमी गाजवलेले रघुवीर सावकार, गोपीनाथ सावकार, वसंत सावकार हे याच नाट्यमंडळाचे कलाकार. सावकारांच्या “नाट्यबोधेच्छू नाट्य समाज” या संथेची मुहूर्तमेढ म्हापशाच्या महारूद्र देवस्थानातच रोवली गेली. गोव्यात अशा कितीतरी नाट्यसंस्था आहेत ज्यांची सुरूवात गौळणकाला, दशावतारी नाटके यापासून झाली आहे.

तर अशी ही गोमंतकीय नाट्यपरंपरा गोव्याच्या मातीत रुजलेली. बांदकरांनी त्याला समाजमान्यता दिली. रामभक्तीच्या माध्यमातून उदयास आलेली ही नाट्यपरंपरा. आजही गोव्याच्या कानाकोपर्‍यात उत्सवी रंगभूमीची सेवा होते आहे. विष्णू वाघांनी कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरांच्या जयंतीदिनी गोमंत रंगभूमी दिन साजरा करण्याची घोषणा केली. परंतु त्याही आधी 2004 साली गोव्यातील एक ज्येष्ठ नाटककार विजयकुमार नाईक़ यांनी “अहिल्योध्दार” नाटकाची पुन:रचना करून ते नाटक ठिकठिकाणी सादर केले. शंभर वर्षांच्या कालावधीनंतर बांदकरांच्या नाटकाला तसेच्या तसे रंगभूमीवर आणण्याचे धाडस विजयकुमार नाईक यांनी केले. विजयकुमार सांगतात, गोव्यातील गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष कै.शशिकांत नार्वेकर यांनी त्यांना अहिल्योध्दार नाटकाच्या मूळ प्रतीची झेरॉक्स प्रत दिली होती, जी जीर्ण झाली होती. त्यातून काहीच साध्य करण्यासारखे नव्हते. पुढे त्यांनी बांदकरांचे पणतू सिताकांत बांदकर यांची भेट घेऊन मूळ प्रत मिळवली व काम झाल्यावर ती त्यांच्या स्वाधीन परत केली. खरं तर या प्रतीत पुसटसे शब्द होते. तेव्हाची लिहिण्याची पध्दही वेगळी होती. परंतु विजयकुमार नाईक़ यांनी त्यांच्या संस्थेचे कलाकार मंदार जोग यांना घेऊन ती प्रत तशीच्या तशी लिहून काढली. आणि गोव्यातील आघाडीचे संगीतकार अजय नाईक यांनी नाट्यपदांना संगीत दिले. जसे बांदकर नाटक सादर करायचे, त्याच पध्दतीने विजयकुमार नाईक यांनी अहिल्योध्दारची निर्मिती केली. या नाटकाचे गोव्यात आणि गोव्याबाहेर मिळून चाळीसच्या वर प्रयोग झालेत. पहिला प्रयोग फोंड्याच्या राजीव कला मंदिरात 5 डिसेंबर 2004 साली झाला. गोव्याच्या सर्वच्या सर्व तालुक्यांमध्ये हे नाटक सादर करून विजयकुमार नाईक यांनी गोमंतकीय नाट्यकलेचा पाया कसा होता याची साक्ष दिली. त्यानंतर सोलापूर येथील नाट्य आराधना, चाळीसगावमधील रंगगंध संस्था, दादर माटुंगा येथील कल्चरल सेंटर, नेहरू सेंटरच्या संगीत नाटक फेस्टीव्हलमध्ये हे नाटक सादर करण्यात आले. हे नाटक विजयकुमार नाईक यांनी प्रकाशितही केले होते. तसेच अजय नाईक यांनी संगीतबध्द केलेली सीडीही आहे. यंदाच्या गोमंत रंगभूमीदिनी या सीडीचे आनावरण करण्यात आले.

विष्णू वाघांनी गोमंत रंगभूमीदिन सुरू करून बांदकरांच्या कार्याचा गौरव केला. आता कला अकादमीचे विद्यमान अध्यक्ष आणि गोवा राज्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे अकादमीचे उपक्रम पुढे नेत आहेत. यंदाच्या कार्यक्रमात त्यांनी कला अकादमीतर्फे “अहिल्योध्दार” नाटकाच्या सीडीसाठी पुढाकार घेतला. ते स्वत: एक उत्तम नाट्यकलाकार, लोककलाकार असल्याने, कलाकारांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोचतो, असे गोव्यातील कलाकार मानतात. ते स्वत:ला विष्णू वाघांचे शिष्य मानतात आणि तसे आहेही. वाघांमुळेच आपण रंगभूमीवर आलो आणि पुढे राजकारणातही असे ते प्रांजळपणे सांगतात. विष्णू वाघांनी आपल्या “शिवगोमंतक” या नाटकात त्यांना शिवाजीची भूमिका दिली होती, असे ते आवर्जुन सांगतात.

— कालिका बापट, 
पणजी, गोवा

नुकत्याच झालेल्या गोमंतक रंगभूमी दिनाला ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांच्या हस्ते कलाकारांचा गौरव आणि “अहिल्योध्दार” सीडीचे अनावरण करण्यात आले.

अहिल्योध्दार नाटकाच्या सीडीचे अनावरण करताना कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, अभिनेत्री वंदना गुप्ते. सोबत अजय नाईक़ व इतर मान्यवर.

 

अहिल्योध्दार नाटकातील प्रसंग

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..