पंचावन्न वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. कोल्हापूरमधील एका माध्यमिक शाळेच्या वर्गात, मागच्या रांगेतील बाकावरील मुलं दंगा करीत होती. वर्गात सर आले, त्यांनी पाहिलं की, मागे बसलेल्या खोडकर मुलांमध्ये एक मुलगा इतरांपेक्षा वेगळा आहे.. त्यांनी त्या मुलाला शिक्षकांच्या खोलीत बोलावले व तू त्या मुलांच्या नादी लागून, बिघडू नकोस असे समजावले. नंतर तो मुलगा पुढील बाकावर बसून, अभ्यासात लक्ष घालून जीवनात खूप यशस्वी झाला!! तो बंडखोर मुलगा म्हणजेच ‘आकाशवाणी, पुणे’चे सुप्रसिद्ध निवेदक, विनोदी एकपात्री कलाकार, विडंबन गीतकार, कवी, विनोदी लेखक.. बण्डा जोशी!!
सरांचा जन्म सर्व कलांची पंढरी असलेल्या कोल्हापूरचा!! वडिलांचं किराणा मालाचं दुकान होतं. घरात, दुकानात हाताशी येईल तो कागद वाचण्याची सरांना आवड होती. त्यांच्या मामांनी ही भाच्याची वाचन-आवड लक्षात घेऊन, सरांसाठी वाचनालयाची वर्गणी भरुन पुस्तकांच्या खजिन्याची चावी त्यांच्या हातात दिली. सरांनी रोज एका पुस्तकाचा फडशा पाडत वाचनालयातील, विविध विषयांवरील शेकडो पुस्तकं वाचून काढली.
महाविद्यालयीन जीवनात लेखन, कविता, सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी होऊन स्नेह संमेलनं दणाणून सोडली. याच काळात नाटकातील कामं, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांमध्ये भाग घेऊन असंख्य प्रमाणपत्र, प्रशस्तिपत्र प्राप्त केली.
महाविद्यालयातील शेठ सरांनी प्रोत्साहन देऊन, सरांची उमेद वाढवली. सरांच्या पत्नी आजारी असायच्या. सरांनी घरी जाऊन, पुस्तकं, गोष्टी वाचून दाखवून, त्यांचं मनोरंजन करुन, त्यांच्या शारीरिक वेदना काही काळासाठी विसरायला मदत केली.
शिक्षण पूर्ण झाल्यावर सरांनी किर्लोस्करवाडीत काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर पुण्यात कामगार कल्याण केंद्रात काही वर्षे सांस्कृतिक कार्यक्रमांचा कारभार सांभाळला.
या दरम्यान कविता करणं चालूच होतं. एका कविता स्पर्धेत बाबूजींच्या हस्ते प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. तेव्हा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इमारती समोरुन जाताना सरांना, मराठीतील या थोर लेखकांविषयीच्या आदरभावनेने संस्थेबद्दल कुतूहल वाटायचे. त्याकाळी पाहिलेल्या स्वप्नाची परिणीती म्हणजे, आज सर या संस्थेचे कार्यवाह आहेत..
सरांना आकाशवाणीत नोकरी करण्याची महत्त्वाकांक्षा होती. ती संधी आली तेव्हा हजार उमेदवारांतून, सरांची स्वकर्तुत्वावर नियुक्ती झाली. नोकरीच्या कालावधीत पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, पुरुषोत्तम दारव्हेकर, इत्यादींचा सहवास लाभला. याच दरम्यान सरांचे ‘हास्यपंचमी’चे एकपात्री प्रयोग सुरु झाले होते.
नोकरीतून व्हीआरएस घेतल्यानंतर सरांनी एकपात्रीचे हजारों प्रयोग करुन लाखों रसिकांना मनमुराद हसवलंय. शेकडो विडंबन कविता केल्या आहेत. सरांची दोन पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत.
बण्डा जोशी सरांचा गेले तीस वर्षांहून अधिक काळ आम्हा बंधूंशी आपुलकीचं नातं आहे.. आठवड्यातून एकदा तरी आमची भेट झाली नाही, असं कधी घडत नाही.. भेटलं की पोटभर गप्पा व घोटभर चहा होतोच!!
आज सरांचा वाढदिवस! सरांनी सत्तरी ओलांडून एकाहत्तराव्या वर्षात पदार्पण केलंय.. मी तर असं म्हणेन की, सातावर एक नव्हे तर उलट, एकावर सात.. म्हणजे आमचे सर अजूनही सतरा वर्षांचे, तरूण राज’बण्डा’ आहेत!!!
बण्डा जोशी सरांना, वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!!!
© – सुरेश नावडकर १०-८-२१
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत
Leave a Reply