ऐलमा पैलमा गणेश देवा,
माझा नवरा बदलून दे,
करीन तुझी सेवा.
जन्मोजन्मी कसल एका जन्मी झाले बो……र
मी नाही गुंडाळायची वडाला आता दोर,
कोणे एकेकाळी कसा फिदा होता माझ्यावर,
ओफिसातून थेट कसा घरी यायचा भरभर,
न चुकता घेऊन येत असे फूल आणि गजरा
व्हेलेंटाईन डे तर रोज व्हायचा साजरा.
ह्यांच्या नजरा ……त्यांच्या नजरा,
लागल्या आमच्या संसारा.
घर ,पाहुणे ,मुलांमध्ये मी झाले दंग,
बघता बघता रोमान्साचा झाला बेरंग,
क्षुल्लक कारणावरून उडू लागलेत खटके,
सासुबाईंचे मधे मध्ये शाब्दिक फटके.
ओफिसातून घरी हल्ली रोज येतात लेट,
तुमच्यासाठी कमावतोय ही वरती भेट.
लोळण,पेपर,मित्र पत्ते हाच ह्यांचा रविवार,
मुलांसंगे बाहेर जायला नाही म्हणे जमणार.
दहा वर्षात देवा माझी झाली अशी दैना
ह्यांनाच धडा शिकवायच आलय माझ्या मना
म्हणून म्हणते हात जोडून गणेश देवा ,
एक्सेंज ओफरचे तेव्हढे मनावर घ्याना.
मीच काय किती जणी करतील तुमची सेवा,
ऐलमा पैलमा गणेश देवा………
— सरिता मुकादम
Leave a Reply