जन्म.१४ ऑगस्ट १९२० गोवा येथे.
त्यांचे वडील निष्णात शल्यचिकित्सक श्यामराव मुळगावकर हे ‘फेलो ऑफ दि रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स’ (एफ.आर.सी.एस.) ही त्या काळातील सर्वोच्च पदवी मिळविणारे पहिले भारतीय डॉक्टर होते. हृषिकेश मुळगांवकर यांनी केंब्रिज विद्यापीठातून यांत्रिकी अभियांत्रिकीची पदवी संपादित केली. त्यानंतर ते ब्रिटिश राजवटीतील ‘रॉयल इंडियन एअर फोर्स’मध्ये ३०नोव्हेंबर १९४० रोजी दाखल झाले.
दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास त्यांची हवाईदलाची कारकीर्द सुरू झाली. त्यांच्या नंबर वन स्क्वॉड्रनला जपान्यांविरुद्ध लढण्यासाठी ब्रह्मदेश आघाडीवर पाठविण्यात आले. रंगून, चितगाव यांसारख्या तळांवरून त्यांनी विमानाच्या २८० तासांच्या २२० चढाया केल्या. ब्रह्मदेशातून परतल्यानंतर ते प्रथम नंबर टेन स्क्वॉॅड्रन आणि नंतर नंबर फोर स्कॉड्रनमध्ये सामील झाले. १९४५मध्ये एक जीवघेणा प्रसंग त्यांच्यावर गुदरला होता. कॉक्स बझारजवळ असलेल्या होवे येथून त्यांनी ‘स्पिटफायर’मधून उड्डाण केले आणि काही क्षणांतच त्यांच्या विमानाचे इंजिनच नादुरुस्त झाले. त्यांनी अगदी कसोशीने समुद्रकिनार्याहवर ते विमान उतरविण्याचा प्रयत्न केला. ते यात यशस्वी झाले; पण विमान समुद्रात घुसले होते. मुळगांवकर सीटलाच अडकून पडले होते.
भरतीचे पाणी वाढू लागल्याने ते बुडण्याची दाट शक्यता होती. तेवढ्यात या अपघातग्रस्त विमानाकडे दोन ब्रिटिश अधिकाऱ्यांचे लक्ष गेले. धावतपळत जाऊन त्यांनी मुळगांवकरांना विमानाबाहेर काढले. प्राणावरचे संकट निभावले होते. पाठीच्या पाच मणक्यांना गंभीर इजा झाली होती; पण सहा महिन्यांत ते खडखडीत बरे झाले.
फाळणीनंतर काश्मीरवर पाकिस्तानने जेव्हा हल्ला केला, तेव्हा ते क्रमांक एकच्या विंगचे प्रमुख म्हणजे ‘विंग कमांडर’ होते. भारतीय लष्कराला हवाई संरक्षण देण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. प्रसिद्ध झोजी खिंडीतील लढाईदरम्यान हवाई हल्ल्याचे नेतृत्व त्यांनी स्वत: जातीने केले. होंकर टेम्पेस्ट-२ या विमानातून हल्ले करून त्यांनी शत्रूच्या ताब्यातील मोक्याचा डोमेल पूल उद्ध्वस्त केला होता. या धाडसी, पराक्रमी कामगिरीबद्दल त्यांना ८ डिसेंबर १९५० रोजी ‘महावीरचक्र’ प्रदान करण्यात आले.
ओरेगॉन विमानांची चाचणी घेण्यासाठी तेे १९५१ मध्ये फ्रान्सला गेले आणि येताना ते स्वत:च विमान चालवीत भारतात परतले. दुसर्याे पिढीतील लढाऊ विमानांच्या चाचण्या घेण्यासाठी १९५४मध्ये फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये पाठविलेल्या पथकात तेही होते. पुढे १९६२मध्ये त्यांना विमानभेदी क्षेपणास्त्रांच्या अभ्यासासाठी रशियात पाठविण्यात आले. त्यांच्याच शिफारशीनुसार, भारत सरकारने रशियाकडून जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र यंत्रणा (सरफेस टू एअर मिसाइल सिस्टिम्स) खरेदी केली. तेव्हापासून भारतात क्षेपणास्त्रांचे युग सुरू झाले, असे म्हणता येईल.
मुळगांवकर यांनी आपल्या कारकिर्दीत ६३ प्रकारची वेगवेगळी विमाने चालविली. त्यांपैकी २२ विमाने जेट होती. हा एक जागतिक विक्रमच म्हणावा लागेल. वेगवेगळ्या प्रकारची विमाने चालविण्यासाठी प्रत्येक वेळी काही आठवड्यांचे कन्व्हर्जन ट्रेनिंग घ्यावे लागते, हे लक्षात घेतले तर त्यांचे अष्टपैलुत्व सहजपणे लक्षात येईल. मुळगांवकरांच्या नावे आणखी एक विक्रम जमा होतो. ‘मिग-२१’ हे स्वनातीत (ध्वनीच्या वेगापेक्षा जलद गतीचे) विमान चालविणारे ते पहिले भारतीय वैमानिक ठरले. वायुसेनाप्रमुख झाल्यानंतरही ते ‘मिग-२१’ चालवीत असत. वायुसेनेला स्वनातीत युगात नेणारे युगपुरुष असे त्यांचे सार्थ वर्णन केले जाते.
दि.३० नोव्हेंबर १९४० ते दि.१ सप्टेंबर १९७८ या प्रदीर्घ सेवा कालावधीत त्यांनी जबाबदारीची अनेक पदे भूषविली. त्यांनी स्टाफ आणि ऑपरेशनल अशा दोन्ही प्रकारच्या सांभाळलेल्या जबाबदाऱ्या पाहिल्या, तर त्यांच्यातील विलक्षण गुणवत्ता, क्षमता व कौशल्याची कल्पना येते. त्यांनी डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स (हवाई मुख्यालय), डायरेक्टर ऑफ पॉलिसी प्लॅन्स (हवाई मुख्यालय), नॅशनल डिफेन्स कॉलेजचे कमांडंट, एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (सेंट्रल कमांड), एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (वेस्टर्न कमांड) अशी पदे भूषविली. १९७१च्या बांगलादेश मुक्तियुद्धात ते वायुसेनेचे उपप्रमुख होते.
त्यांच्या गौरवशाली सेवेबद्दल त्यांना १९७६मध्ये ‘परमविशिष्ट सेवा पदका’ने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर काही दिवसांतच १ फेब्रुवारी १९७६ रोजी त्यांची वायुसेना प्रमुखपदी (चीफ ऑफ एअर स्टाफ) नियुक्ती करण्यात आली. वायुसेनाप्रमुख म्हणून त्यांची कारकीर्द प्रामुख्याने दोन गोष्टींसाठी ओळखली जाईल: एक म्हणजे हवाई सुरक्षाविषयक नियमावलींची उच्च कोटीची अंमलबजावणी. स्टेशन कमांडर असल्यापासून ते हवाई सुरक्षेबाबत कमालीचे जागरूक होते. त्या संदर्भात विविध सुधारणा आणि नियमांची अंमलबजावणी करण्यामध्ये त्यांचा दृष्टिकोन अत्यंत गांभीर्यपूर्ण होता. याचा परिणाम स्वाभाविकपणे जबरदस्त होता. त्यांच्या कारकिर्दीत हवाई अपघातांचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले होते.
त्यांची दुसरी कामगिरी म्हणजे, सात वर्षांपासून प्रलंबित असलेला जाग्वार विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव त्यांनी मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळाकडून चिकाटीने, जिद्दीने संमत करून घेतला. याच जाग्वारमुळे संपूर्ण पाकिस्तान प्रथमच भारतीय वायुसेनेच्या माऱ्याच्या टप्प्यात आला. आजही ही विमाने वायुसेनेचा कणा आहेत. तंत्रज्ञानाची आवड तसेच जाण असल्यामुळे त्यांनी बजाज टेम्पो आणि फेरांटी या कंपन्यांचे तंत्रविषयक सल्लागार म्हणून काम पाहिले.
‘लीडिंग फ्रॉम दि कॉकपीट : अ फायटर पायलट स्टोरी’ ह्या नावाने त्यांनी आत्मचरित्र लिहीले आहे.
अशा या कर्तुत्ववान अधिकाऱ्याचे वृद्धापकाळाने पुण्यात ९ एप्रिल २०१५ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply