आरू, लता आणि राज, त्यांच्या गावी ट्रीपला आले. 14 फेब्रुवारीला राज आणि लता गढीवर फिरायला गेले. लता एकटीच परत आली. तिनं सांगितलं, राज तिच्याशी भांडण करून निघून गेलाय. त्यानंतर राज परत कधीच, कुणालाच दिसला नाही. त्याला शेवटचं भेटलेली व्यक्ती लता आहे. पण राजच्या शोधला उपयोगी पडेल असे कोणतेच उत्तर ती देत नाहीये….
या घटनेला चार वर्षे झाली आहेत. काय रहस्य आहे राजच्या गायब होण्यामागे? तो खरंच निघून गेलाय? की राजचा खून झालाय? की कोणी त्याचे अपहरण केलंय? राजने आत्महत्या केलीय की आणखी काही? ….
राजचं नेमकं काय झालंय हे शोधण्यासाठी तुम्हीही येताय ना माझ्याबरोबर?…. चला तर मग..…..
अजब न्याय नियतीचा -भाग – १ (एक)
आरुंधती परांजपे….. एक २५ वर्षे वयाची, दिसायला खूप सुरेख, हसऱ्या चेहेऱ्याची, आनंदी स्वभावाची, फॅशनची आवड असणारी मुलगी. शाळेत असल्यापासून तिला नाच, गाणं, नाटक याची आवड होती. तिचा आवाजही खूप गोड होता. शाळेत असताना प्रार्थना, समूहगीते, गायन स्पर्धा यामध्ये ती हिरिरीने भाग घेत असे. शिवाय ती अभ्यासातही हुशार होती, त्यामुळे ‘आरुंधती’ ऊर्फ ‘आरू’ सगळ्यांची लाडकी होती.
आरू कॉलेजमध्ये असताना सर्व ऍक्टिव्हिटीजमध्ये हौसेने भाग घेत असे आणि त्या प्रत्येक स्पर्धेत पहिले बक्षिस आरूला मिळणार हे जणु ठरलेलेच असे.
ग्रॅज्युएशन झाल्यावर आरूच्या कॉलेजमधील, तिच्यासारखीच गाण्याची आवड असणाऱ्या मित्रमैत्रिणींनी मिळून ‘सप्तसूर’ नावाचा एक म्युझिकल ऑर्केस्ट्रा बनवला होता. जुनी-नवी मराठी-हिंदी गाणी, काही इंग्रजी पॉप संगीत, पंजाबी गीतं अशा विविधतेने नटलेला आरूचा ऑर्केस्ट्रा अल्पावधीतच लोकप्रिय झाला होता. त्यांच्या ऑर्केस्ट्राला संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच दिल्ली, गुजरात, चेन्नई अशा देशाच्या विविध भागातूनही बोलावणी येत असत. त्यामुळे रोज तीन तास हॉलवर प्रॅक्टिस, प्रोग्रामसाठी भ्रमंती, छोटे मोठे इव्हेन्ट्स एन्जॉय करणे या सगळ्यात तिचा वेळ कसा जात असे तिचे तिलाही समजत नव्हते.
नुकताच तिचा हिंदी सोलो गाण्यांचा एक अल्बम प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे आरू एकदम पॉप्युलर झाली होती. रोज तिला असंख्य अभिनंदनाचे कॉल्स येत होते.
यूट्यूब, फेसबुक, इन्स्टावर आरू एकदम फेमस झाली होती, त्यामुळे आरू खूपच आनंदात होती.
एक दिवस आरू त्यांचा हॉलवर गाण्यांची प्रॅक्टिस करत असताना एक मुलगा आरूची चौकशी करत हॉलवर आला. साधारण सव्वा सहा फूट उंची, कुरळे केस, गोरापान, चेहेऱ्यावर कायम हसू, पाहणाऱ्या कोणालाही प्रथम दर्शनीच आवडेल असे व्यक्तिमत्व असलेला एक मुलगा आरू बद्दल विचारत होता. त्याने जेव्हा हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हा सगळा ग्रुप आपापले प्रॅक्टिस थांबवून त्याच्याकडे पाहताच राहिला.
त्याने विचारले, ‘मला मिस आरुंधतींना भेटायचे होते. इथेच असतात नं त्या ?’
एव्हडा देखणा मुलगा तिची चौकशी करत होता? त्याचा प्रश्न जणु तिला ऐकूच आला नाही. ती एकटक त्याच्याकडे पाहतच राहिली होती. तो हळुहळु चालत तिच्यापर्यंत येऊन पोहोचला. त्याला असे हसत हसत चालत येताना पाहून तिला राहून राहून असे वाटत होते की, याला मी आधी कुठेतरी नक्कीच पाहिले आहे, पण कुठे ते काही तिला आठवेना.
तिची मैत्रीण, नेहाने तिला हळुच चिमटा काढला तेव्हां ती भानावर आली.
“क..क… क्काय झाले ?” ती बावचळून म्हणाली.
“आरू, अगं लक्ष कुठंय तुझं? तो मुलगा तुझी चौकशी करतोय.”
आरूने परत एकदा त्या मुलाकडे पाहिले आणि “हॅलो” म्हणाली.
तो मुलगा तिच्या समोर येऊन उभा राहिला आणि शेकहॅण्ड साठी हात पुढे करून म्हणाला, “हॅलो, मी नील, नीलकांत जोगळेकर. माझे सगळे मित्र मला ‘नीलच’ म्हणतात. मी, मिस अरुंधतींना भेटायला आलोय.”
“ओ, …. हॅलो नील, मीच आरुंधती ….. ग्लॅड टू मीट यू. बोल काय काम होतं तुझं माझ्याकडे?”
“मी दिल्लीहून आलोय, मला गाण्यांची आणि संगीताची खूप आवड आहे. मी गिटार वाजवतो आणि गाणीही गातो. मी गायलेल्या पॉप गीतांचा एक अल्बम मागल्या वर्षी रिलीज झाला आहे. पण मला क्लासिकल, सुगम संगीत, मराठी-हिंदीतील जुनी-नवी गाणी म्हणायला, शिकायला आणि गिटारवर वाजवायला खूप आवडेल. तुमच्या ऑर्केस्ट्राबद्दल खूप ऐकून होतो. तुमचा अल्बम पण छान झालाय. म्हणून म्हटलं, मुंबईत आलोच आहोत तर अरुंधती आणि त्यांच्या टीमची गाठ घेऊन पाहावं.”
तेवढयात नेहा म्हणाली, “नील, मी पाहिला होता तुझा अल्बम. मस्त गाणी आहेत सगळी. आवडली मला.”
सुयश म्हणाला, “इथं मुंबईत तुझं कुणी आहे का?”
“हो, पेडर रोडवर माझी मावशी राहाते. मी सध्या तिच्याकडेच थांबलोय. तिच्या मिस्टरांचा रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे. माझ्या एका गाण्यावर काम चालू आहे तिथे. मिनव्हाईल तुमच्या ऑर्केस्ट्राला भेट द्यावी म्हणून आलो.”
आरू म्हणाली, “बरं झालं तू आम्हाला भेटायला आलास ते. तसंही आम्हाला एका गिटारिस्टची आवश्यकता होतीच. तू गाणीही म्हणतोस, तर काहीच हरकत नाही. बघू आपण, आपलं ट्युनिंग कसं काय जमतं ते, मग ठरवू. बाय द वे, तू किती दिवस आहेस मुंबईत?”
“सध्यातरी महिनाभरासाठी आलोय. जर तुम्ही मला तुमच्या ग्रुप मध्ये सामील करून घेतलंत, तर कदाचित माझा मुक्काम वाढू शकतो.”
“ओके नील, मी तुला आपल्या टीमची ओळख करून देते. मी आरुंधती, पण माझे सगळे मित्र मला ‘आरूच’ म्हणतात.”
“हा सुयश, ही नेहा, रुपेश, मैथिली, गिरीश आणि ही अंजली, अशी ही आपली ‘सप्तसूर’ची टीम.”
मैथिली म्हणाली, “वेलकम नील, तुझं आपल्या टीममध्ये खूप खूप स्वागत.”
मग एकेक करत सगळ्या टीम मेम्बर्सनी नीलशी शेकहॅण्ड करत त्याचे स्वागत केले. काही मिनिटांतच नील जणू या ग्रुपमधलाच असल्यासारखा कम्फर्टेबल झाला आणि ग्रुपमध्ये मिसळून गेला.
रुपेश म्हणाला, “चलो नील, इस बात पें कुछ नया हो जाय. नील, तू तुझ्या अल्बममधलं एखादं छानसं गाणं म्हणून दाखवतोस का? म्हणजे आम्हालाही तुला प्रत्यक्ष गाताना बघायचा आनंद मिळेल.”
“हो…. हो….. नील…… खरंच, आम्हाला सगळ्यांनाच तुझं गाणं ऐकायला आवडेल.”
नीलने एकदा आरुकडे पहिले. तिनं नजरेनंच त्याला गाणं म्हणण्यासाठी होकार दिला.
मग नीलने त्याच्या अल्बममधील एक सुश्राव्य गाणं स्वतः गिटार वाजवत म्हणून दाखवलं. गाणं संपेपर्यंत सगळीजणं अगदी मंत्रमुग्ध होऊन गेली होती. नीलचा आवाजही खूप सुरेख होता आणि तो गिटारही खूप छान वाजवत होता. गाण्याची चालही सुंदर होती.
हे सगळं पाहून आणि ऐकून आरू तर नीलच्या प्रेमातच पडली जणु.
(क्रमशः)
— © संध्या प्रकाश बापट
*************************************
सदरील कथा आवडल्यास संपूर्ण कथा अथवा कथेचा कोणताही भाग माझ्या नावासह शेअर करण्यास माझी कोणतीही हरकत नसेल.
**************************************
Leave a Reply