नवीन लेखन...

अजब न्याय नियतीचा – भाग १३

या गढीचे वेगळे वैशिष्ट्य आणि ऐतिहासिक महत्त्व असलेली गोष्ट म्हणजे गढीतील “गोलमहाल आणि विहीर”
“गोलमहाल म्हणजे?” आरूने विचारले, तीही हे सगळे पहिल्यांदाच ऐकत होती.

दी सांगू लागली …… “आमच्या पूर्वजांनी गढीमध्येच एक तीन मजली गोल असा सुंदर महाल बांधला होता. त्या महालाच्या मध्यभागी २५ फूट व्यासाची आणि तीन मजले खोलीची, म्हणजे अंदाजे चाळीस फूट खोल,गोड्या पाण्याची विहीर होती. गढीच्या शेजारूनच नदी जात असल्यामुळे विहिरीला बारमाही पाणी असे. शिवाय महालाच्या बाहेरील बाजूसही मोठमोठे चर खणून पावसाळ्यातील पाणी त्यात साठवून ते पाणी विहिरीत मुरवले जाईल अशी व्यवस्था केली होती. त्यामुळे गढीवर कितीही माणसांचा राबता असला तरी कधीही गढीमध्ये पाण्याची कमतरता पडत नसे.”
नीलला या माहितीचे खूप अप्रूप वाटत होते. “Wow, म्हणजे आत्ता सगळीकडे rain water harvesting system वापरा म्हणतात, ती इतक्या पूर्वी वापरात होती? Great.”

“त्या दृष्टीने पहिले तर या गोष्टीला खरोखरच ऐतिहासिक महत्त्व आहे.”

आरूने विचारले, “दी पण एवढ्या खोल विहिरीतून पाणी कसे काढत असतील. पूर्वी विहिरीवर मोटर्स बसवता येत नसतील ना?”

“त्याहून भारी सिस्टिम ते वापरात होते. त्यावेळी या विहिरीवर एक खूप मोट्ठी मोट बसवण्यात आली होती. तिला भरपूर कप्पे असत. त्या मोटेने पाणी काढण्यासाठी २० बैल, मोट ओढण्यासाठी जुंपत असत. त्यामुळे एकाच वेळी भरपूर पाणी उपसता येत असे. ते पाणी महालाबाहेरील एका मोठ्या हौदात सोडत आणि तिथून सर्व गढीला पाणी पुरवठा होत असे.”
“कित्ती छान आयडिया आहे ना?”

“या महालाचे अजून एक वैशिष्ट्य होते. विहिरीवरील महालाच्या प्रत्येक मजल्यावर एका खिडकीत रहाट बांधलेले होते. त्यामुळे त्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांना जेवढी पाण्याची गरज असेल ती या रहाटाच्या साहाय्याने पाणी ओढून भागवली जात असे. महिलांना पाणी भरायचे कमीतकमी कष्ट पडावेत म्हणून या सोयी. म्हणजे त्या काळीही महिलांच्या कष्टांचा आणि सोयीचा विचार केला जायचा बरं.”

आरू आणि नील अगदी मन लावून दी सांगत असलेली माहिती ऐकत होते. नील म्हणाला, “लता मला सांग, विहीर जर एव्हढी खोल असेल तर विहिरीत चुकून कोणी पडलं, माणुस किंवा बाई, किंवा घागर, बादली अशी वस्तु पडली, तर ते बाहेर कसं काढत असतील?”

हा प्रश्न ऐकून दी एकदम दचकलीच. मग जरा सावरून ती म्हणाली, “विहीर बांधताना तिला एका बाजूने आत जायला पायऱ्या बांधलेल्या आहेत. मोट चालू नसेल आणि थोड्या प्रमाणात पाण्याची गरज असेल, तर नोकर माणसं त्या पायऱ्यांवरून उतरून आत जात असत आणि पाणी आणत असत. शिवाय वरचेवर विहिरीच्या पाण्याची साफसफाई करावी लागत असे. आतील झरे मोकळे राहण्यासाठी पाण्याची पातळी कमी झाली की आतील भिंतीत वाढलेली झाडे झुडपे कापावी लागत. तसेच विहिरीत पडलेल्या वस्तू काढण्यासाठी पट्टीची पोहणारी माणसे गढीवर नेमलेली असत. खूपच महत्त्वाची वस्तू पाण्यात पडली तर हीच माणसे पाण्यात बुडी मारून त्या वस्तू काढत असत. नाहीतर किरकोळ वस्तूंसाठी इतक्या खोल उतरण्याची रीस्क कोणी घेत नसत. समजा एखादा माणुस किंवा बाई विहिरीत पडली आणि लगेच लक्षात आले तर ती पट्टीची पोहणारी माणसं विहिरीत उडी टाकून त्यांना बाहेर काढत. मग पायऱ्यांवरून किंवा

वरच्या मजल्यावरील राहाटाच्या दोराला धरून बाहेर काढत असत.”

“बापरे, प्रत्येक गोष्टीचा किती विचार करून बांधकाम केले असेल ना त्यांनी? मग लता आपण जावूया का ती गढी आतून पाहायला? मला तो ‘विहिरीचा महाल’ कधी एकदा पाहतो असं झालं आहे.” नीलने विचारले.

आरू म्हणाली, “हो दी …. मला पण खूप उत्सुकता लागली आहे तो महाल आणि ती विहीर पाहण्याची. आपण खरं तर इतकी वर्ष इथे येतो, पण तू मला कधीच या गढीत घेऊन गेली नाहीस. आता मात्र मी तुझं अज्जीबात ऐकणार नाही. आपण जायचं म्हणजे जायचं.”

“अगं हो हो हो….किती एक्साईट झालाय तुम्ही गढीवर जायला? मी आत्ता हे जे काही गढीचं आणि महालाचं वर्णन केलं ना, ते खूप पूर्वी गढी कशी होती ते बाबांनी मला जसं सांगितलं होतं, ते जसंच्या तसं मी तुम्हाला सांगितलं. पण आत्ता ती तशी नाहीये. कालौघात गढीचे ते सौन्दर्य केव्हाच नष्ट झालंय. आता वर्षानुवर्षे तिथं कोणी फिरकलेलं नाही. त्यामुळे सगळीकडे नुसती गवत आणि झाडी वाढलीय. आतली घरं, बंगल्या, महाल, कोठ्या या सगळ्याच गोष्टींची पडझड झालीय. काही ठिकाणी तर घरांची जोतीच शिल्लक राहीलीत. अशावेळी आपण तिथं जाणं आपल्यासाठी सुरक्षीत नाहीये. कळलं का आरू? म्हणून मी तुला कधी तिकडे घेऊन गेले नाही.”

आरू नीलला म्हणाली, “ए नील, आता तूच सांग ना दीला. आपण गढीवर जाऊ. जिथपर्यंत आपल्याला सुरक्षित वाटेल तिथपर्यंत जात राहू. जाताना आपण दुर्बीण बरोबर घेऊन जाऊया. जिथं आपण जाऊ शकणार नाही ते दुर्बिणीतून पाहू आणि परत येऊ. कोणीतरी माहितगार मिळाला तर त्याला सोबत घेऊन जाऊया ना? कशी आहे आयडिया?”

“आरू, मला तरी नाही वाटत की आपण त्या गढीत जावं असं.” दी रागावून म्हणाली.

आरू म्हणाली, “पण का दी? इथपर्यंत येऊन गढी आणि गोलमहाल न बघता परत जायचं हे निदान मला तरी पटत नाही.”

यावर दी कांही बोलणार इतक्यात…… त्यांना इस्टेटीचे मॅनेजर श्री. केळकर त्यांच्याच दिशेने येताना दिसले. केळकर काका साधारण ५५ ते ५८ वयाचे, डोळ्यावर सोनेरी फ्रेमचा चष्मा, चॉकलेटी रंगाची जुन्या पद्धतीची पॅन्ट, तिच्यात पांढरा शर्ट खोचलेला, डोक्यावरचे केस बऱ्यापैकी तुरळक झालेले, मधून मधून रुपेरी केसांची झलक डोकावत होती, अनुभवाने समृद्ध असा चेहेरा, ते हातात काही कागदपत्रांचा फोल्डर घेऊन येत होते.

ते जवळ येताच दीकडे पाहून हसले आणि अनुनासिक स्वरात म्हणाले, “Good Morning ताईसाहेब, मी आत्ता वाड्यावर गेलो होतो तुम्हाला भेटायला. लक्ष्मणने सांगितले की तुम्ही इकडे टेकडीवर फिरायला आला आहात, म्हणून तडक इकडेच आलो तुमची गाठ घ्यायला. Sorry, पण माझ्या इथे येण्याने तुमच्या फिरण्यात व्यत्यय तर नाही ना आला?”

दी म्हणाली, “नाही केळकर साहेब, तसं काही नाही. आपण त्या पारावर बसून बोलूयात का? आणि ही कसली कागदपत्रे घेऊन आला आहात आपण?”

“ताईसाहेब, आपण मागे चार वर्षांपूर्वी आला होतात, तेव्हा आपल्या इस्टेटीच्या कांही कागदपत्रांवर तुम्हां दोघींची नांवे लावण्यासाठी अर्ज दिले होते. तिथे आपली नांवे लागली आहेत. त्याचे latest उतारे काढून आणले आहेत ते द्यायचे होते. खर्चाचे आणि मिळकतीचे काही हिशेब दाखवायचे होते. तसेच आपल्या शेतीसाठी काही नवीन अवजारे, यंत्रे खरेदी करावयाची आहेत. आधुनिक पद्धतीने शेतीत काही बदल करून पाहायचे आहेत, त्या बाबतची माहिती आणि अंदाजे होणाऱ्या खर्चाची माहिती पण यात दिलेली आहे. आत्ता तुम्ही फक्त ही कागदपत्रे तुमच्या ताब्यात घ्या. तुम्हाला नंतर सवड मिळेल तेव्हा व्यवस्थित पाहून घ्या आणि मग मला निरोप धाडा, मी येऊन तुम्हाला सर्व तपशील समजावून सांगेन.”

“ठीक आहे. मी पाहून घेईन. तसंही तुम्ही नेहमीच इस्टेटीच्या भल्यासाठी योग्य ते निर्णय घेताच. आमचा तेवढा विश्वास आहे तुमच्यावर. बरं, ते गढीच्या कामाचं सांगितलं होतं त्याचं काय झालं?”

“ताईसाहेब, गढीच्या मिळकतीमध्ये काहीही बदल करायचे झाले तर त्यासाठी आपल्याला तशी सरकारी खात्यातून परवानगी घ्यावी लागते. ऐतिहासिक वास्तु आहे ना ती? मागे आपण सांगितल्याप्रमाणे मी तशा कायदेशीर परवानग्या काढल्या आहेत. आता आपण त्या महालातील विहीर बुजवू शकतो.”

इतका वेळ आरू आणि नील त्या दोघांचे संभाषण ऐकत बसले होते. विहीर बुजवण्याचा विषय निघाल्यावर मात्र ते उडालेच.

आरू जवळ जवळ ओरडलीच, “दी sss, आपण ती ऐतिहासिक विहीर बुजवणार आहोत? पण का?”

“अगं आरू, पूर्वी त्या विहिरीचा वापर होत होता तेव्हा तिला बारा महिने पाणी असे. तिची साफसफाई ठेवली जात असे. पण गेले कित्येक वर्ष तिचा वापर बंद असल्यामुळे आणि महालाची पडझड होऊन दगड, माती, वीटा विहिरीत पडल्यामुळे तिचे अंतर्गत प्रवाह बंद झाले आहेत. पूर्वी तिच्यात ४० फूट खोल पाणी असायचे, पण आता सात आठ फूट सुद्धा पाणी नाही त्यात. आतमध्ये विहिरीच्या भिंतीतून झाडंझुडुपं पण चिक्कार वाढली आहेत. चुकून कोणी अनोळखी माणूस, प्राणी, गुरं ढोरं विहिरीत पडले तर त्यांना बाहेर काढण्यासाठी बाजूचे रहाट, आतल्या पायऱ्या तेही अस्तित्वात नाहीत. ती गढी कायद्याने आपल्या मालकीची असल्याने तिथे होणाऱ्या अपघाताला, आता मालक म्हणून आपण जबाबदार ठरतो. ही Risk घेण्यापेक्षा मला तरी ती बुजवून टाकणेच जास्त योग्य वाटतंय, आणी आपल्या आत्ताच्या उत्पन्नात आपण ती गढी maintain ही ठेवू शकत नाही. आपल्याला गढी सांभाळण्याचा काय फायदा आहे ना? म्हणून मी हा निर्णय घेतला आहे.”

मॅनेजर केळकर म्हणाले, “बरोबर आहे ताईसाहेबांचा निर्णय. फक्त काही कायदेशीर उणीव राहू नये म्हणून मी इतके दिवस थांबलो होतो. आता तुम्ही आलाच आहात तर तुमच्या परवानगीने हे ही काम करून टाकू. कसें?”
दी म्हणाली, “ठीक आहे केळकर साहेब. तुम्ही त्यासाठी कामगारांची व्यवस्था करा आणि मला निरोप द्या, हे काम केव्हा पूर्ण होईल त्याचा.”

केळकर साहेब सर्व कागदपत्रे दीकडे देऊन निघून गेले. ५-१० मिनिटं ते सगळे तिथंच पारावर बसले पण कोणीच काही बोलेना. मग दी उठून पायऱ्या उतरू लागली. आरू आणि नीलही तिच्या पाठोपाठ पायऱ्या उतरू लागले. आरू गाल फुगवून, रागाने पाय आपटत उतरत होती. नीलही कांही न बोलता जात होता.

थोडे अंतर उतरल्यावर शेवटी दीने विचारले, “आरू, एवढं काय झालंय तुला रुसायला आणि पाय आपटायला?”
आरू रुसक्या आवाजात लाडाने म्हणाली, “दीsss, तू आत्तापर्यंत माझा प्रत्येक हट्ट पुरवलास….. मला कधीही कोणत्याच गोष्टीला तू नाही म्हणाली नाहीस. मग आजच तू गढीवर जायला नाही का म्हणतेस?….. आपण लक्ष्मण काकांना किंवा केळकर काकांना आपल्या सोबत घेऊन जाऊ. मला फक्त एकदाच ती गढी, तो महाल आणि ती विहीर पाहायचीच आहे आणि आता तर तू ती बजावूनही टाकणार आहेस. त्यापूर्वी आपण महालाचे आणि विहिरीचेही खूप सारे फोटोग्राफ्स काढून ठेवू. म्हणजे ती विहीर आणि तो महाल फोटोच्या रूपाने का होईना पण आपल्या आठवणीत राहील. नाही का? दी ssss, प्लिssssज दी, फक्त एकदाच आम्हाला घेऊन जा ना तिथे. ए नील तू तरी सांग ना हिला. तुझं ऐकेल ती. प्लिssssज दी, फक्त एकदाच.”

नीलही दीला म्हणाला, “लता खरंच मला आणि आरूला फक्त एकदाच गढीवर घेऊन जा. please.”

“तुम्ही जर माझं ऐकणारच नसाल तर ठीक आहे. आज आपण बाकीची ठिकाणं पाहून घेऊ आणि उद्या आपण गढीवर जाऊ. मी केळकर काकांशी बोलून घेते. त्यांची माणसं ज्यावेळी गढीवर येणार असतील, आपण तेव्हाच तिकडे जाऊ. म्हणजे सोबतीचाही प्रश्न येणार नाही. आता खुश का आरू आणि नील?”

दोघांनाही खूप आनंद झाला. आरू तर आनंदाने लहान मुलीसारखी उड्या मारत मारत पायऱ्यांवरून उतरू लागली.
ठरल्याप्रमाणे बाकीची ठिकाणे पाहून सगळे वाड्यावर परतले. आता नील आणि आरूला गढीवर जाण्याचे वेध लागले होते.

(क्रमशः)

— © संध्या प्रकाश बापट

सौ. संध्या प्रकाश बापट
About सौ. संध्या प्रकाश बापट 50 Articles
नमस्कार वाचकहो, मी, सौ. संध्या प्रकाश बापट (माहेरची पद्मश्री विष्णू फाटक), सातारा. मी, सातार्‍यातील विविध कंपन्यांमध्ये/ऑफिसमध्ये अनेक वर्षे विविध पदांवर काम केले. तसेच काही वर्षे स्वतःचा व्यवसायही केला. 2018 मध्ये मी, नोकरी आणि व्यवसायातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. या सगळ्या वर्षांत, इच्छा असूनही मनासारखे लिहिण्यास वेळ उपलब्ध होत नव्हता. मला लहानपणापासून संगीत, नाटक, सिनेमा, अभिनय आाणि वाचन या सगळ्याची प्रचंड आवड आहे. मी हौशी नाटकांत, एकांकिका, पथनाट्य यांत अभिनय करत होते. युट्यूब वरील वेब सिरीजमध्ये अभिनय करत आहे. नुकतेच झी टीव्ही वरील 'लागीर झालं जी' आणि 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत मी भूमिका केल्या आहेत. मी लघुकथा, कविता, प्रासंगिक लेख, वेब सिरीजसाठी मराठी आणि हिंदीतून कथा-पटकथा लिहीत आहे. काही लघुकथा ई-दिवाळीअंकात प्रसिद्ध झाल्या आहेत. माझ्यातील सुप्तगुणांना प्रेरणा आणि वाव देण्यामध्ये फेसबुक आणि व्हाटस्अ‍ॅप या सोशल मिडीयाचा आणि मला कायम प्रोत्साहन देण्यार्‍या तुम्हा सर्व वाचकांचा फार मोठा वाटा आहे.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..