नवीन लेखन...

अजब न्याय नियतीचा – भाग २३

फोटो – इंटरनेटवरुन

दोन एक वर्षांनी त्याने मला रीतसर प्रपोज करून लग्नाची मागणी घातली. पण मला आरूचीही काळजी वाटत होती. त्यासाठी मी राजला लग्नाला होकार देण्याआधी थोडा वेळ मागून घेतला. राजने मला तो दिल्लीला राहातो असे सांगितले होते. त्याच्या फॅमिलीबद्दल मलाही फारशी माहिती नव्हती. पण ‘आपण जर लग्न केले तर तू इथं मुंबईतच सेटल होशील का?’ असे मी त्याला विचारले होते आणि तो ‘हो‘ म्हणाला होता.

मी त्याला होकार देण्याच्या विचारातच होते की, मला माझ्या काही मैत्रिणींनी, ज्यांना माझं राजवर प्रेम आहे आणि राज माझा होणारा नवरा आहे हे माहित होते, त्यांनी मला सांगितले की, त्यांनी आरूला आणि राजला खूप वेळा बाहेर एकत्र फिरताना पाहिले आहे.

सुरूवातीला मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. पण या गोष्टी सतत माझ्या कानावर येवू लागल्या आणि माझ्या लक्षात आलं की, आपली आरूपण आता मोठी झालीय. मी तिला माझ्या आणि राजच्या नात्याबद्दल कधीच बोलले नव्हते. ती मला नेहमी, ती राजबरोबर कुठे बाहेर जाणार असली तर कॉल करून किंवा मेसेज करून कळवत असे. बाहेरून आल्यावर ती कुठं गेली होती, कुठं कुठं फिरली, काय काय खाल्ल हे सगळं सांगत असे, राजनं तिला काही गीफ्ट दिलं की मला लगेच दाखवत असे, पण मी राजला याबद्दल विचारले की तो माझ्याशी खोटं बोलत असे. मित्रांबरोबर बाहेर गेलो होतो, कुठे एक्झीबीशनला गेलो होतो, अशा थापा मारत असे. आरूने मला सांगितलंय हे त्याला माहिती नसायचं. जर त्याच्या मनात असं काही नव्हतं तर त्यानं माझ्याशी खोटं बोलायचं काय कारण होतं? त्यामुळे मग माझ्या मनात त्याच्या हेतूविषयी संशय यायला सुरूवात झाली.

असं वारंवार घडायला लागल्यावर आमच्यात खटके उडू लागले. लहानपणापासून आरूनं प्रत्येक गोष्टीत स्वतःचं कौतुक करून घेतलं होतं, सगळ्यांची मनं जिंकली होती. पण राजच्या बाबतीत मला ते मान्य नव्हतं. आधी मला फक्त संशय होता. पण मी एकदा आरूला विचारलं की. ‘तुला राज आवडतो का?’ तर ती ‘हो’ म्हणाली. मग माझ्यात नी राजच्यात भांडणं वाढली. राज मला समजावत होता की त्याचं फक्त माझ्यावरच प्रेम आहे. पण मला आवडत नव्हतं तरीही तो तिला बाहेर भेटतच होता. माझं आरूवर प्रेम होतंच, पण ती जर माझं प्रेम माझ्यापासून हिरावून घ्यायचा प्रयत्न करत असेल, तर हे मात्र मला कदापिही मंजूर नव्हतं. मग मी दोघांवर वॉच ठेवायला सुरूवात केली. ते कुठं आहेत हे मला आरूनं आधी सांगितल्यामुळं माहिती असायचंच, मग मी काळा बुरखा घालून सतत त्यांचा पाठलाग करून, ते दोघं खरंच एकमेकांच्या प्रेमात आहेत का हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत होते. पण त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून मला कधी तसं जाणवलं नाही. पण एकदा संशयानं माझ्या मनात घर केलं आणि राजच्या वागण्यानं त्यात भर पडत गेली.’

‘अगं लता पण तू पहिल्यापासून इतकी शांत आणि समजूतदार होतीस, तर थोडं थंड डोक्यानं विचार केला असतास, त्या दोघांशी एकत्र बसून मोकळेपणानं बोलली असतीस, तर तुझा गैरसमज केव्हाच दूर झाला असता. तू तसं का नाही केलंस?

मीच संशय घेतला त्यांच्यावर आणि मीच डोक्यात राख घालून घेतली. ही माझी चूकच झाली. पण हे मला कळेपर्यंत फाssssर उशीर झाला होता.

राज नाहीसा झाल्यावर त्याच्या वाढदिवसादिवशी मी परत एकदा आरूला विचारलं की, ‘तुला राजची आठवण येते का? राज तुला आवडत होता ना?’ तेव्हा ती मला म्हणाली की, ‘राज तिला तिचा ‘जिजू’ म्हणून आवडत होता. तू आणि राज लग्न कराल असं मला वाटत होतं.‘ हे ऐकून मला प्रचंड धक्का बसला. त्या दिवशी मला माझ्या वागण्याचा प्रचंड मनस्ताप झाला. गैरसमजाच्या आणि संशयाच्या आंधळेपणात मी केवढी मोठ्ठी चूक केली. खरंच निरागस असलेल्या माझ्या बहिणीवर मी संशय घेतला आणि राज मला परोपरीने सांगत होता की, त्याचं माझ्यावरच प्रेम आहे, तरीही मी त्याच्यावर वाट्टेल ते आरोप करून त्याला मानसिक त्रास दिला आणि मी त्याला कायमची गमावून बसले.

या गोष्टीचा मला भयंकर त्रास होतोय नील. हे मला असह्य झालं की, बहुतेक मी झोपेत ‘मी काही केलं नाही. माझी यात काहीच चूक नाही. मला माफ कर‘ असं म्हणत असेन कदाचित, कारण यात खरंच माझी काही चूक नव्हती. संशयाचं आणि मत्सराचं भूत माझ्या मानगुटीवर बसलं होतं. राजनं माझ्याशिवाय दुसर्या कुणाशी बोललेलं, हसलेलं, कुणाच्या सहवासात राहिलेलं, मला अज्जीबात आवडत नव्हतं. तरीही तो तसंच वागत होता. किमान मला या गोष्टीचा संशय येतोय म्हटल्यावर तरी त्यानं हे थांबवायला पाहिजे होतं …..

माझं राजवर मनापासून प्रेम होतं. त्याच्या बाबतीत मी खूप ‘पझेसीव्ह’ होते. आई बाबा आमच्या आयुष्यातून गेल्यामुळे आधीच मी स्वतःला खूप ‘इनसिक्युअर फील’ करत होते. त्यात राजच्या माझ्या आयुष्यात येण्यानं मला जरा जरा ‘सुरक्षित’ वाटायला लागलेलं. त्यामुळेच या प्रकरणातआपण राजला गमावून बसू अशी भितीही मला वाटायला लागली होती…..असं म्हणून लता हमसून हमसून रडू लागली.

नील तिच्याकडे हतबुद्ध होवून पहात होता. आरूला आपली दी आपल्यावर संशय घेत होती हे ऐकून खूप वाईट वाटलं होतं. तिच्या डोळ्यांतून आश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या. केळकर काकांनी आरूच्या खांद्यावर थोपटून तिला शांत केलं.

लता थोड्या वेळानं शांत झाली. परत उठून उभी राहिली. नीलकडं बघून म्हणाली, ‘नील आता या गोष्टींची चर्चा करून आणि वादविवाद करून झालेली गोष्ट दुरूस्त होणार नाहीये. सो, आपण निघूया आता.’

‘नाही लता. राजचं काय झालं? हा माझा प्रश्न अजून अनुत्तरीतच आहे. मला ते उत्तर मिळाल्याशिवाय आपण इथून जाणार नाही आहोत. तुझ्याकडं, राजनं आरूला वाढदिवसादिवशी दिलेलं लाल रंगाचं ग्रीटींग होतं, जे त्यानं आरूला ‘14 तारखेला व्हॅलेंटाईन डे दिवशी ओपन कर, त्यात एक सरप्राईज गिफ्ट आहे’ असं सांगून दिलं होतं, आणि ते ग्रीटींग तू गढीवर येताना आरूच्या बॅगमधून चोरून घेऊन आली होतीस. त्याचं काय झालं?

लता परत चिडली. ती संतापून म्हणाली, ‘नील, मी ऐकून घेतेय म्हणून तू माझ्यावर वाट्टेल ते आरोप करू नकोस. मी कशाला चोरीन तिचं गिफ्ट? त्याचा आमच्या भांडणाशी काय संबंध?’

‘नाही कसा? राजनं तुझी शंभर वेळा माफी मागून, परत तुला आवडणार नाही असं मी काहीही वागणार नाही, अशी कबुली देवून तुला इकडे गांवी येण्यासाठी तयार केलं होतं. गावी येण्याच्या आदल्या दिवशी आरूचा वाढदिवस होता आणि तेव्हा राजनं आरूला गिटार गिफ्ट दिली आणि त्या बरोबर ते ग्रीटींगही दिलं होतं. ते गिफ्ट मिळाल्यावर आरूनं राजला आनंदानं मिठी मारली होती आणि ते तुला आवडलं नव्हतं. पण तुमचा इकडे यायचा प्लॅन आधिपासूनच फिक्स असल्यामुळे तू नाईलाजाने इकडे आली होतीस. बरोबर?

पण इकडे गावी आल्यापासून राजनं तुला पूर्ण अॅटेन्शन दिलं होतं तरीही काही गोष्टी तुला आवडल्या नव्हत्या. त्या सगळ्याबद्दल तुला राजशी बोलायचं होतं, म्हणून आरूचा पाय मुरगळल्यानं आरू वाड्यावरच थांबते म्हणाली, तेव्हा तू राजला घेवून गढीवर जाण्याचा निर्णय घेतलास. त्यातंच तू निघताना आरूच्या बॅगमधून ते ग्रीटींगही काढून घेतलंस. त्याचं फक्त पहिलं पान तू पाहिलंस आणि रागानं ते मिटवून, पर्स मध्ये घालून तू राजबरोबर गढीवर आलीस. इथंपर्यंत सगळं मला माहिती आहे. आता इथं आल्यावर, या छतावर आल्यावर शेवटी नेमकं काय घडलं तेवढं मला सांग.’

‘नील, तू काय पोलीस इन्स्पेक्टर आहेस का, पुरावे समोर ठेवून माझी उलटतपासणी घ्यायला? पण मला एक कळत नाही या सगळ्या गोष्टी तुला कशा माहिती?’

‘लता, हे मला कसं माहिती ही गोष्ट आत्ता महत्त्वाची नाहीये. महत्त्वाचं हे आहे की राजचं काय झालं? मला ते उत्तर तुझ्याकडूनच हवंय. लता प्लीज मला सांग, शेवटी तुमच्यात काय संवाद झाला?’

काही मिनीटं लता अस्वस्थ होवून छतावर येरझार-या घालू लागली, मग अचानक थांबून सांगू लागली.

(क्रमशः)

— © संध्या प्रकाश बापट

सौ. संध्या प्रकाश बापट
About सौ. संध्या प्रकाश बापट 50 Articles
नमस्कार वाचकहो, मी, सौ. संध्या प्रकाश बापट (माहेरची पद्मश्री विष्णू फाटक), सातारा. मी, सातार्‍यातील विविध कंपन्यांमध्ये/ऑफिसमध्ये अनेक वर्षे विविध पदांवर काम केले. तसेच काही वर्षे स्वतःचा व्यवसायही केला. 2018 मध्ये मी, नोकरी आणि व्यवसायातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. या सगळ्या वर्षांत, इच्छा असूनही मनासारखे लिहिण्यास वेळ उपलब्ध होत नव्हता. मला लहानपणापासून संगीत, नाटक, सिनेमा, अभिनय आाणि वाचन या सगळ्याची प्रचंड आवड आहे. मी हौशी नाटकांत, एकांकिका, पथनाट्य यांत अभिनय करत होते. युट्यूब वरील वेब सिरीजमध्ये अभिनय करत आहे. नुकतेच झी टीव्ही वरील 'लागीर झालं जी' आणि 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत मी भूमिका केल्या आहेत. मी लघुकथा, कविता, प्रासंगिक लेख, वेब सिरीजसाठी मराठी आणि हिंदीतून कथा-पटकथा लिहीत आहे. काही लघुकथा ई-दिवाळीअंकात प्रसिद्ध झाल्या आहेत. माझ्यातील सुप्तगुणांना प्रेरणा आणि वाव देण्यामध्ये फेसबुक आणि व्हाटस्अ‍ॅप या सोशल मिडीयाचा आणि मला कायम प्रोत्साहन देण्यार्‍या तुम्हा सर्व वाचकांचा फार मोठा वाटा आहे.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..