नवीन लेखन...

अजब न्याय नियतीचा – भाग २५

पण मी त्याचं काही एक ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हते. मी ते ग्रीटींग रागाने फाडायला सुरूवात केली. मला ते ग्रीटींग फाडून त्याचे तुकडे तुकडे करून टाकायचे होते. राजचा सगळा राग मी त्या ग्रीटींगवर काढत होते. संतापाच्या भरात मी काय करतेय याकडेही माझं लक्ष नव्हतं. तसा राज जोरात माझ्याकडे धावत आला. त्यानं ते ग्रीटींग माझ्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. आणि…….. आणि मी रागाच्या भारात त्याला मागे ढकलून दिलं…..”

लताने जोरात किंकाळी फोडली.  “नाही…. नाही…. माझी यात काहीच चुकी नाही नील….. मी हे मुद्दामहून नाही केलं………मी रागाच्या भारात त्याला ढकललं आणि तो कठड्यावरून खाली विहिरीत कोसळला…. माझा राज….. माझा राज…… माझ्या डोळ्यादेखत खाली विहीरीत कोसळला आणि मी त्याला वाचवू शकले नाही…….मी वरून वाकून पाहिलं पण मला तो दिसला नाही…… मी धावत खाली गेले…… मी इतकी घाबरले होते की मला काय करावं ते सुचत नव्हतं.  मी विहीरीशेजारी उभं राहून त्याला खूप हाका मारल्या…… पण विहीरीतून काहीच आवाज आला नाही. …… मी बराच वेळ इथंच एकटीच रडत बसले. …… मी परत परत राजला हाका मारल्या…… पण माझा राज मला कायमचा सोडून गेला……  मी धावत पळत गढीच्या बाहेर आले.  गाडीत बसले…… मला आधी वाटलं की केळकर काका, लक्ष्मण काका यांना सांगून, त्यांची मदत घेवून राजला विहीरीतून बाहेर काढता येईल….. पण मग मी विचार केला….. जर तो विहीरीत पडून मेला असेल, तर माझ्यावर त्याचा खूनाचा आळ येईल….. मी खूप घाबरले….. माझ्या डोळ्यांसमोर आरूचा चेहेरा आला……आई बाबा गेल्यावर पोरकेपणाचं दुःख मी सोसलं होतं. आता राज मला सोडून गेला होता….. जर राजच्या खूनाच्या आरोपावरून मला अटक झाली असती, फाशी झाली असती, तर आरू….. आरू हे सगळं सहन करू शकली नसती….. माझ्या आरूसाठी मला जगणं महत्त्वाचं होतं आणि म्हणून ….. म्हणूनच मग मी वाड्यावर परत जायचा निश्चय केला आणि सगळ्यांना राज माझ्याशी भांडून निघून गेला असं सांगितलं.”

लता निलसमोर हात जोडून त्याला विनंती करू लागली…..

“पण नील मी खरंच राजला मारलं नाही रे…. माझ्यावर विश्वास ठेव….. आता वाटतंय…… इतकी वर्ष राजच्या खूनाच्या पापाचं ओझं घेवून मी जे जगत आलेय ….. ज्या मानसिक यातना मी भोगल्यात ….. त्यापेक्षा ….. त्यापेक्षा मला फाशी झाली असती तर जास्त बरं झालं असतं.”

मग लता जोरजोरात ओरडू लागली…. “हो मी खूनी आहे….मीच राजला विहीरीत ढकलून दिलं.  मीच राजचा खून केला….मी अपराधी आहे….”

नील पटकन लताच्या जवळ गेला आणि त्यानं लताला आपल्या मिठीत घेतलं.  शांत हो लता…. शांत हो….. असं म्हणून तो तिला थोपटू लागला.

इकडं आरूनं हे सगळं ऐकल्यामुळे तिला या सगळ्याचा जबरदस्त धक्का बसून ती तिथंच बेशुद्ध पडली.  पण शेजारी उभ्या असलेल्या केळकर काकांनी तिला सावरून कमानीच्या खांबाला टेकून बसविली. व्हील चेअरवर बसलेला राजू जागेवरच थरथर कांपत होता……. लक्ष्मणकाकांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वहात होत्या……. तेवढ्यात….

लतानं एकदम नीलच्या मिठीतून स्वतःला सोडवून घेतलं.  तिचे केस विस्कटले होते…… रागानं आणि पश्चातापानं चेहरा लालबुंद झाला होता…… हातवारे करत, वेड लागलेल्या माणसासारखं ती जोरजोरात ओरडू लागली…. भेसूर आवाजात बोलू लागली……

“नील, हेच ऐकायचं होतं ना तुला? …. हेच कबुल करून घ्यायचं होतं ना तुला माझ्याकडून? …. मग आता झालं तुझं समाधान? …. आता काय करणारेस तू? …. पोलिसांना बोलवतोस? …. बोलंव… बोलंव… पोलिसांना बोलव…. गावातल्या सगळ्या लोकांना बोलंव…. आरूला पण सांग, तुझी दी खुनी आहे म्हणून…. सगळे मिळून गावातून धिंड काढा माझी…… सगळ्या गावाला बघू दे, जहागिरदार परांजप्यांची मुलगी खुनी आहे म्हणून….. होवूदे आमच्या खानदानाची बदनामी….. मग तू मिरवं सगळीकडे…… राजच्या खूनाचा छडा लावलास म्हणून…. आता खूप आनंद झाला असेल ना तुला माझ्याकडून खुनाची कबुली मिळाली म्हणून? ….”

“हा हा हा…………..हा हा हा”

असं म्हणून लता भेसूर हसू लागली……

“हेच… हेच…. सगळं मला होवू द्यायचं नव्हतं…. म्हणून मी गप्प राहिले होते इतके दिवस…… राजचा शोध लागला नाही म्हणून कुणाचं काही बिघडलं होतं का?….. त्याच्या नसण्याचा फक्त आणि फक्त मला त्रास झालाय नील…. मला…. कारण माझं त्याच्यावर प्रेम होतं….. आणि मीच त्याचा खून केला….. हा…. हा…. हा…..”

लताचा हा आवतार बघून सगळीजणंच घाबरली.  नीलला पश्चाताप वाटू लागला… की आपण हे विचारायच्या भानगडीत पडलो नसतो तर बरं झालं असतं.   या गोष्टीचा लताला इतका त्रास होत असेल याची आपण कल्पनाच केली नव्हती…..  त्याला लताचं खूपच वाईट वाटू लागलं…..

नील परत लताजवळ गेला आणि तिचा हात हातात घेवून तिला म्हणला….. “आय एम सॉरी लता……हे असं काही झालं असेल असं मला वाटलं नव्हतं…… तू प्लीज शांत हो आधी…..पण जे काही झालं त्यात खरंच तुझी काहीच चूक नाहीये, हे मान्य आहे मला…. हा निव्वळ एक अपघात होता….. त्यामुळे, त्याची तुला शिक्षा होण्याचा प्रश्नच नाहीये….. या अपराधाचं तुझ्या मनावरचं ओझं उतरावं म्हणून मी तुला हे सगळं बोलायला भाग पाडलं… तुला बरं वाटावं म्हणून…… बस्स……. तुला त्रास झाला….. तुला शिक्षा झाली तर मला कसा काय आनंद वाटेल?  तू गुन्हेगार नाही आहेस लता….. तुझी यात काहीच चूक नाहीये हे पटलंय मला…… त्यामुळे तू घावरू नकोस…. मी तुझ्या सोबत आहे….. आणि आरूला काय समजावून सांगायचं ते मी बघेन….. चल आपण वाड्यावर परत जाऊया….”

लताने परत त्याचा हात झटकून टाकला.   “नील, ज्या दिवशी आरूनं माझ्याकडं कबूल केलं की तीचं “जिजू” म्हणूनच राज वर प्रेम आहे.  तेव्हाच मला कळून चुकलं की मी फार मोठा अपराध केलाय…. माझ्या संशयखोर स्वभावामुळं आणि राजच्या बाबतीतला माझा अति पझेसिव्हपणा यामुळं आमची भांडणं झाली आणि म्हणून राज खाली विहीरीत पडला….. मीच त्याच्या मृत्यूला जबाबदार आहे…. मी माझ्या बहिणीची…. आरूची पण गुन्हेगार आहे……” असं म्हणून ती पुन्हा रडू लागली…..

हे सगळं बोलताना लताला खूप त्रास होत होता.  परत थोडावेळ शांत बसून लता बोलू लागली…..

“हे माहित असूनही केवळ आरूच्या काळजीपोटी मी गुन्हा कबूल करायला धजावत नव्हते…. पण नील, नंतर तू आमच्या आयुष्यात आलास….. तुझा आणि राजचा काय संबंध आहे मला माहिती नाही…. पण तुझ्या बोलण्यातून….. चालण्यातून…. तुझ्या आसपास वावरण्यातून मला सारखा राजचा भास होत होता…. आणि म्हणूनच मी परत तुझ्याशी मैत्री केली. राजच्या मृत्यूला जबाबदार असल्याची माझ्या मनातली भीती, तुझ्या येण्यानं कमी झाली…… कधी कधी एकटी बसून विचार करताना मला वाटायचं…. तूच राज आहेस…… कदाचित तू त्या विहिरीतून वाचला असशील आणि चेहेरा बदलून परत माझ्या आयुष्यात आला असशील….. कधी कधी वाटायचं….. माझ्या आयुष्यातून राज गेल्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी देवानंच तुला पाठवलं असेल…. तुझ्यात राजचा भास होतो हा केवळ योगायोग असेल….. असे वेगवेगळे विचार सतत माझ्या मनात येत होते.

पण ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी राज आणि आरू बद्दल मला सांगितलं होतं, त्यांनीच मला तुझ्या आणि आरूच्या नात्याबद्दलही सांगितलं होतं.  मग मात्र मी परत स्वतःला आवरायला सुरूवात केली.  एकदा केलेली चूक मला परत करायची नव्हती……माझं प्रेम तर हरवलं होतं….. आता मला परत या चक”ात गुंतायचं नव्हतं….. माझ्या आरूच्या आयुष्यात आलेलं प्रेम माझ्यामुळं तुटावं असं मला वाटत नव्हतं…. म्हणून मी आज तुला इथं घेवून आले….. मी तुला आज सांगणार होते की तू आणि आरू लग्न करा ….. किमान तुमचं आयुष्य तरी सुखानं जावं असं मला वाटत होतं…… हेच सरप्राईज मी तुला देणार होते…….

लता परत हुंदके देत नीलला म्हणाली, “नील, मला माहिती आहे की, तुझं आणि आरूचं एकमेकांवर प्रेम आहे……. आता मी नसले तरी माझी आरू पोरकी राहणार नाही…… इतके दिवस तिच्यात माझा जीव अडकला होता….. तिच्या काळजीनं मी गुन्हा कबूल करायला धजावत नव्हते….. तसंही राजशिवाय माझ्या जगण्याला काहीच अर्थ राहिलेला नाही….. आता शिक्षा भोगायची माझी टर्म आहे….. ज्या पद्धतीने माझ्या चुकीची शिक्षा राजनं भोगली……तीच पद्धत, माझ्यासाठी शिक्षा म्हणून योग्य आहे….. आणि ती मला मान्य आहे…..”

असं म्हणून क्षणांत लता कठड्याच्या बाजूला धावत गेली आणि तिनं कठड्यावरून स्वतःला विहिरीत झोकून दिलं…… तिची किंकाळी गढीभर व्यापून गेली …… नील तिला धरण्यासाठी कठड्याकडे जावू लागला तेवढ्यात……..

“लता थांब……… नील थांब………” असं म्हणत राजू व्हील चेअरमधून उठून उभा राहिला आणि नीलकडे धावत आला……..आणि त्याने नीलला घट्ट मिठी मारली.

(क्रमशः)

— © संध्या प्रकाश बापट    

सौ. संध्या प्रकाश बापट
About सौ. संध्या प्रकाश बापट 50 Articles
नमस्कार वाचकहो, मी, सौ. संध्या प्रकाश बापट (माहेरची पद्मश्री विष्णू फाटक), सातारा. मी, सातार्‍यातील विविध कंपन्यांमध्ये/ऑफिसमध्ये अनेक वर्षे विविध पदांवर काम केले. तसेच काही वर्षे स्वतःचा व्यवसायही केला. 2018 मध्ये मी, नोकरी आणि व्यवसायातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. या सगळ्या वर्षांत, इच्छा असूनही मनासारखे लिहिण्यास वेळ उपलब्ध होत नव्हता. मला लहानपणापासून संगीत, नाटक, सिनेमा, अभिनय आाणि वाचन या सगळ्याची प्रचंड आवड आहे. मी हौशी नाटकांत, एकांकिका, पथनाट्य यांत अभिनय करत होते. युट्यूब वरील वेब सिरीजमध्ये अभिनय करत आहे. नुकतेच झी टीव्ही वरील 'लागीर झालं जी' आणि 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत मी भूमिका केल्या आहेत. मी लघुकथा, कविता, प्रासंगिक लेख, वेब सिरीजसाठी मराठी आणि हिंदीतून कथा-पटकथा लिहीत आहे. काही लघुकथा ई-दिवाळीअंकात प्रसिद्ध झाल्या आहेत. माझ्यातील सुप्तगुणांना प्रेरणा आणि वाव देण्यामध्ये फेसबुक आणि व्हाटस्अ‍ॅप या सोशल मिडीयाचा आणि मला कायम प्रोत्साहन देण्यार्‍या तुम्हा सर्व वाचकांचा फार मोठा वाटा आहे.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..