माझी अशी इच्छा आहे की, मी तुझ्या प्रपोजलचा विचार करायच्या आधी तू माझ्या दी ला भेटावंस असं मला वाटतं. कारण आता माझ्या दी शिवाय माझं असं या जगात कोणीच नाहीये. तू जर तिला पसंत पडलास तर मग आपण लग्न करायचं कि नाही याचा विचार करू. पण मला फायनल निर्णय घ्यायला थोडा वेळ हवाय.”
“ठीक आहे. भेटेन मी तिला. तू माझ्याबद्दल काही बोलली आहेस का तिच्याशी?”
पुढे काय झालं ?
अजब न्याय नियतीचा – भाग ४
“नाही. मी अजूनतरी तिला तुझ्या-माझ्या रिलेशनबद्दल काहीच सांगितलेलं नाही……माझ्या ऑर्केस्ट्रामधला दील्लीहून आलेला एक चांगला कलाकार, एव्हढंच तिला तुझ्याबद्दल माहिती आहे. तसंही, मलापण आत्ताच कळतंय, आपल्याला आमच्याबद्दल काय वाटतंय ते, नाही का राजेसाहेब? आणि हो, माझी एक अट आहे.”
“बोला राणी सरकार, काय अट आहे आपली?”
“तू माझ्या दीला भेटायला घरी ये. जर तू माझ्या गंभीर झालेल्या दीला, परत पहिल्यासारखी हसती खेळती करू शकलास…. तर कदाचित मी तुझ्या प्रपोजलला होकार देईन…. बघ…. विचार कर…. हे तुला वाटतं तितकं सोपं काम
नाहीये…… आणि तुला जर ही अट मंजूर असेल, तर मग येत्या रविवारी संध्याकाळी आमच्या घरी ये … ओके?”
हे ऐकल्यावर नील एकदम खुश झाला. टुणकन उडी मारून तो वाळूतून उठून उभा राहिला.
“हात तिच्या मारी….. एव्हडीच अट आहे ना? मग डन…….. अरे तुला कल्पना नाहीये, की हा नील काय चीज आहे ते …… नाही तुझ्या दीला परत हसतं खेळतं केलं तर ‘नील’ नाव सांगणार नाही आपलं……हां, पण माझीही एक अट आहे.”
“बोल. काय अट आहे तुझी?”
“एक तर यापुढे माझे काम पूर्ण होईपर्यंत तू तुझ्या दीला आपल्या नात्याबद्दल, कधीही, स्वतःहून, काहीही सांगणार नाहीस…. तिच्यासमोर वावरताना आपण एकमेकांच्या प्रेमात आहोत हे तिच्या लक्षात येईल, असे आपण कधीही, काहीही वागायचे किंवा बोलायचे नाही…… आणि मी तुझ्या दीला भेटल्यावर, तिच्याशी जे काही बोलेन, वागेन त्यावर तू तिच्यासमोर लगेच काहीही प्रतिक्रिया व्यक्त करायची नाहीस……. तुला जर एखादी गोष्ट आवडली किंवा नाही आवडली तरीही त्यावर आपण नंतर भेटून बोलत जाऊ….
मंजुर?”
“येस,….. एकदम मंजूर….. तर मग या रविवारी येतोयस तू आमच्या घरी?”
“आता तू बघच ग, मी काय काय करतो ते….. मग ठरलं तर….. मी रविवारी येतो तुझ्या घरी….”
आरू आज घरीच थांबली होती. चारुदीला आश्चर्य वाटले. आज आरू घरी कशी काय? आरूने नीलच्या आवडीची सँडविचेसची तयारी करून ठेवली होती…… नीलच्या आवडीचा बॉटल ग्रीन कलरचा ड्रेस, जो तिने त्याच्याच पसंतीने घेतला होता, तो ड्रेस घालून आरू नीलच्या येण्याची वाट पाहत होती. ती अधूनमधून गॅलरीतून डोकावून पाहात होती. तिची ही अस्वस्थता पाहून शेवटी चारुदीने तिला विचारलेच…. “अगं आरू, तू आज प्रॅक्टिस ला नाही गेलीस? घरीच थांबली आहेस ती? आणि अशी अस्वस्थ का झाली आहेस? कुणाची वाट पाहाते आहेस का? कुणी येणार आहे का आपल्याकडे?”
आरू म्हणाली…. “अगं दी, मी तुला सांगितले नव्हते का, आमच्या ऑर्केस्ट्रामध्ये दिल्लीहुन एक मुलगा आलाय…… तो मला गिटार वाजवायला शिकवतो….. आणि त्याचा स्वतःचा एक अल्बम पण रिलीज झालाय…… तो नील जोगळेकर….. त्याला मी आज आपल्या घरी बोलावले आहे….. त्याचीच वाट पाहत होते. तू कुठे बाहेर जाणार नाहीयेस ना आत्ता?
“छे ग…. मी नाही जाणारेय कुठे…… घरीच आहे. पण काय ग? सगळा ग्रुप येतोय की तो मुलगा एकटाच येतोय? म्हणजे काही तयारी करायची असली तर मी मदत करते तुला.”
“नाही दी, ग्रुप मधले सगळेजण बरेचदा काही ना काही कारणाने घरी येऊन गेलेत ना? …… हाच कधी आला नव्हता…. तसं एक दोन वेळा प्रोग्राम संपवून घरी यायला उशीर झाला होता तेव्हा मला घरी सोडायला आला होता तो, पण तेव्हा खाली गेट बाहेरच सोडून गेला होता… रात्रीची वेळ होती म्हणून मी घरात नाही बोलावले त्याला….. पण आज घरी येतो म्हणालाय तो. आणि आपल्यासाठी मी आधीच सँडवीचेस बनवायची तयारी करून ठेवली आहे.”
“अच्छा….. ठीक आहे…. येऊदे त्याला…… माझी पण ओळख होईल… ”
“दी तू तुझं आवरून येतेस का तोपर्यंत? …. १५-२० मिनिटांत पोहोचेलच तो इथं.”
“येस माय डिअर सिस्टर, मी आलेच पटकन आवरून.” असे म्हणून दी तिचं आवरायला आत निघून गेली.
आरूनं नीलला फोन केला…… “हॅलो नील….. तू निघालास की नाहीस अजून?……..किती वेळात पोहोचशील?”
“जानू , ऑन द वेच आहे, पोहोचतॊय एव्हड्यात. थोडं ट्रॅफिक आहे म्हणून जरा वेळ लागतोय. बाय.” नीलने फोन कट केला.
नील आज पहिल्यांदाच घरी येणार…. त्याची दीशी ओळख करून दिल्यावर ते एकमेकांशी कसे बोलतील?…… नील दी बरोबर काय बोलेल?…… दीला नील पसंत पडेल का? ……. त्यातून नीलने तो कशाकरता भेटायला येणार आहे ते
गुपीत ठेवायला सांगितले आहे…… नील भेटल्यावर दी कशी वागेल त्याच्याशी?…. बोलेल कि गप्प बसेल?….. अशा अनेक शंकांनी आरू खूपच अस्वस्थ झाली होती……… ती हॉल मध्ये सारख्या फेऱ्या मारत होती.
इतक्यात तिचे दीच्या रूमकडे लक्ष गेले. दी छानसं आवरून बाहेर येत होती.
“wow दी, छान दिसतेस. आज खूप दिवसांनी मी तुला असं आवरलेले बघते आहे. मस्त.”
“आरू, I am ready now. आला कि नाही अजून तुझा मित्र?”
“येईल गं. मी आत्ताच कॉल केला होता त्याला. वाटेतच आहे म्हणाला.”
तेवढ्यात बेल वाजली……. आरूने दार उघडले…… नील एकदम छान पोशाखात, हातात गुलाबी रंगाच्या गुलाबपुष्पांचा
सुंदर बुके घेऊन दारात हसत उभा होता. त्याला पाहून आरुला खूप आनंद झाला …… पण नीलची अट तिच्या लक्षात होती.
तिनं थोडंसं हसून त्याचे स्वागत केले. “नील, Welcome to our home. ….ये ना ….. आंत ये.”
नील छानसं हसून आंत आला…… हॉल मध्ये त्याने नजर टाकली …… समोरच चारुदी सोनेरी काठाची, मोतिया रंगाची, सोबर अशी साडी नेसून, हलकासा मेकअप केलेली, गळ्यात टपोऱ्या मोत्यांची माळ घातलेली, शांत, कोऱ्या आणि निर्विकार चेहेऱ्याने उभी होती. राजा रवी वर्माच्या चित्रातील सरस्वती देवीसारखी दी वाटली त्याला. तो एकटक दीकडे पाहाताच राहिला. आणखी एक गोष्ट त्याच्या लक्षात आली की, आरू आणि दीच्या चेहेऱ्यात आणि दिसण्यात बऱ्यापैकी साम्य होतं. फक्त आरूचा चेहेरा हा फुललेला गुलाबासारखा टवटवीत दिसत होता तर दीचा चेहेरा सुकलेल्या कमळासारखा दिसत होता.
दीला पाहून नीलच्या चेहेऱ्यावर वेगवेगळ्या भावभावनांची उलथापालथ होत असलेली आरुला स्पष्ट जाणवली. तिला त्याला अर्थ काही कळला नाही.
नीलला असा दारातच उभा राहिलेला पाहून आरू पट्कन पुढे झाली आणि तिने दीशी त्याची ओळख करून दिली.
“दी हा माझा मित्र नील, आणि नील, ही माझी मोठी बहीण चारुलता, पण मी तिला चारुदी किंवा नुसतं दी असं म्हणते.”
आरूचे बोलणे ऐकून नील भानावर आला. त्याने पुढे येऊन त्याच्या हातातील गुलाबाचा बुके चारुदीच्या हातात दिला आणि म्हणाला, “नमस्कार, मी नील…..नीलकांत जोगळेकर…. पण माझे मित्र मला ‘नीलच’ म्हणतात. Glad to Meet you.”
चारुदीने हसून त्या बुकेचा स्विकार केला. मन भरून त्या फुलांचा वास घेतला आणि म्हणाली, “वा…. खूपच सुंदर बुके आणलाय तुम्ही….. मला या फुलांचा रंग आणि सुगंध खूपच आवडतो. …… By the way, मला हीच फुलं आवडतात हे तुला कसं कळलं?…. नील, तुला ‘तू’ म्हटलं तर चालेल ना?”
“No Problem, उलट मी म्हणेन, मला नुसतं नीलच म्हणा.”
“Ok. आणि काय रे नील, तू मनकवडा आहेस कि काय? अगदी माझ्या आवडत्या रंगाची फुलं आणलीस ते? ….. की आरूनं आधी सांगून ठेवलं होतं तुला?”
आरू मनात विचार करायला लागली की, मी तर नीलशी दीच्या कोणत्याच आवडी निवडी बद्दल बोलले नव्हते, मग त्याला कसं कळालं असेल?
तेव्हड्यात दी म्हणाली, “ते काहीही असो, पण Thank you very much, नील.
मला खरंच खूप आवडली ही फुलं.”
एव्हडं बोलून तिनं पुन्हा एकदा तो बुके आपल्या हृदयाजवळ घेतला आणि काही क्षणांसाठी दी कसल्यातरी आठवणीत हरवून गेली….. तिचा चेहेरा पाहून तिला एखादी छानशी, सुरेख घटना आठवत असावी असे वाटत होते. ती तशीच फुलांचा वास घेत उभी होती. आठवणींच्या खोल डोहात जणू ती बुडून गेली होती. समोर आरू आणि नील उभे आहेत याची जाणीव असल्याची कोणतीच खूण दीच्या चेहेऱ्यावर दिसत नव्हती.
नील आश्चर्याने चारुदीकडे पाहत होता. आरूनं वर्णन केल्याप्रमाणे दी ही खूपच गंभीर स्वभावाचा प्राणी असेल असा त्याचा अंदाज होता. प्रत्यक्ष भेटल्यावर तिला आपण कसं काय convince करू शकु याचं त्याला बऱ्यापैकी टेन्शन आलं होतं.
पण इथं तर वेगळंच घडत होतं. त्या मानाने पहिल्या भेटीतच दी त्याच्याशी बऱ्यापैकी चांगलं बोलत होती.
तिची समाधी भंग करत नील दीला म्हणाला, “खरं तर मी पहिल्यांदाच तुमच्या घरी आलोय….. आणि तुमची आवड निवड पण मला माहिती नव्हती. आरू पण मला काही बोलली नव्हती. Actually, मला काळत नव्हतं की तुम्हाला आवडेल असं, आरूच्या लाडक्या बहिणीसाठी काय गिफ्ट घ्यावं? मी काहीच ठरवलं नव्हतं ….. आणि येताना वाटेत हे सुंदर गुलाब दिसले, म्हणून हेच आणले….”
बोलत बोलत तो चारूदीच्या अगदी समोर जाऊन उभा राहिला आणि दीच्या नजरेला नजर मिळवत तो म्हणाला, ” खरं तर सुंदर आणि सुगंधी गुलाबाची फुलं आवडत नाहीत अशी कुणी सुंदर मुलगी, निदान माझ्यातरी पाहण्यात नाही. So, मी मनकवडा वगैरे काही नाही….. असच…. सहजच आणली. पण तुम्हाला मनापासून आवडली ना ही फुलं? मग झालं तर….”
“हो नील, मला खूपच आवडले हे गुलाब……. थोडा वेळासाठी का होईना मला जुन्या काळात घेऊन गेले…. But its OK .”
त्यांचं बोलणं मधेच थांबवत आरू म्हणाली, “नील, तू आणि दी बोलत बस. मी खाण्याचं बघते. Be comfortable नील.” एवढं बोलून आरू किचनमध्ये निघून गेली.
पहिली काही मिनिटे दोघांनाही एकमेकांशी काय बोलावे हे सुचत नव्हते.
इतक्यात नीलचे त्यांच्या वेल डेकोरेटेड दिवाणखान्याच्या भिंतींवर लक्ष गेले. त्यावर सुंदर सुंदर पेंटिंग्ज अतिशय कलात्मक पद्धतीने लावलेली होती.
(क्रमशः)
— © संध्या प्रकाश बापट
Leave a Reply