नवीन लेखन...

अजब न्याय नियतीचा – भाग ५

पहिली काही मिनिटे दोघांनाही एकमेकांशी काय बोलावे हे सुचत नव्हते. इतक्यात नीलचे त्यांच्या वेल डेकोरेटेड दिवाणखान्याच्या भिंतींवर लक्ष गेले. त्यावर सुंदर सुंदर पेंटिंग्ज अतिशय कलात्मक पद्धतीने लावलेली होती.
नील एक एक चित्र निरखून पाहू लागला. प्रत्येक चित्र पाहताना वाह, सुंदर, अप्रतिम, अमेझिंग, सॉलिड, क्या बात हैं असे म्हणत तो पुढे पुढे जात होता. नील चित्रं पाहत असताना चारुदी तिथेच उभी राहून त्याचे निरीक्षण करत होती. तो मनापासून चित्रांचे कौतुक करतोय हे पाहून तिच्या चेहेऱ्यावर समाधानाचे हसू झळकू लागले.

चित्रं पाहता पाहता तो अचानक चारुदीकडे बघून म्हणाला, “Wow, तुमची पैंटिंग्जची चॉईस एकदम उत्तम आहे. कसलं अप्रतिम कलेक्शन आहे तुमच्याकडे ! मी आत्तापर्यंत इतक्या आर्ट गॅलरीज फिरलोय पण इतकी सुंदर चित्रं आणि ती ही एकाच ठिकाणी, मी कुठेच पहिली नाहीत. सो अमेझिंग…… ”

चारुदीने नुसतेच त्याच्याकडे पाहत हसून मान हलवली. तेवढ्यात नीलने तिला विचारले, “लताजी…. (नीलच्या तोंडून ‘लताजी’ हे नाव ऐकून चारुदी क्षणभरासाठी दचकलीच), ही इतकी देखणी चित्रं तुम्हाला मिळाली तरी कुठं?…… तुम्ही ती आणलीत तरी कुठून?….. तुमच्या चोखंदळ नजरेला मात्र दाद दिली पाहिजे…. अगदी मनापासून.”
आता चारुदी खळखळून हसू लागली…… नीलला कळेना की, आपण असं काय बोललो ज्यामुळे चारुला इतके हसू येत आहे.

तेवढ्यात आरू आतून ट्रे मधून सँडविचेस घेऊन आली. तिनं नीलने विचारलेले प्रश्न ऐकले होते. त्यामुळे हसत हसत ती म्हणाली, “अरे नील, काहीतरीच काय विचारतोयंस? ही सगळी चित्रं माझ्या दीनेच काढलेली आहेत….. कुठून बाहेरून विकत घेतलेली नाहीयेत…..”

नीलच्या चेहेऱ्यावर आश्चर्याचे भाव ओसंडून वाहत होते.

“ओ हो ……. आय सी … .. आय सी….. इट्स रिअली अमेझिंग…. काय सांगतेस तू? ग्रेट…. आरू, आय कान्ट बिलिव्ह, तू एकदा म्हणाली होतीस की तुझी दी पैंटिंग्ज काढते ….. पण मी ते विसरून गेलो होतो.. आणि ह्या एवढी अप्रतिम चित्रं काढत असतील याची मी कल्पना पण केली नव्हती.”

तो चारुदी कडे वळून म्हणाला, “लताजी, तुम्ही खरोखरच ग्रेट आर्टिस्ट आहात……उत्तम चित्रकार आहात.”
दी हसून म्हणाली, “इट्स माय प्लेजर, नील. थँक्स.”

आरू म्हणाली, “आहेच हो माझी दी चांगली आर्टिस्ट …. पण नील, चित्रकला हा काय तुझा प्रांत नव्हे. तू तर सिंगर, कम्पोजर, गिटारिस्ट आहेस ना? मग तुला काय कळतं रे पैंटिंग्ज मधलं?”

“काय कळतं? अगं, काय कळत नाही ते विचार…… अगं आरू, मागे मी तुला बोललो नव्हतो का, माझी आई आर्किटेक्ट आहे म्हणून …… त्याच बरोबर ती इंटिरिअर डेकोरेटर सुद्धा आहे. तिच्याकडे मोठमोठया श्रीमंत हस्तींचे, उद्योगपतींचे आणि सिनेमातील कलाकारांचे बंगले, फ्लॅट डेकोरेट करायच्या ऑफर्स असतात. अनेक बंगले सजवण्यासाठी मॉम बरोबर फिरून, बंगले डेकोरेट करण्यासाठी तिथं लागणारी पैंटिंग्ज, अँटिक वस्तू खरेदी करण्यासाठी हजारो आर्ट गॅलरीज मी पालथ्या घातल्या आहेत……. सारखं जाऊन जाऊन मला पण कळायला लागलं मग. त्यामुळे चित्रांमधील बऱ्यापैकी कळतं आता मला.”

दी हसून म्हणाली, ” असुदे आसूदे….. नील, आता यावरून तुम्ही दोघं भांडू नका प्लिज. नील, पण थँक्स अगेन, माझ्या चित्रांचं एवढं कौतुक केल्याबद्दल….. पण खरं सांगायचं तर मला स्वतःला आपण काहितरी ग्रेट कलाकृती बनवतोय वगैरे असे काही वाटत नाही ….. मी आपलं माझी आवड म्हणून आणि माझा मूड असेल तेव्हा ही चित्रं काढत असते.”

नील म्हणाला, “तसं नाहीये लताजी, तुम्ही याचं श्रेय घेत नाही आहात, हा तुमचा विनय झाला. पण जे सुंदर ते सुंदरच. त्यात काही वादाचा विषयच नाही….. पण मला एक कळत नाही, तुमच्याकडे एवढ्या सुंदर चित्रांचा खजिना असताना, तुम्ही त्यांचे एक्झीबिशन का नाही भरवत?….. काय सॉलिड रिस्पॉंन्स मिळेल माहितेय?…. ”

“नील, मी ही चित्रं प्रदर्शनात मांडण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी बनवलेलीच नाहीत. चित्रं काढून माझ्या मनाला समाधान मिळालं कि बास…….आणि तशीही मला आर्थिक गरजही नाहीये की ज्यासाठी मी ती चित्रं विकायला ठेवावीत…..” लताने थोडं नाराजीनं आणि कोरडेपणानं उत्तर दिल.

दी चं हे उत्तर ऐकून नील थोडा गडबडलाच. आपल्या बोलण्यामुळे दी जर नाराज झाली तर आपलं काही खरं नाही आता. आरू परत आपल्याला काय म्हणेल याची पण त्याला काळजी वाटायला लागली. काही करून परिस्थिती सांभाळून घ्यायला पाहिजे होती.

तो थोडंसं नरमाईची सुरात दीला म्हणाला, “सॉरी लताजी….. मला तसं नव्हतं म्हणायचं ….. तुम्ही माझ्या बोलण्याने हर्ट झाला असाल तर I am very sorry…… पण तुमची ही कला लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे असं मला मनापासून वाटलं ….. म्हणून मी तसं म्हणालो…….. सॉरी…… एका परीनं तुमचंही बरोबरच आहे म्हणा…… इतक्या सुंदर गोष्टींची कोण काय किंमत लावणार? ….. नाही का?….”

नीलच्या अशा मखलाशी करण्याने दी चा राग थोडासा शांत झाला. ती म्हणाली, “It’s all right नील.”

या बोलण्याचा नादात आरून आणलेली सँडविचेस तशीच पडून राहिली होती.

विषय बदलण्यासाठी आरू म्हणाली, “भरपूर कौतुक करून झालंय, आता जरा खाण्याकडे लक्ष द्याल का? चला खायला सुरु करा पटपट. आणि काय रे नील ….. मी मघापासून बघतेय तू माझ्या दीला सारखं सारखं ‘लताजी, लताजी’ असं काय म्हणतोयस?”

“मग, त्या तुझी मोठी बहीण आहेत म्हणून तू त्यांना दी म्हणतेस….. पण त्या एक महान कलाकारही आहेत…..

माझ्या मनात सर्व कलाकारांबद्दल कायम आदरच असतो….. मग कलाकारांना ‘जी’ म्हणायला नको?
आता बघ तू आरू आणि ह्या चारू ….. मग माझा गोंधळ होईल ना बोलताना…….. शिवाय तुम्ही दिसता पण बऱ्याचशा एकसारख्या….. म्हणून मग मी ठरवलं ….. त्यांच्या चारुलता या नावातील ‘चारू’ ती तुझी ‘दी’ आणि उरलेली ‘लता’ त्या माझ्या ‘लाताजी’, म्हणून मी त्यांना आजपासून ‘लताजी’ म्हणणार…….. अर्थात त्यांना आवडणार असेल तर…. नाहीतर त्या जे काही म्हणायला सांगतील ते मला मंजूर आहे….. काय ‘लताजी’?
नीलचा नाटकीपणा बघून दी ला पण खूप हसूं यायला लागलं. ती म्हणाली, “नील तू पण ना…. खूप गमतीदार आहेस. पण तुझ्या बोलण्यानं तू आपल्यातील परकेपणा पार घालवून टाकलास…. आता तू आमच्या कुटुंबात चांगला मिक्सअप झाला आहेस….. तर आता परक्या लोकांसारखं फॉर्मेलीटीज पाळायची काही गरज नाही….. आजपासून मला तू नुसतं

‘लता’ म्हणालास तरी चालेल…. ok?”
“ok लताजी, सॉरी सॉरी लता”

तिघांनीही बोलता बोलता सँडविचेस खायला सुरुवात केली. आरूने ती नीलला आवडतात तशीच बनवली होती.
खाऊन झाल्यावर नील म्हणाला, “आरू, सँडविचेस एकदम टेस्टी झालीत हां, मला खूप आवडली.”
त्यांचं खाणं झाल्यावर दी आरूला म्हणाली, “आरू, तू सगळ्यांसाठी सँडविचेस बनवलीस ना….. आता मी आपल्यासाठी फक्कड अशी कॉफी बनवून आणते. तुम्ही दोघं बसा तोपर्यंत बोलत.”
*******

जशी दी कॉफी बनवण्यासाठी किचनमध्ये गेली तशी आरू पट्कन नीलजवळ आली आणि तिनं नीलचे गालगुच्चे घेतले.
नील म्हणाला, “अगं ए…. हे काय करतीस?”

आरू आनंदाने म्हणाली, “नीssल, मिशन सक्सेस. तू आज काय केलंयस हे तुझं तुला तरी कळलंय का?…. अरे गेल्या कित्येक दिवसांत मी माझ्या दी ला असं मोकळं हसतांना पाहिलं नव्हतं……. आज तुझ्यामुळे ती हसलीय….. तुझ्याशी बोलताना तिच्या चेहऱ्यावर खराखुरा आनंद मला दिसत होता…. मला मनापासून वाटते की आयुष्यभर माझी दी अशीच हसतमुख आणि आनंदी राहायला पाहिजे…. थँक्यू सोss सो ss सो ss मच.”

नील म्हणाला, “तुझ्या एका अटीची पूर्तता केलीय मी…. हा तर ट्रेलर आहे जाssनी …. आगे आगे देखिये होता हैं क्या?”

तेवढ्यात दी कॉफी घेऊन आली. “कसल्या ट्रेलरची बात चाललीय?”

“काही नाही ग दी, एक नवीन मूव्ही येतोय. त्याचा यूट्यूब वर ट्रेलर आलाय, त्याबद्दल आम्ही बोलत होतो.”

(क्रमशः)

— © संध्या प्रकाश बापट

सौ. संध्या प्रकाश बापट
About सौ. संध्या प्रकाश बापट 50 Articles
नमस्कार वाचकहो, मी, सौ. संध्या प्रकाश बापट (माहेरची पद्मश्री विष्णू फाटक), सातारा. मी, सातार्‍यातील विविध कंपन्यांमध्ये/ऑफिसमध्ये अनेक वर्षे विविध पदांवर काम केले. तसेच काही वर्षे स्वतःचा व्यवसायही केला. 2018 मध्ये मी, नोकरी आणि व्यवसायातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. या सगळ्या वर्षांत, इच्छा असूनही मनासारखे लिहिण्यास वेळ उपलब्ध होत नव्हता. मला लहानपणापासून संगीत, नाटक, सिनेमा, अभिनय आाणि वाचन या सगळ्याची प्रचंड आवड आहे. मी हौशी नाटकांत, एकांकिका, पथनाट्य यांत अभिनय करत होते. युट्यूब वरील वेब सिरीजमध्ये अभिनय करत आहे. नुकतेच झी टीव्ही वरील 'लागीर झालं जी' आणि 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत मी भूमिका केल्या आहेत. मी लघुकथा, कविता, प्रासंगिक लेख, वेब सिरीजसाठी मराठी आणि हिंदीतून कथा-पटकथा लिहीत आहे. काही लघुकथा ई-दिवाळीअंकात प्रसिद्ध झाल्या आहेत. माझ्यातील सुप्तगुणांना प्रेरणा आणि वाव देण्यामध्ये फेसबुक आणि व्हाटस्अ‍ॅप या सोशल मिडीयाचा आणि मला कायम प्रोत्साहन देण्यार्‍या तुम्हा सर्व वाचकांचा फार मोठा वाटा आहे.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..