नवीन लेखन...

अजब न्याय नियतीचा – भाग ६

तिघंही कॉफी पीत बराच वेळ गप्पा मारत बसले होते. नीलशी बोलताना दी खूपच आनंदी दिसत होती…… नील जरी आरूचा मित्र होता तरी तो घरी आल्यापासून दीबरोबरच जास्त गप्पा मारत होता. आरू एकदा दीकडे आणि एकदा नीलकडे समाधानाने पाहात बसली होती. आज तीला तिच्या दीचा आनंद जास्त महत्त्वाचा वाटत होता.

बोलता बोलता किती वेळ झाला याकडे कोणाचेच लक्ष नव्हते. एवढ्यात नीलचा मोबाइल वाजला…… त्या रिंगच्या आवाजाने सगळे भानावर आले…. नीलच्या मित्राचा फोन होता. … त्याला ‘हो… हो ….. मी दहा पंधरा मिनिटांत पोहोचतोच’ असं म्हणून नीलने मोबाइल बंद केला.

“ok मग, लता आणि आरू, मी निघतो आता…. माझा एक मित्र माझी वाट बघतोय…. त्याला मी आज रात्री भेटायचे प्रॉमिस केले होते…… त्यामुळे आता मला जावं लागेल…. गप्पांच्या नादात किती वेळ गेला ते समजलेच नाही…. बाय, भेटू पुन्हा…. लवकरच…….आणि हो लता, तुम्हाला दोघींना भेटून मलाही खूप आनंद वाटला.”

दी म्हणाली, “खरं तर नील, आज तुझ्यामुळे आम्ही सुद्धा खूप दिवसांनी हसत खेळत गप्पा मारल्या….. आम्हालाही तुला भेटून बरं वाटलं. वेळ असेल तेव्हा येत जा अधून मधून…..”

“हो लता, नक्कीच… या बाजूला कधी येणं झालं तर नक्की भेटून जाईन, आणि पेंटिंग्जच्या संदर्भातपण माझी काही मदत लागली तर नक्की सांग. बाय आरू, बाय लता…” असं म्हणून नील निघून गेला.

नीलला भेटून दी ला आनंद झाला हे पाहून आरूलाही आनंद झाला. ती दीच्या समाधानी आणि हसऱ्या चेहेऱ्याकडे पाहत होती….

दीचे तिच्याकडे लक्ष गेले…… “आरू, अशी काय बघतीएस माझ्याकडे?”

“दीsss, अगं मी तुला खूप खूप दिवसांनी असं खुश झालेलं पाहतेय ना म्हणून…… तू अशीच आनंदी राहावीस असं वाटतं मला…… मग, राहशील ना? ….

“हो आरू, मी प्रयत्न करेन. पण खरंच…. नील आपल्याकडे आला आणि सगळे वातावरणच बदलून गेले. आजचा दिवस कायम लक्षात राहील माझ्या….”

मधल्या कालावधीत नील वरचेवर काही ना काही कारणाने आरूच्या घरी येत राहिला. हळुहळू लताही त्याच्याशी मनमोकळेपणाने वागू लागली. लताने खूप महिन्यांच्या गॅपनंतर पुन्हा नवीन चित्रं काढायला घेतली होती. नील घरी आला की, शक्यतो हॉल मधेच बोलत बसत असे. पण लता जर तिच्या चित्रांच्या दालनात चित्र काढत बसली असेल तर, नील तिच्या दालनात जाऊन बसत असे. कधी चित्र काढताना अधूनमधून ती त्याच्याशी गप्पा मारत असे, कधी एकाग्रपणे फक्त चित्र काढत बसे….. नील तिच्या चित्रांकडे तर कधी तिच्या एकाग्र, तल्लीन चेहेऱ्याकडे पाहत बसत असे. अशावेळी आरू शक्यतो चहा-कॉफी देण्यासाठीच दालनात येत असे. एरवी लता आणि नीलच दालनात असत.

एकदा नील लताची नवीन काढलेली चित्रं पाहत होता….. त्याच्या लक्षात आले की देवळं, वाडे, नद्या, डोंगर या विषयांची लताची निसर्गचित्रे जास्त मनमोहक आहेत. पण त्यात कांहीतरी कमी जाणवत असे.

तो एकदा लताला म्हणाला, “लता, If you don’t mind, एक विचारलं तर रागावणार नाहीस ना?”
लता हासून म्हणाली, “अच्छा, म्हणजे मला राग येऊ शकेल असं काही विचारायचं आहे का तुला? बरं विचार, पण रागवायचं कि नाही, ते तुझा प्रश्न काय आहे त्यावर अवलंबून राहील.”

“तू आत्ता जी निसर्गचित्रे काढली आहेस ना, ती सुंदरच काढली आहेस, त्याबद्दल काही वादच नाही. पण एक रसिक म्हणून विचारशील तर, मला त्यात जिवंतपणा थोडा कमी वाटतोय…… मला एक सांग, तू ही चित्रं नुसती तुझ्या कल्पनेतून काढते आहेस की हे देखावे तू कुठे पाहिलेले आहेस?

लता म्हणाली, “Actually, मी लहानपणी आई बाबांबरोबर आमच्या मूळ गांवी जात असे….. तिथे आमची खूप शेती आहे, मोठ्ठा वाडा आहे. आमचं गांव खूप छान आहे. आम्ही तेथे गेलो की खूप फिरायचो, धम्माल करायचो….आम्ही चौघंही एकत्र खूप मजा करायचो…. त्या आठवणी माझ्या आयुष्यातल्या सर्वात best आठवणी आहेत. त्यावेळी पाहिलेला निसर्ग माझ्या मनात पक्का बसलेला आहे. मोठ्ठ झाल्यावर हळुहळू आमचं गांवी जाणं कमी झालं. आई बाबा गेल्यावर तर फार क्वचितच आम्ही तिकडे जातो. तिथला आमचा जुना वाडा, शेतीवाडी याची व्यवस्था पाहण्यासाठी बाबांनी कायमस्वरूपी एक मॅनेजर आणि एक कुटुंब नेमलेले आहेत…… बाबांची खूप विश्वासू माणसं आहेत ती. तेच तिथला सगळा कारभार पाहत असतात. आम्ही दोघी अधूनमधून चक्कर टाकून येतो. बाकी इस्टेटीच्या कामकाजासंबंधी मेल वरून, फोन वरूनही अपडेट्स मिळत असतात. पण लहानपणी पाहिलेल्या त्या सुंदर गोष्टी अजूनही माझ्या मनात कोरल्या गेल्या आहेत. मला वाटतं त्या जशा आठवतील त्याप्रमाणे कल्पना करून मी ही चित्रं काढते.”

नील म्हणाला, “Wow, लता तू जर आठवणींवर इतकी सुंदर चित्रं काढत असशील तर, तू प्रत्यक्ष तसे देखावे परत पाहिलेस तर कदाचित मला या चित्रांत जी थोडीशी जिवंतपणाची उणीव जाणवते ना, ती पूर्णपणे निघून जाईल असं मला वाटत. आपण असं करूया का?…. आपण दोन तीन दिवस वेळ काढून ट्रिप म्हणूनच तुमच्या गांवी जाऊन येऊया का? मला पण आवडेल तुमचं गांव पाहायला. तसंही इथं शहरात सतत गोंगाट, कोलाहल, आणि फास्ट रुटीन याचाही कंटाळा आलाय मला. आपल्या रुटीनमधेही थोडासा चेंज होईल आणि गावाला व्हिजिट पण होईल. कसं?”
लता म्हणाली, “तसंही आमचं अलीकडे गांवी जाणं झालेलंच नाही. पण आरूला कितपत वेळ मिळेल बघावं लागेल….मी बोलते आरूशी….तुमच्या ऑर्केस्ट्राचे काही प्रोग्राम आधीच ठरले असतील तर तसं आरूला विचारावं लागेल ना? मग आपण तारीख ठरवू …”

“OK, मग आपलं जायचं ठरलं की आपण माझी गाडी घेऊनच गांवी जाऊया. मीही तारखांबाबत आरूशी बोलतो.”

नीलने जेव्हा आरूकडे हा विषय काढला तेव्हा आरू जाss म खूष झाली. तिला पण खूप दिवसांपासून गांवी जावे असे वाटत होते. मागे चार वर्षांपूर्वी त्या गावी जाऊन आल्या होत्या. त्यावेळी घडलेल्या कांही कटू आठवणींमुळे त्यांचे आयुष्य पुन्हा एकदा बदलून गेले होते. गावाला जाण्यापूर्वी आईबाबांच्या अचानक जाण्याच्या धक्क्यातून सावरून पुन्हा छान आयुष्य जगायला सुरुवात केलेली दी, गांवी गेले असताना घडलेल्या अप्रिय घटनांमुळे पुन्हा स्वतःच्या कोषात हरवून गेली होती. दीच्या मनाच्या खोल डोहात काय दडून बसलं होतं ते अद्यापपर्यंत आरू बाहेर काढू शकली नव्हती. आरूला नील भेटल्यापासून, त्याचा स्वभाव जाणल्यापासून, आरूच्या मनात एक आशेची पालवी फुटली होती. नीलने जेव्हा आरूला लग्नाची मागणी घातली तेव्हाच आरूने नीलला आपल्या बहिणीबद्दल सांगून, दीला परत माणसांत आणण्यासाठी त्यानं प्रयत्न करावेत अशी अट घातली होती. एकतर दीचे लग्न झाल्याशिवाय ती लग्न करणारच नव्हती, आणि कोणत्याही परिस्थितीत आरू आणि दी, कोणत्याही कारणाने एकमेकींना एकटं सोडून जाणार नाहीत, हे दोघींनी पक्के ठरवले होते. तिच्या अपेक्षेप्रमाणे नील त्यांच्या आयुष्यात आल्यापासून दीच्या वागण्यात जे पॉझिटिव्ह बदल होत होते, त्यावरून कदाचित नीलच आपल्या दीला तिच्या कोषांतून बाहेर काढू शकेल असा आरुला विश्वास वाटत होता.
हा सगळा विचार करून आरू नीलला म्हणाली, “नील, बरं झालं तूच दीकडे हा विषय काढलास ते. तुझ्यामुळे ती गांवी जायला तयार झाली. मी आपल्या शोचे शेड्युल पाहून, आपल्याला किती दिवस मोकळे मिळू शकतात ते पहाते, त्याप्रमाणे आपण गांवी जायचे नक्की करू. मागे मी तुला म्हणाले होते ना, आम्ही चार वर्षांपूर्वी गांवी गेलो होतो. तिथे ज्या काही घटना घडल्या त्यामुळे, तिथून परत आल्यापासून दीचा स्वभाव पुन्हा गंभीर झाला होता. मला असे वाटते की, आपण परत गांवी गेलो तर, कदाचित आपल्याला त्यावेळी तिथे नक्की काय झाले होते याचाही शोध लागेल. तिथल्या वातावरणात गेल्यावर दी मोकळेपणाने बोलेलाही कदाचित…..अर्थात या सगळ्या शक्यताच आहेत. पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे ना?”

नील गंभीर होत म्हणाला, “आरु, तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का? आपण अंदाज केला होता त्या मानाने दीमध्ये बऱ्यापैकी पॉझिटिव्ह बदल होत आहेत. आपण गांवी गेल्यावर जर ती खरंच मोकळेपणाने आपल्याशी किंवा माझ्याशी जरी बोलली, तरी यावर आपल्याला काहीतरी सोल्युशन काढता येईल, आणि मग मी तिला स्वतः आपल्या दोघांच्या प्रेमाबद्दल सांगेन आणि तिच्याकडे तुझा हात मागेन, चालेल?”

“नक्कीच नील, मी ही त्याच दिवसाची वाट पाहतेय. मग मी सांगते तुला कोणत्या तारखा फ्री आहेत ते आणि त्याप्रमाणे प्लँन करून आपण गांवी जाऊया.”

(क्रमशः)

— © संध्या प्रकाश बापट

सौ. संध्या प्रकाश बापट
About सौ. संध्या प्रकाश बापट 50 Articles
नमस्कार वाचकहो, मी, सौ. संध्या प्रकाश बापट (माहेरची पद्मश्री विष्णू फाटक), सातारा. मी, सातार्‍यातील विविध कंपन्यांमध्ये/ऑफिसमध्ये अनेक वर्षे विविध पदांवर काम केले. तसेच काही वर्षे स्वतःचा व्यवसायही केला. 2018 मध्ये मी, नोकरी आणि व्यवसायातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. या सगळ्या वर्षांत, इच्छा असूनही मनासारखे लिहिण्यास वेळ उपलब्ध होत नव्हता. मला लहानपणापासून संगीत, नाटक, सिनेमा, अभिनय आाणि वाचन या सगळ्याची प्रचंड आवड आहे. मी हौशी नाटकांत, एकांकिका, पथनाट्य यांत अभिनय करत होते. युट्यूब वरील वेब सिरीजमध्ये अभिनय करत आहे. नुकतेच झी टीव्ही वरील 'लागीर झालं जी' आणि 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत मी भूमिका केल्या आहेत. मी लघुकथा, कविता, प्रासंगिक लेख, वेब सिरीजसाठी मराठी आणि हिंदीतून कथा-पटकथा लिहीत आहे. काही लघुकथा ई-दिवाळीअंकात प्रसिद्ध झाल्या आहेत. माझ्यातील सुप्तगुणांना प्रेरणा आणि वाव देण्यामध्ये फेसबुक आणि व्हाटस्अ‍ॅप या सोशल मिडीयाचा आणि मला कायम प्रोत्साहन देण्यार्‍या तुम्हा सर्व वाचकांचा फार मोठा वाटा आहे.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..