आरूने तिचे शेड्युल पाहून १२ ते १५ फेब्रुवारी या तारखा गांवी जाण्यासाठी नक्की केल्या. जाण्यापूर्वी तिला तिच्या पूर्ण ऑर्केस्ट्रामधील इतर मित्रमंडळींना प्रॅक्टिस संबंधी महत्त्वाच्या सूचना द्यायच्या होत्या. चार-पाच दिवसांसाठी ट्रीपला जात असल्यामुळे घरातील इतर गोष्टींची व्यवस्था लावायला हवी होती. गांवी लागणाऱ्या वस्तूंचे शॉपिंग करायचे होते. गांवी जाताना ते नेहमीच लक्ष्मणकाका, हौसाबाई आणि केळकर साहेब यांच्यासाठी भेटवस्तू घेत असत. ती खरेदी करायची होती. गांवच्या इस्टेटीचे मॅनेजर श्री. केळकर, त्यांना गांवी उपलब्ध न होणाऱ्या अशा काही खास वस्तू, ज्या शहरातूनच आणणे शक्य आहे, अशा वस्तूंची यादी काळवीत असत, त्याही वस्तूंची खरेदी करायची होती.
वास्तविक ही सगळी खरेदीची कामे नेहमी दीच करत असे. पण आता नुकतेच तिने परत पेन्टिंग्ज काढायला सुरुवात केली असल्यामुळे, तिला त्यातून या कामांसाठी वेळ काढणे शक्य होत नव्हते. मग आरुनेच या सगळ्या कामांची जबाबदारी स्वतःवर घेतली होती. नीलसुद्धा उत्साहाने तिच्याबरोबर सर्व खरेदी करण्यासाठी फिरत होता. या सगळ्या खरेदीच्या गडबडीत आणि धावपळीमध्ये आठवडा कसा संपला ते आरूला कळलेच नाही. त्यामुळे १० तारखेला तिचा वाढदिवस आहे हे ती पार विसरून गेली होती.
१० तारखेला संध्याकाळी नीलने आरुला फोन करून, तिला आणि दिला आवरून तयार राहा म्हणून सांगितले. आरूने विचारले की कुठे बाहेर जायचे आहे का? तेव्हा नील म्हणाला की तुम्हा दोघींसाठी एक सरप्राईज आहे. पार्टीसाठी छान तयार व्हा, मी तुम्हाला घ्यायला येतो.
तसंही आठवडाभर धावपळ करून आरू कंटाळली होती. त्यामुळे ती पार्टीला जायला लगेच तयार झाली.
आरूने जाताजाता दीच्या रुममध्ये डोकावून सांगितले, “दीsss, पटकन तयार हो, आपल्याला नीलबरोबर पार्टीला जायचे आहे” एवढं बोलून ती स्वतःचं आवरायला तिच्या खोलीत निघून गेली. दी रूममध्ये होती कि नाही ते तिने पहिलेच नाही.
अर्ध्या तासात नील त्यांच्या घरी पोहोचला. त्याने हाक मारली, “आरूss, लताss, चला लवकर, निघूया आपण.”
नीलचा आवाज ऐकून आरू बाहेर आली. आज ती खूपच छान सजली होती. नील तिच्याकडे पाहताच राहिला. नेहमी ड्रेस घालणारी, फुलपाखरासारखी बागडणारी अवखळ आरू आज साडी नेसून तयार होती. छान मेकअप आणि हेअरस्टाईल केल्यामुळे मुळातच सुंदर असणाऱ्या आरुचं रुपडं आणखीनच खुलून दिसत होतं.
नील अनिमिष डोळ्यांनी तिच्याकडे पाहून म्हणाला, “My God आरू, काय Gorgeous दिसतियेस तू? आज तुझ्याकडे पाहून मला खरोखरंच माझ्या स्वप्नातली परी – माझी Dream Girl प्रत्यक्षात माझ्यासमोर प्रगट झालीय असं वाटतंय. Love You Darling!!!”
आरू आधी छानसं लाजली आणि मग लटक्या रागाने डोळे वटारून त्याला म्हणाली, “कौतुक पुरे बरं आता, आणि आपलं काय ठरलंय ते विसरलास का तू? नशीब, दी आत्ता समोर नव्हती ते, तिनं ऐकलं असतं तर? नाहीतर…… बरं ते जाऊदे. अरे, आपल्याला पार्टीला जायला उशीर होतोय ना? चल मग निघूया आपण, आणि हे काय, दी अजून कशी आवरून बाहेर आली नाही?”
आरू परत दीच्या रूमपाशी गेली आणि दीला हाका मारू लागली, “दी, आवरलं का तुझं? चल लवकर, नील आलाय.”
पण दीच्या रूममधून काहीच प्रतिसाद ऐकू आला नाही. तोपर्यंत नीलही रूमच्या दारात येऊन थांबला. आरुनं रूममध्ये डोकावून पाहिलं, दी रूममध्ये नव्हती. “नील, मला वाटतं दी तिच्या चित्रांच्या दालनात असेल. चल आपण बघूया.” असे म्हणून ती दोघेही दीच्या दालनात गेली.
दालनात अंधार पसरलेला होता. दोन छोटे निळ्या रंगाचे डीम लाईट दोन कोपऱ्यात चालू होते, पण दी कुठंच दिसत नव्हती. दीच्या या दालनाला लागूनच आत एक रूम होती. अडगळीची खोली. ती जास्त वापरात नव्हती. जुने कॅनव्हास, काही अर्धवट राहिलेली चित्रं, इतर काही जास्तीचं नको असलेलं सामान, अशा गोष्टी या रूममध्ये ठेवल्या जात असत. आरूने त्या रूममध्ये डोकावून पहिले. तिथंही एकच लहान दिवा चालू होता. रूमच्या एका कोपऱ्यात दी पाठमोरी उभी होती. यांनी आधी मारलेल्या हाका बहुतेक तिने ऐकलेल्या नव्हत्या. ती तिच्याच तंद्रीत उभी होती. आरूने रूमच्या दाराजवळचा एक दिवा चालू केला आणि दोघेही दीच्या जवळ गेले, तर दी काळ्या कापडाने झाकलेल्या एका चित्रासमोर उभी होती. तिचे डोळे पाण्याने डबडबलेले होते. आरूने तिच्या खांद्यावर हात ठेवताच दी एकदम दचकून भानावर आली.
नील पुढे झाला आणि त्याने त्या चित्रावरील काळे कापड बाजूला केले आणि हातात घेतले. पाहतो तर तो एक काळा बुरखा होता. त्याचवेळी आरूचेही त्या बुरख्याकडे लक्ष गेले. बुरखा? तोही आपल्या घरात? दोघांनाही आश्चर्य वाटले. तोपर्यंत दीने तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले होते. बुरखा बाजूला ठेवून त्यांनी बुरख्यामागे झाकलेल्या चित्राकडे पहिले. ते एक अपूर्ण राहिलेले पोर्ट्रेट होते. नीलचे जसे त्या चित्रातील व्यक्तिच्या चेहेऱ्याकडे लक्ष गेले तसे त्याला एकदम भोवळ आल्यासारखे झाले. तो खाली कोसळणारच होता, इतक्यात दोघींचेही त्याच्याकडे लक्ष गेले आणि त्यांनी नीलला आधार दिला. याला एकदम काय झाले ते त्यांना कळेना. दोन्ही बाजूंनी आधार देऊन त्या नीलला बाहेरच्या दालनात घेऊन आल्या. तेथील एका खुर्चीवर त्याला बसवून आरू पाणी आणायला धावत आंतमध्ये निघून गेली. तेवढ्यात दीने नीलचे डोके खुर्चीला टेकवून त्याला बसवले आणि आतल्या रूममध्ये जाऊन तिने ते चित्रं परत काळ्या बुरख्याने झाकले, आतले सर्व दिवे बंद करून, रूमचे दार बंद करून घेऊन ती परत नीलपाशी येऊन थांबली.
ती नीलला काय झाले विचारायचा प्रयत्न करत होती. इतक्यात आरू पाणी घेऊन आली. पाण्याचे सपकारे नीलच्या चेहेऱ्यावर मारताच तो हळूहळू जागा होऊ लागला. आरूने मग त्याला थोडे पाणी प्यायला दिले. पाणी प्यायल्यावर त्याला थोडी हुशारी वाटायला लागली. काही क्षण त्याला कळेना की तो कुठे आहे?
आरू त्याला काळजीने विचारात होती, “नील, तुला बरं वाटतंय ना? असं अचानक काय झालं तुला?”
“मला काय झालंय? तुम्ही दोघी अशा काय बघताय माझ्याकडे? मंगळावरून एलियन उतरून तुमच्या घरात आल्यासारखं?”
लता इतकावेळ गप्प बसून आरूची धावपळ पाहत होती, आता ती नीलला म्हणाली, “नील चेष्टा करू नकोस. मला सांग तुला कशाने भोवळ आली? आम्ही किती घाबरलो होतो माहितेय? चल आपण डॉक्टर कडे जाऊ.”
“छे छे, डॉक्टर कडे कशाला? अग, गेले दोन-तीन दिवस शॉपिंगसाठी उन्हात फिरलो ना? त्यामुळे कदाचित आली असेल भोवळ. मी एकदम बरा आहे आता. आपल्याला पार्टीला जायचं होतं म्हणून मी तुम्हा दोघींना घेण्यासाठी आलो होतो……आणि हे काय लता, तू अजून तयार झाली नाहीस?”
“पार्टीला? कशाबद्दल? म्हणजे कोणाकडे जायचं आहे पार्टीला? तुला बरं वाटत नसेल तर नको जाऊया आपण पार्टीला.”
“असे प्रश्न विचारल्यावर पार्टीचं सरप्राईज काय राहिलं? लता तू तयार हो बघू पटकन, आपण जातोय पार्टीला. मला एवढंच माहिती आहे की, ही पार्टी आपण cancel करू शकत नाही. At any cost.”
आरूनेही दीला आग्रह केला, “दीss, Please तयार हो ना पटकन, मघाशीच नीलचा फोन आला होता तयार व्हा म्हणून, मी तुला सांगूनही गेले होते, पण बहुतेक तुझं लक्ष नव्हतं आणि तू त्या अडगळीच्या खोलीत अंधार करून बसली होतीस.”
आरूचं बोलणं मध्येच थांबवत नील तिला म्हणाला, “आरू, जाऊ दे ना तो विषय. आपल्याला उशीर होतोय. लता तू खरंच पटकन आवर तुझं, आरू, तू तोपर्यंत माझ्यासाठी कॉफी बनवतेस?”
दी म्हणाली, “Sorry Neel, माझ्यामुळे उशीर झाला. मी आवरते पटकन. आलेच.” असं म्हणून दी तिच्या रूममध्ये निघून गेली. नील आणि आरू बाहेर हॉलमध्ये आले. आरू कॉफी करायला किचन मध्ये गेली.
नील मघाशी घडलेल्या घटनेचा विचार करत होता….. लताच्या रूममध्ये बुरखा असण्याचं काय कारण?……. त्यानं आत्तापर्यंत तिने काढलेली जवळ जवळ सगळी चित्रं पहिली होती, त्यात बुरखाधारी व्यक्तीचे कोणतेच चित्र त्याच्या पाहण्यात आले नव्हते. त्या बुरख्याखाली झाकलेलं चित्र कोणाचं होतं?……..ते पाहिल्यावर मला धक्का का बसला? ……लताच्या डोळ्यात पाणी का आले होते?……..खरं तर काही क्षणच नीलची नजर त्या चित्रावर पडली होती. त्या कोपऱ्यात पुरेसा उजेड पडलेला नसल्यामुळे त्याला एवढंच दिसलं, की ते पूर्ण झालेलं चित्र नव्हतं. पण त्या चित्रातील व्यक्तीचा चेहेरा मात्र नीलला कुणाचीतरी तीव्रतेने आठवण करून देऊन गेला……त्या तीव्र आठवणींच्या आवर्तनांनी नीलला भोवळ आली होती. तो आठवायचा प्रयत्न करत होता….. इतक्यात आरू कॉफी घेऊन आली, त्यामुळे नीलची विचारांची शृंखला तुटली.
कॉफी प्यायल्यावर नीलला आता खूपच बरं वाटायला लागलं होतं. दी पण तयार होऊन आली. तिनंही पार्टीला साजेल असे आवरले होते. पण तिच्याकडे बघायला आत्ता कुणालाच वेळ नव्हता. तिघंही नीलच्या गाडीतून पार्टीला जाण्यासाठी बाहेर पडली……
(क्रमशः)
— © संध्या प्रकाश बापट
Leave a Reply