अजय सरपोतदार यांचे पुण्यातील श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलमध्ये शालेय शिक्षण झाले. १९७६ साली दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी पुण्यातील बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समधून १९८१ मध्ये त्यांनी अर्थशास्त्र विषयात पदवी मिळवली. त्यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९६० रोजी झाला. चित्रपट क्षेत्रात मात्र त्यांनी दहावीच्या परिक्षेनंतर म्हणजे १९७६ मध्ये काम करायला सुरवात केली. सहायक निर्मिती व्यवस्थापक म्हणून ते काम करू लागले. त्यानंतर ते हॉलिवूड तसेच बॉलीवूडच्या चित्रपटांसाठी जाहिरात आणि प्रसिद्धीच्या कामाकडे वळले. प्रसिद्धी प्रमुख म्हणून हाताळलेला “वो सात दिन’ हा त्यांचा पहिला चित्रपट. आपल्या या अनुभवाला शिक्षणाची जोड असावी या हेतूने अजय सरपोतदार यांनी मुंबईच्या के.सी. कॉलेज ऑफ मॅनेजमेंटमधून व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण घेतले. तसेच जाहिरात आणि जनसंपर्क विषयात पदव्युत्तर पदविका प्राप्त केली. त्यांनी सुमारे ५०० चित्रपटांच्या प्रसिद्धीचे काम केले. याशिवाय २०० जाहिरातपट, कॉर्पोरेट फिल्म्स, माहितीपट तयार केले.
टाटा मोटर्स या नामांकित कंपनीसाठी सरपोतदार यांनी अनेक जाहिराती आणि माहितीपट (डॉक्युयमेंटरी) तयार केले. अजय सरपोतदार यांनी आपल्या विविधांगी कारकिर्दीत हैदराबाद येथील जगप्रसिद्ध रामोजी फिल्म सिटीत अनेक वर्ष वरिष्ठ निर्माते म्हणून जबाबदारी सांभाळली. मराठीबरोबरच प्रादेशिक वाहिन्यांचे काम त्यांच्याकडे देण्यात आले होते. आपले वडिल विश्वा स सरपोतदार आणि आजोबा नानासाहेब सरपोतदार यांच्या पावलावर पाऊल टाकत चित्रपट क्षेत्रात काम करू लागलेले अजय सरपोतदार १९९५ मध्ये “पैंजण’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरले. आजोबा नानासाहेब सरपोतदार यांनी १९१९ साली स्थापन केलेल्या आर्यन फिल्म कंपनीचे त्यांनी पुनरूज्जीवन केले. या कंपनीच्या बॅनरखाली सरपोतदार यांनी अलिकडेच कोटींचे बजेट असलेल्या उलाढाल या चित्रपटाची निर्मिती केली होती. बॉलिवूडमधील चित्रपटांच्या तोडीसतोड असे तांत्रिक पाठबळ वापरून हा चित्रपट तयार करण्यात आला होता. त्याचे चित्रिकरण मॉरिशसमध्ये करण्यात आले.
“उलाढाल’ प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांच्या प्रतिसाद मिळत असतानाच तिसऱ्याच आठवड्यात मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे या चित्रपटाला चांगलाच फटका बसला. निर्माते, दिग्दर्शक आणि वितरक असलेल्या अजय सरपोतदार यांची जुलै २००५ मध्ये अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. यशवंत भालकर यांनी राजीनामा दिल्यानंतर सरपोतदार यांची निवड करण्यात आली. त्यानंतर जानेवारी २००९ मध्ये फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या खजिनदारपदी सरपोतदार यांची फेरनिवड करण्यात आली.
मॉरिशस सरकारच्या मॉरिशस फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या संस्थेचे व्यावसायिक राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. अजय सरपोतदार यांनी मॉरिशसमध्ये झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाचे यशस्वीरित्या आयोजन केले. मुंबई आणि हैदराबादच्या धर्तीवर पुण्यातही फिल्मसिटी असावी अशी त्यांची इच्छा असल्याने अजय सरपोतदार यांनी हडपसर परिसरात फिल्मसिटीसाठी जागा मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. अजय सरपोतदार यांचे ३ जुन २०१० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply