माझा रायपूरचा विद्यार्थी एम बी ए झाल्यावर माझ्याच संस्थेत मुलाखतीसाठी आला.
पॅनल मधील एकाने त्याला विचारले- ” तू कोणता विषय शिकवू शकशील?”
तो म्हणाला- ” स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट ”
मी मनातल्या मनात कपाळावर हात मारीत विचारलं – ” जमेल तुला? अगदी फ्रेश आहेस.”
नव्या पिढीच्या अंगीभूत (कधीकधी उद्धट, मग्रुरीकडे झुकणाऱ्या पण वरपांगी ) आत्मविश्वासाने तो म्हणाला – त्यात काय? मी topper आहे. तुमच्या नोट्स आहेत की माझ्याकडे. थोडे पी पी टी बनवीन.
“बाबारे, हा विषय शिकवायला इंडस्ट्रीत किमान २५ वर्षे नोकरी करावी लागते ! ” एवढं बोलून आम्ही मुलाखत आवरती घेतली.
मागील आठवड्यात गाजावाजा झालेला लिटील चॅम्प्स बघितला. पंचरत्न म्हणून पुढे महाराष्ट्रात नावाजली गेलेली मुग्धा, कार्तिकी, आर्या, रोहीत आणि प्रथमेश आता वेगळ्या भूमिकेत दिसली. आणि त्यांना ते काम अजिबात जमत नव्हतं. एकतर त्यांची गायक म्हणूनच अद्याप कारकीर्द मोठी नाही, रियाझ /साधना पूर्ण झालेली नाही आणि लगेच त्यांना इतरांचे मूल्यांकन करायला सांगणे? उथळपणे शेरेबाजी करणारा अवधूत गुप्ते त्यांचा आदर्श असावा.पण त्यांच्या अभिप्रायांमध्ये कोठलीही खोली नव्हती, अभ्यास दिसत नव्हता, ‘चांगलं “म्हणण्याची घाई होती आणि रंगमंचावरील खऱ्याखुऱ्या छोट्या दोस्तांच्या हाती काही पडत असेल असं काही दृश्य दिसत नव्हतं.मग ही घाई कशासाठी? लोकप्रियता एनकॅश करण्यासाठी? प्रसिद्धी /अर्थप्राप्ती व्हावी म्हणून की रिऍलिटी शो मधील एक नवा प्रयोग म्हणून?
मागील सहस्त्रकात एकदा माझ्या पत्नीच्या काव्यवाचनाच्या रेकॉर्डिंग साठी आम्ही सांगली आकाशवाणी केंद्रावर गेलो होतो. सकाळी प्रसारित होणाऱ्या “चिंतन” कार्यक्रमात मी भाग घेऊन काही विचार पाठवू शकतो का ? असं मी केंद्राधिकाऱ्यांना विचारले.
” चिंतन मध्ये आपले विचार व्यक्त करणाऱ्या वक्त्याचे वय साठपेक्षा अधिक असावे असा आमचा नियम आहे.” त्यांनी सांगितले. त्याशिवाय जीवनाची खोली कशी अनुभवायला येणार, विचारांची शिदोरी तयार होणार नाही असा काहीसा त्यांचा निकष असावा. जीवनाचे चिंतनपर रसग्रहण करण्यासाठी तेवढी वाटचाल तर हवी. या न्यायाने “माउली ” बाद असा काहीसा खोडकर विचार त्यावेळी माझ्या मनाने दाबला.
१९८१ साली ताजा ताजा -ओव्हन हॉट इंजिनिअर बनून मी बजाज ऑटो ला लागलो. कुंभार नावाचे फोरमन माझ्या मदतीला देण्यात आले. गडी अंगठा छाप पण तीस वर्षे बजाज च्या स्कुटर असेम्ब्लीत कामगार म्हणून स्टार परफॉर्मर ! म्हणून फोरमन म्हणून प्रमोट करून आमच्या नव्याने सुरु झालेल्या एम-५० च्या असेम्ब्ली विभागात त्यांना पाठविले होते. कामाला वाघ, दुरुस्त्या,अडचणी चटाचट सोडवायचा. पण शिफ्ट रिपोर्ट लिहा, कामगारांचे उत्पादन नोंदवा म्हटले की कुंभार माझ्याकडे यायचे. त्यांना साहेबांशी इंग्रजीत बोलता यायचे नाही. शिस्त/उत्पादकता याबाबत घळेपणा. सतत कामगारांना सांभाळून घ्यायचे. कामगार उशिरा आले,लवकर काम संपविले, त्यांनी रोजचे टार्गेट गाठले नाही तरी कुंभार शांत ! जेवणाच्या सुटीनंतर हमखास कामगारांबरोबर मुतारीत बिडी मारायचे, शेजारच्या टपरीत वेळी अवेळी चहाला जायचे. त्यामुळे माझे आणि त्यांचे खटके उडायचे.
त्याकाळातील भारतीय कंपन्या ही चूक हमखास करायच्या- चांगल्या कामगारांना कामाचे बक्षीस म्हणून सुपरवायझर करायच्या. एकदा व्यवस्थापन शास्त्रातील एक तत्व माझ्या कानी पडले –
By promoting a good worker, you are losing a good performer and landing up with a bad supervisor ! Thus it is two way loss for the organization !
या “पंचरत्नांचे ” असे दुहेरी नुकसान न होवो !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply