नवीन लेखन...

आकाशी खाईक्यो ब्रिज

जगातल्या ५ महत्त्वाच्या सस्पेंशन ब्रिज मधील सर्वोत्तम! जगप्रसिद्ध गोल्डन गेट ब्रिज पेक्षा लांब व मोठा असलेला इंजीनियरिंगचा चमत्कार!

माणसाने ठरवलं तर अशक्य काहीच नसतं हे आपण बऱ्याचवेळा ऐकतो आणि लोकांना समजावतो सुद्धा! ह्याची पुरे पुर प्रचिती देणारी एक जागा म्हणजे जपान मधला सस्पेंशन ब्रिज! आकाशी खाईक्यो .. (Akashi-Kaikyo Bridge)

हा ब्रिज आकाशी स्ट्रेट मध्ये जपानच्या `आवाजी आयलँडला` होन्शु (मेनलॅन्ड) शी जोडतो. स्ट्रेट म्हणजे दोन मोठ्या जलाशयांना जोडणाऱ्या नैसर्गिक कालव्यासमान असलेला पाण्याच्या प्रवाह (सामुद्रधुनी) आकाशी स्ट्रेट हा जगातल्या सर्वात अवघड आणि धोकादायक स्ट्रेट मधील एक मानला जातो.  कारण हा भाग भुकंप प्रवण क्षेत्रातल्या मुख्य पट्ट्यातील असून जपानच्या मध्य Fault Line वरती आहे. Fault म्हणजे पृथ्वीच्या कवचाला पडलेली भेग. जमिनी मध्ये खंड पडणे अशी फॉल्ट लाइनची व्याख्या आहे.

भौगोलिक दृष्ट्‍या पाहिले तर ह्याचा अर्थजेव्हा पृथ्वीच्या टेक्टोनिक प्लेट्स सरकतात आणि भूकंप होण्याची शक्यता असते तेव्हा असे क्षेत्र उद्भवते. प्लेट टेक्टोनिक्सचा सिद्धांत किंवा कल्पना सांगते की पृथ्वीचा बाह्य थर प्लेट्स नावाच्या मोठ्याफिरत्या तुकड्यांनी बनलेला आहे. पृथ्वीवरील जमीन आणि पाणी या घन दगडाने बनलेल्या प्लेट्सवर आहे  आणि त्याखाली वितळलेल्या खडकांचा कमकुवत थर आहे.

हे वरील सर्व आपण शालेय अभ्यासात शिकलेलो आहोत. तेव्हा वाटायचे हे किती बोर आणि अवघड आहे. (ह्याला अपवाद भूगोलाविषय प्रेमी)
 आणि नेहमी प्रश्न पडायचा ह्याचा काय उपयोग होणारे नंतरपण ह्या लेखाच्या निमित्ताने पुन्हा उजळणी झाली.

असो आकाशी खाईक्यो ब्रिज ची निर्मिती होण्याआधी 
`आवाजी सिटी` व मेनलॅन्ड वरील कोबे राज्य ह्यांच्यातील वाहतूक व येथील जागेशी संपर्क साधता येईल अशी साधने म्हणाल तर फारशी उपलब्ध नव्हती. 
लप्रवास हाच एकमेव मार्ग. 
ह्या दोन्ही जागांमधील अंत्यत बिझी असणारा जलमार्ग आकाशी स्ट्रेट ४ किलोमीटर इतक्या मोठ्या जागेवर पसरलेला आहे. इथल्या हवामाना मुळेवाऱ्याचा वेग इत्यादी लक्षात घेता बोटीने प्रवास करणे सुद्धा बरेच धोकादायक आणि त्रासाचे होते असं म्हणतात. त्यामुळे ह्या आकाशी स्ट्रेट मध्ये एखादा पूल बांधणे अतिशय अनिवार्य झाले. परंतु मोठा अडथळा होता भूकंप आणि टायफून झोन. 

ह्या ब्रिज चे डिझाइन इतके भव्य आहे की एक अभ्यासाचा विषयच व्हावा असे इंजिनियरिंग! हा पुल बांधण्याचे काम चालू होण्याआधी येथील हवामानाचा आणि जमिनीचा व संपूर्ण आकाशी स्ट्रेटचा कित्येक वर्ष बारकाईने व सखोल अभ्यास केला गेला. जवळपास प्रत्येक अडथळ्यांचे टेस्टिंग केले गेले आणि मग बांधकाम सुरू झाले.

अमेरिकेच्या प्रसिद्ध गोल्डन गेट ब्रिज सारखी ओपन बॉक्स अशी कन्सेप्ट वापरल्याने वारा ह्यातून वाहिला तरी ब्रिज ला धोका निर्माण होत नाही. जपान्यांनी एक मोठा विंड टनेल बांधुन त्यामध्ये ह्या ब्रिज चे मॉडेल ठेऊन त्याचे प्रत्यक्ष टेस्टिंग केले.
गोल्डन गेट ब्रिज ला हे तंत्र चालले इथे सुद्धा चालेल अशा अंदाजावरती फक्त अवलंबुन  राहिले तर ते जपानी कसले? ह्या बांधलेल्या विंड टनेल मध्ये टायफून च्या वेळी निर्माण होणार्‍या वाऱ्याचा वेगासारखे वारे, अतिशय उच्च प्रतीच्या फॅन द्वारे निर्माण करून त्या वेगामुळे ब्रिज च्या रचनेत कसा फरक पडतोय हे बारकाईने तपासून डिझाइन फायनल केले गेले.

८.५ रिश्टर स्केल पर्यंतचा भूकंप व साधारण ताशी १७८ मैल वेगाचे वारे ह्या दोन्ही परिस्थितीत हा ब्रिज टिकेल इतकी ह्याची क्षमता आहे. हा ब्रिज स्टील वापरून बनवला असून त्याचे मुख्य दोन खांब भूकंपासारख्या आपत्तिच्या वेळी पृथ्वीच्या हालचाली प्रमाणे फ्लेक्सिबल हालचाल करू शकतात. ह्या ब्रिज च्या – माणूस पोचु शकत नाही अशा – अवघड जागांच्या मेन्टेनन्सच काम रोबोट द्वारे केले जाते. ब्रिजची लांबी ३९११ मीटर आहे. १९८८ साली सुरुवात करून १९९८ मध्ये ब्रिज बांधून पूर्ण झाला. बांधकाम पूर्ण करण्यास १० वर्ष लागली. ब्रिज च्या तंत्राविषयी सखोल माहिती हवी असल्यास नॅशनल जॉग्रॉफी चॅनलची डोक्यूमेन्ट्री पाहावी.

आता बाकी सगळे ठीक आहे पण भूकंपा सारख्या नैसर्गिक आपत्तिचे टेस्टिंग कसे बुवा केले असेल असा प्रश्न पडला असेल ना? वरती सांगीतले ते फ्लेक्सिबल हालचाल करणारे प्रचंड उंचीचे आणि वजनाचे दोन खांब टेस्ट करण्यासाठी त्यावरती शेकडो माणसे चढवून त्यांना एका विशिष्ट पद्धतीने हालचाल करायला सांगून ह्या खांबाची गुणवत्ता तपासली गेली.

मुळात काय झाल्याने ब्रिज कोसळू शकेल? अशा प्रत्येक बाबींचा विचार हा, काय केल्याने ब्रिज टिकेल? ह्या पेक्षा महत्त्वाचा हे सिद्ध केले. बऱ्याच गोष्टींमध्ये चांगल्या वाईट सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करणे; हे सुद्धा किती अवघड असेल ह्याचा माग लावणे कठीण आहे. हा ब्रिज बांधल्याने होणारा फायदा बघताना ह्याही पेक्षा मोठा विचार हा ब्रिज नुकसान तर करणार नाही ना असा केला गेला असेल ह्यात काही शंकाच नाही.
एवढे सगळे असताना पहिला अडथळा बसला आणि फिल्ड टेस्टिंग अनुभवण्याची संधी निसर्गाने दिली ती म्हणजे १९९५ च्या हानशिन अर्थक्वेक मध्ये!

७ रिश्टर स्केल च्या ह्या भूकंपाने अक्षरशः पूर्णपणे जन जीवन विस्कळीत होऊन बरीच मनुष्यहानी व आर्थिकहानी जपानने अनुभवली. आजूबाजूच्या जवळपास एक लाख बिल्डींग उध्वस्त झाल्या परंतु हा ब्रिज वाचला. ह्या भूकंपापूर्वी ब्रिजच्या मध्यभागाची लांबी १९९० मी. होती. भूकंपाची तीव्रता इतकी होती की खांब जवळपास १मी (३.३ फुट) मुव्ह झाले. नंतर ब्रिज १ मी स्ट्रेच करावा लागला. त्यामुळे सध्याची खरी लांबी १९९१ मी. आहे.

भूकंप मोजण्याचे प्रमाण `रिश्टर स्केल` थोडक्यात सांगायचं तर, प्रत्येक आकड्यात एक वाढवला तरी शेकींगची तीव्रता दहापट जास्त असते. म्हणजे बघा, ३ रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता गुणिले  दहा म्हणजे ४ रिश्टर स्केल! दहापट अधिक असते. साधा हलका समजला जाणारा हा ४ रिश्टर स्केलचा भूकंप सुद्धा केंद्र जवळ असेल तर चांगलंच धक्का जाणवतो. भिंतीवरच्या लावलेल्या फ्रेम हलतात, स्वयंपाकघरात रॅक वर लावलेली भांडी वाजतात इतका! ह्यावरून ८.५ म्हणजे केवढी प्रचंड क्षमता असेल कल्पना करा…

इतक्या सगळ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करत ताठ मानेने आपले सौंदर्य मिरवत उभा असलेला हा ब्रिज! त्याच्या सौंदर्याचं आणखी काय वेगळं वर्णन करावं! रात्रीच्या काळोखात चमचमणाऱ्या आपल्या मुंबईच्या नरीमन पॉईंटला जसे Queen’s Necklace असे नाव पडले आहे तसेच ह्या ब्रिजच्या मोत्यांच्या माळेसारख्या वाटणाऱ्या रचनेमुळे त्याला ‘पर्ल ब्रिज’ असे म्हणतात.

ह्या ब्रिजच्या कोबे शहराच्या बाजूला असलेल्या माईको पार्क मधून आपल्याला ब्रिजचे सौंदर्य जवळुन पाहता येते. सुर्यनारायण सुद्धा अस्ताला जाताना ह्या ब्रिजला सुंदर रंगात रंगवुन जायचं विसरत नाहीत. इथून Sunset अप्रतिम दिसतो.

जपान्यांनी एका एक्सिबिशन द्वारे ह्या ब्रिज विषयीची एकूण एक माहिती जतन केलेली आहे. ब्रिज इंजिनियरिंग व आकाशी खाईक्यो ब्रिज बद्दल बऱयाच रंजक गोष्टी आणि फोटो तिथे आहेत. ते Exhibition Center पाहण्यासारखे आहे.

हा ब्रिज सहा पदरी असून फक्त वाहनांना वाहतूक करता येते. पादचारी व हौशी लोकांना ब्रिज खाली बांधण्यात आलेल्या ‘Maiko Marine Promenade’ ऑब्जर्वेटरी द्वारे ब्रिज सफर करता येते व समुद्राचा व बाजूच्या दोन्ही बेटांचा सुरेख Panoramic view अनुभवता येतो. तशी सोय केलेली आहे.

असा हा जगातला सर्वात लांब आणि उंच सस्पेंशन ब्रिज आकाशी खाईक्यो! मनुष्याच्या बौद्धिक क्षमतेचा उत्तम नमुना, जो खंबीरपणे दोन जमिनींच्या मध्ये संपर्क साधत उभा आहे.

— प्रणाली भालचंद्र मराठे

Avatar
About प्रणाली भालचंद्र मराठे 17 Articles
मी सध्या जपान मध्ये वास्त्यव्यास असून ,येथे जपानी भाषेची भाषांतरकार म्हणून काम करत आहे. जपानी भाषेमध्ये जितके नावीन्य आहे तितकेच या देशामध्ये आणि यादेशातील रहिवाश्यांमध्ये. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या जपान देशाचे सौंदर्य अलौकिक आहे. जे मी आपणापर्यंत माझ्या लेखनाद्वारे पोहोचवू इच्छिते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..