पन्नास वर्षांपूर्वी हिंदी चित्रपट सृष्टीचे तीन उत्तुंग आणि मजबूत खांब अस्तित्वात होते. त्या तीन खांबांच्या आधारावर या मायानगरीने रसिक प्रेक्षकांवर आपलं चंदेरी मायाजाल पांघरलेलं होतं.
दिलीप कुमार, राज कपूर व देव आनंद हेच ते तीन खांब होते. दिलीप कुमार ट्रॅजेडी किंग म्हणून प्रसिद्ध होते. शोमन राज कपूरने सर्वसामान्य माणसाच्या भूमिकेत गहिरे रंग भरले. देव आनंदची सिने कारकिर्द ही चाॅकलेट हिरोची होती.
१९४४ सालापासून चित्रपट सृष्टीत पदार्पण केलेल्या दिलीपने चोपन्न वर्षे कारकिर्द केली. १९५५ सालातील बिमल राॅय यांच्या ‘देवदास’ चित्रपटातील अप्रतिम भूमिकेबद्दल दिलीपला ‘ट्रॅजेडी किंग’ ही उपाधी रसिकांनी दिली. १९५८ सालातील ‘मधुमती’ या पुनर्जन्मावर आधारित असलेल्या संगीतमय चित्रपटाने सिने रसिकांना वेड लावले. १९६० साली प्रदर्शित झालेल्या भव्य आणि दिव्य ‘मुगल ए आझम’ने बाॅक्स आॅफिसची आधीची रेकाॅर्ड मोडीत काढली.
मी लहानपणी त्याचा ‘नया दौर’ चित्रपट विजय टाॅकीजला पाहिला होता. त्या चित्रपटाचं बरचसं आऊटडोअर शुटिंग त्याकाळी जेजुरी येथे झालेलं होतं. ओ. पी. नय्यर यांची ठेका धरायला लावणारी गाणी व सुमधुर संगीतामुळे हा चित्रपट अविस्मरणीय ठरला.
दिलीप कुमारचे आदमी, गंगा जमना, राम और श्याम, गोपी, सगीना, क्रांती, कर्मा, विधाता, सौदागर असे अनेक चित्रपट आहेत. एकूण चोपन्न वर्षांच्या कालावधीत दिलीप कुमारने साठ चित्रपटात काम केले.
१९९५ साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याआधी पद्मश्री व पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला होता. सुपरस्टार अमिताभ बच्चनने दिलीप कुमारच्या संवादफेकीचा अभ्यास करुन अफाट यश संपादन केले.
मधुबाला बरोबर दिलीपने एकूण चारच चित्रपट केले. त्यातील मुगल ए आझम हा शेवटचा. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते, मात्र कौटुंबिक विरोधामुळे ते यशस्वी झाले नाही. ती सल दिलीपच्या मनात शेवटपर्यंत राहिली.
वयाच्या ४४व्या वर्षी दिलीप कुमारने सायरा बानू हिच्याशी विवाह केला. तिने आजपर्यंत दिलीपला मोलाची साथ दिली. फक्त दोन वर्षे अजून आयुष्य मिळाले असते तर ‘सेन्चुरी’ झाली असती…
गेल्या अनेक महिन्यांपासून दिलीप कुमारच्या आजारपणाच्या बातम्या वर्तमानपत्रातून वाचत होतो. दूरदर्शनवरील बातम्यांतून पहात होतो. आज सकाळीच ‘देवदास’ची अखेर झाल्याचे कळले आणि मनातील आठवणींना शब्दरुप आले.
दिलीप, राज, देव ही चित्रपट सृष्टीतील तीन विद्यापीठं होती. दिलीप कुमारचे चित्रपट अभ्यासून संवेदनशील, दुःखी भूमिका कशा साकारायला हव्यात हे शिकता येत होतं. राज कपूरचे चित्रपट पाहून सर्वसामान्य माणसाचं आयुष्य कसं असतं हे शिकायला मिळायचं. देव आनंदचे चित्रपट हे ‘एव्हरग्रीन’ कसं जगायचं हे शिकविणारे होते.
हे तिघेही सिने रसिकांच्या गळ्यातील ताईत, जसे जन्माला आले तसेच निजधामाला गेले..आधी शोमन राज कपूर, नंतर एव्हरग्रीन देव आनंद आणि आज ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार!! आता तिघेही वरती एकमेकांना गळामिठी घालून कडकडून भेटतील.
….आणि मायानगरी, शेवटचा तिसराही खांब कोसळल्यामुळे धाय मोकलून रडत राहिल.
© सुरेश नावडकर.
मोबाईल ९७३००३४२८४
७-७-२१.
Leave a Reply