मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. दुपारी अडीच तीनची वेळ. कर्जतकडे जाणारी लोकल प्लॅटफॉर्मवर उभी होती. सुटायला वेळ होता आणि सिग्नलही लाल होता. सगळ्यात पुढच्या डब्याच्या सगळ्यात पुढच्या दरवाजात साठीच्या जवळ आलेले प्रभाकरपंत उभे होते. सिग्नल न्याहाळत.
थोड्याच वेळात एक मुलगी पाठीमागून चालत आली. वय तीस ते पस्तिसच्या आसपास. अंगात जीन आणि टी शर्ट. खांद्यावर छोटीशी बॅग. डोळ्याला फिकटसा गॉगल. चालत चालत गाडीच्या पुढे गेली. वळून गाडीचा बोर्ड बघितला. मागे वळली, आणि मोटरमनच्या केबिनमधे शिरली. सिग्नल अजूनही लालच.
काहीतरी विचार करून प्रभाकरपंत खाली उतरले. मोटरमनच्या केबिनजवळ गेले, आणि तिच्याकडे पाहू लागले. नजरेतून कौतुक ओसंडून वहात होतं.
“काय पाहताय काका?”
“तुमचं कौतुक वाटलं म्हणून पुढे यावंस वाटलं. तुम्हाला सांगायला.”
“कसलं कौतुक?”
“मुलगी असून ट्रेन चालवताय.”
“हूं.”
“तुम्हाला पाहून लेकीची आठवण झाली.”
“का?”
“ती पण डीझेल लोको पायलट आहे. नागपूरला असते. सध्या नागपूर – दिल्ली किंवा नागपूर – चेन्नई अशी तामिळनाडू एकसप्रेस चालवते. मुंबईकडे आली तर भुसावळ पर्यंतच. पुढे नाही. वर्षांवर्षांत भेट नाही. तुम्हाला पाहून ती भेटल्यासारखं वाटलं, म्हणून पुढे आलो. दोन शब्द बोललो. खूप बरं वाटलं.”
“काका, सिग्नल झालाय. बसताय का गाडीत?” पंतांकडे न पहाता तिने विचारलं.
हो म्हणून पंत वळले. त्यांनी हळूच पुसलेले डोळे तिला डोळ्यांच्या कोपर्यातूनही तिला दिसले.
गार्डाकडून आलेला दोन बेलचा सिग्नल ऐकून तिने हॉर्न वाजवला आणि गाडी सुरू केली. दोन थेंब तिच्याही डोळ्यतून ओघळले. मोटरमनच्या रुक्ष आयुष्यात, ड्यूटीवर असतांना वडिलांच्या मायेनं बोलणारं कुणीतरी तिला प्रथमच भेटलं होतं.
संजीव गोखले, पुणे.
१० एप्रिल २०२३.
Leave a Reply