त्याच्या उदयास्ताच्या वेळा तो ठरवितो. पहाटे येण्यापूर्वी आकाश हलकेच उमलवतो आणि डोळ्यांवरील झोपेचा पडदा हळुवारपणे दूर करतो. एकदा माझ्या नातीला उगवतीचे आकाश बघायचा, त्यातील रंगांचे विभ्रम बघायचा मूड आला होता. मी आणि पत्नी तिच्याजवळ तासभर उभे राहिलो आणि काळिम्याचे रूपांतर अनेक छटांच्या लालीत कसे होत जाते ते तिने अनुभवले. आता पुस्तकातील लिखाण तिच्या परिचयाचे झाले आणि चित्र रंगवितानाची पार्श्वभूमी पक्की होऊन तिच्या हातातून उमटू लागली. तो पंचांगाचे अथवा दिनदर्शिकेचे नियम पाळत नाही.
साधारण दुपारचे ४-५ वाजायला आले की रंगांचे जाळे आवरते घेतो. न बोलता आपला पसारा गुंडाळून घेत, मागे काळोख ठेवत अलिप्तपणे निघून जातो. अगदी ” कहीं दूर जब दिन ढल जायें ” वाल्या खन्नाच्या नजरेसारखा तटस्थ- हातात भूतकाळाची वही घेऊन , त्यांतील चुरगळलेल्या पाना-फुलासारखा ! तितकं जमत नाही आपल्याला- सूर्यासारखं मायाजाल आवरणं, गुलजारसारखं जीवघेणं लिहिणं आणि मुकेशच्या असोशी भरल्या आवाजा सारखं ! मी फारतर “मावळत्या दिनकरा ” म्हणत अर्घ्य देऊ शकतो. त्याला त्याची तमा नसली तरीही !
आज विद्या सिन्हाची स्मृती डोकावली – रजनीगंधा, छोटीसी बात वाली ! पण तात्काळ कवाडे बंद करत मी अलिप्त /तटस्थपणा चेहेऱ्यावर विणला. थोडासा विलगलो पण आठवणींचे पार पिच्छा सोडत नाहीत.नेमाने उगविले-मावळले त्याच्यासारखे तर कदाचित जमेल. प्रयत्न करून बघावे म्हणतोय.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply