माझी लेखणी काही बोलते
मनातलं पानांवर उतरवते
शब्दांतून जाणिवा देते
पण मी मात्र कधी बोलत नाही…
माझी चित्र काही बोलतात
हवी ती रंग छटा रेखाटतात
चित्रातून भावना पोहचवतात
पण मी मात्र कधी त्यात रंगत नाही….
माझे फोटो काही सांगतात
हळुवार फुलांचे रंग वेचतात
नजरेपल्याडचे दृश्य टिपतात
पण मी मात्र त्यात कधी दिसत नाही
माझी कला काही साकारते
अपूर्णातून संपूर्णाचा ध्यास देते
आकारातून उत्कट व्यक्त होते
पण मी मात्र त्यात कधी उतरत नाही…
माझी मी मला अशीच रमवते
नित्य निराळ्या छंदात गुंतते
खडकाळ कातळातून ओलावा शोधते
पण मौनाची भाषा कुणाला उमगत नाही
— वर्षा कदम.
Leave a Reply