मॅजेलॅन यानानं तीन दशकांपूर्वी घेतलेल्या शुक्राच्या पृष्ठभागाच्या प्रतिमांचा, तिथल्या ज्वालामुखींचा शोध घेण्याच्या दृष्टीनं आजही अभ्यास केला जात आहे. असाच अभ्यासला जात असलेला शुक्रावरचा एक प्रदेश म्हणजे, शुक्राच्या विषुववृत्ताजवळचं आल्टा रेजिओ नावानं ओळखलं जाणारं पठार. सुमारे पंधराशे किलोमीटरपर्यंत पसरलेल्या या पठारावर ऑझा मॉन्स आणि माट मॉन्स असे दोन निद्रिस्त ज्वालामुखी वसले आहेत. अल्टा रेजिओचा परिसर एके काळी भूशास्त्रीयदृष्ट्या सक्रिय होता. मात्र या पठारावर अलीकडच्या काळातली, सक्रियतेची कोणतीच चिन्हं संशोधकांना सापडत नव्हती. रॉबर्ट हेरिक हेदेखील तिथल्या सक्रिय प्रदेशांचा शोध घेण्याच्या उद्देशानं आल्टा रेजिओ या पठारी प्रदेशाच्या, मॅजेलॅन यानानं घेतलेल्या प्रतिमांचं निरीक्षण करीत होते. माट मॉन्स ज्वालामुखीजवळच्या प्रदेशाचं निरीक्षण करताना, ज्यातून शिलारस बाहेर पडू शकेल अशा एका विवरसदृश रचनेकडे त्यांचं लक्ष गेलं.
मॅजेलॅन यानानं या विवराच्या, फेब्रुवारी १९९१ आणि ऑक्टोबर १९९१ या दोन महिन्यांत प्रतिमा घेतल्या होत्या. आश्चर्य म्हणजे या विवराच्या रचनेत, आठ महिन्यांच्या या काळात लक्षणीय फरक पडल्याचं, या प्रतिमांवरून रॉबर्ट हेरिक यांना दिसून आलं. फेब्रुवारी महिन्यातील प्रतिमेनुसार, जवळपास गोलाकार असणाऱ्या या विवराच्या मुखाचा व्यास सुमारे दीड किलोमीटर होता, तर मुखाचं क्षेत्रफळ सुमारे दोन चौरस किलोमीटर इतकं होतं. त्यानंतर आठ महिन्यांनी म्हणजे ऑक्टोबर महिन्यात घेतल्या गेलेल्या प्रतिमेत मात्र या विवराचा आकार लांबट आणि वेडावाकडा झालेला दिसत होता. त्याच्या मुखाचं क्षेत्रफळही वाढून दुप्पट झालं होतं. तसंच त्याच्या कडांची उंची तर कमी झाली होतीच, पण त्याचबरोबर त्याच्या आतल्या कडांचा उतारही कमी झाला होता. ही लक्षणं, विवराच्या कडा खचल्याची आणि त्याचबरोबर त्या विवरात शिलारस जमा झाल्याची निदर्शक होती. याशिवाय या विवराभोवती पसरलेल्या शिलारसानं आजूबाजूचा सुमारे सत्तर चौरस किलोमीटरचा परिसर व्यापला होता. ज्वालामुखीच्या उद्रेकाचा हा प्रकार काहीसा २०१८ साली हवाई बेटांवर झालेल्या किलायवे ज्वालामुखीच्या उद्रेकासारखाच होता. या उद्रेकात या ज्वालामुखीतून उत्सर्जित झालेला शिलारस सुमारे पस्तीस चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरला. सुमारे पाच चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचं मुख असणाऱ्या या विवराच्या कडा खचून, विवराची उंची पाचशे मीटरनं कमी झाली.
रॉबर्ट हेरिक यांनी जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीच्या स्कॉट हेन्स्ली यांच्या सहकार्यानं या विवरावर अधिक संशोधन करायचं ठरवलं. या दोघांनी ज्वालामुखीच्या विवराचं एक संगणकीय प्रारूप तयार केलं. या प्रारूपाद्वारे त्यांनी वेगवेगळ्या उंचीची, वेगवेगळ्या खोलीची, वेगवेगळ्या उताराची, विवरं तयार केली. त्यानंतर त्या प्रत्येक विवराच्या उंचीत, खोलीत, उतारात, टप्प्याटप्प्यानं बदल घडवून आणले. प्रत्येक विवर हे विविध बदलांनंतर वेगवेगळ्या कोनातून कसं दिसेल, हे जाणून घेतलं. त्यानंतर या संगणकीय विवरांची तुलना त्यांनी मॅजेलॅनवरील रडारनं टिपलेल्या माट मॉन्सजवळच्या विवराच्या प्रतिमांशी केली. या विवराचं, पहिल्या प्रतिमेतून दुसऱ्या प्रतिमेत दिसल्यानुसार रूपांतर होणं, शक्य असल्याचं या संगणकीय प्रारूपानं दाखवून दिलं. यावरून फेब्रुवारी ते ऑक्टोबर (१९९१) या आठ महिन्यांच्या दरम्यान केव्हा तरी झालेल्या उद्रेकात, शुक्रावरच्या या विवराचा आकार बदलल्याचं स्पष्ट झालं. असा विशिष्ट बदल घडून येण्यासाठी, या दीड किलोमीटर व्यासाच्या विवराची मुळची खोली सुमारे १७५ मीटर आणि त्याचा तळ सुमारे सव्वा किलोमीटर व्यासाचा असायला हवा.
योगायोग म्हणजे हे संशोधन जाहीर होण्याच्या अगोदरच काही दिवस, अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठातील रेबेका हान आणि पॉल बायर्न यांनी आपल्या संशोधनाद्वारे शुक्रावर अस्तित्वात असलेल्या सुमारे ८५,००० ज्वालामुखींचा नकाशा प्रसिद्ध केला आहे. हा नकाशासुद्धा मॅजेलॅन यानावरील रडारद्वारे घेतलेल्या प्रतिमांवरून तयार केला गेला आहे. आता तर रॉबर्ट हेरिक आणि स्कॉट हेन्स्ली यांचं संशोधन, शुक्र हा भूशास्त्रीयदृष्ट्या ‘जिवंत’ असल्याचं दर्शवतं. सन २०३०मध्ये नासाचं व्हेरिटास हे यान शुक्राला भेट देणार आहे. (स्कॉट हेन्स्ली हे स्वतः या मोहिमेचे प्रकल्प प्रमुख आहेत.) व्हेरिटास यानाकडून शुक्राचा पृष्ठभाग रडार आणि वर्णपटशास्त्राद्वारे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन तपशीलवार अभ्यासला जाणारा आहे. त्यामुळे व्हेरिटास मोहिमेतील सर्वच संशोधक या आताच्या संशोधनाकडे बारीक लक्ष ठेवून आहेत. आता प्रसिद्ध होत असलेलं हे सर्व संशोधन व्हेरिटास मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
(छायाचित्र सौजन्य :NASA/JPL-Caltech/Peter Rubin / Rebecca Hahn/Washington University)
Leave a Reply