नवीन लेखन...

अल्झेमर्सचा आजार आणि आयुर्वेद

Alzheimer's and Ayurveda

२१ सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झेमर्स दिन म्हणून ओळखला जातो. साजरा केला जातो असे म्हणणे चुकीचे ठरेल कारण आनंद देणारे क्षण किंवा विषय साजरे केले जातात. अल्झेमर्स मध्ये खूप यातना दडल्या आहेत. अल्झेमर्स डिसीज म्हणजे काय, तो कोणी शोधून काढला, त्याची लक्षणे काय असतात, काय काळजी घ्यावी लागते, होऊ नये म्हणून काही उपाय करणे शक्य आहे का, आधुनिक वैद्यक शास्त्र ह्या विषयी काय सांगते अल्झेमर्स दिसीज बद्द्ल आयुर्वेदाचा दृष्टिकोन काय आहे ह्या विषयी जाणून घेऊ या.

अलोइस अल्झेमर नावाच्या एका जर्मन डॉक्टरने १९०६ साली ह्या आजाराचा शोध लावला. त्यामुळे ह्याला अल्झेमर्स डिसीज नाव देण्यात आले. मेंदूतील पेशींची विचित्र गुंतागुंत आणि चमत्कारिक गुठळ्या अशा अवस्थेत एका मृत स्त्रीचा मेंदू त्याने अभ्यासला. स्मरणशक्तीच्या विचित्र लक्षणांमुळे तिचा मृत्यु झाला होता. त्या लक्षणांचा संबंध तिच्या मेंदूच्या रचनेशी असल्याचा तर्क करणारा हा जगातील पहिला शास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचे तर अल्झेमर्स डिसीज म्हणजे विसरभोळेपणा वाढत जातो. पहिले पहिले नाव विसरणे नंतर नाती विसरणे, जेवण खाणे विसरणे, आपली स्वतःची लक्षणांच्या वेळी घरातल्या इतरांना हा अगदी थट्टा मस्करीचा विषय होतो. रोगाचे गांभीर्य कळू लागले की डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागते. वास्तविक तेव्हा फार उशीर झालेला असतो. कारण अल्झेमर्सची सुरुवात मेंदूमध्ये झाल्यानंतर जवळपास दहा वर्ष उलटल्यावर मगच सुरुवातीची लक्षणे दिसू लागतात असा शास्त्रज्ञांचा अभ्यास आहे. ६५ वर्षे वया नंतर शेकडा २० टक्के लोकांमध्ये अल्झेमर्स होण्याची शक्यता असते असा निष्कर्ष अभ्यासातून काढला गेला आहे.

अल्झेमर्सची कारणे काय ?

आज ह्या रोगाची वैद्यक शास्त्राला ओळख होऊन १०३ वर्षे झाली आहेत. पण ह्याचे कारण फक्त ३ शब्दांत सांगता येते

‘‘नक्की माहित नाही’’
अनेक संस्था, डॉक्टर्स, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आपल्या ज्ञान कौशल्याची शिकस्त करुनही आज ह्या आजारावर नक्की इलाज सापडलेला नाही ही बाब खरी आहे. मुळात कारणच माहित नाही तर उपचार करणार तरी कुठल्या आधारावर? ह्या आजाराचे निदान करण्यासाठी फक्त लक्षणांचाच आधार घ्यावा लागतो. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित यंत्रसामुग्री पण विशेष उपयोगी पडत नाही. मृत्यू नंतर शवविच्छेदन करण्याची वेळ आली तरच त्याचा उलगडा होतो.

अल्झेमर्स होऊ नये म्हणून :

अल्झेमर्स होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी ह्या विषयी बरेच काही वाचायला मिळते. त्यात ‘‘नियमित व्यायाम करावा, सकस – हलका व आपल्याला पचेल असाच आहार घ्यावा, ताजी फळे – पालेभाज्या खाव्यात, आनंदी व उत्साही वातावरण ठेवावे असे काही उपाय सांगितले जातात. हे उपाय सर्वसाधारण प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी पण सांगितले जातात, अल्झेमर्स होऊ नये म्हणून विशेष असे ह्यात काहीही नाही. नाही म्हणायला डोनपझिल आणि रिव्हास्टिगमिन नावाची दोन औषधे आहेत. शौचाला पातळ होणे, सतत लघवी होणे, मळमळणे, उलटी, निद्रनाश, चित्रविचित्र स्वप्न, चक्कर, वजन घटणे, हाता-पायात गोळे, सांधेदुखी, डोकदुखी अशी अनेक लक्षणे होतात. शिवाय इतर औषधांच्या उपयुक्ततेवर विपरित परिणाम होतात. हे उपचार रोग बरा करण्यासाठी नसून फक्त तात्पुरता आराम देण्यासाठी आहेत एवढे लक्षात ठेवले पाहिजे. थोडक्यात म्हणजे अल्झेमर्स डिसीज वर हमखास उपयोग होईल असा काही इलाज आज तागायत आधुनिक वैद्यक शास्त्रात नाही. पण शास्त्रज्ञानी ह्या विषयावर जो कही अभ्यास केला आहे त्यावर आधारित काही आयुर्वेदिक तत्वांचा आणि उपचारांचाही एक वेगळी दिशा दाखवणारा एक प्रामणिक प्रयत्न आपण करू शकतो.

मेंदूचा विचार :

मेंदूची रचना किंवा घडण करण्यामध्ये ७० टक्के वाटा स्निग्ध पदार्थांचा आहे आणि ३० टक्के वाटा प्रथिनांचा आहे. म्हणजेच मेंदू हा मुख्यतः लायपोफिलिक भाग आहे. आयुर्वेदाच्या सांगण्यानुसार चार स्निग्ध पदार्थ असतात ते म्हणजे ‘‘घृत-तैल-वसा-मज्जा’’ अर्थात – तूप, तेल, चरबी आणि मज्जा म्हणजेच मेंदू किंवा हाडांमधली चरबी त्यातल्या रासायनिक घटकांबद्दल सूक्ष्म विश्लेषण नसलं तरी त्यांच्या गुणधर्मांबद्दल सखोल माहिती उपलब्ध आहे. ह्या मेंदूच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी आयुर्वेदात जे उपाय सांगितले आहेत त्यांचा अभ्यास वेगळ्या प्रकारे केला पाहिजे. तुपाबद्दल आयुर्वेदात केलेलं वर्णन असं आहे –

‘‘शस्तं धी स्मृति मेधाग्नि, बलायुः शुक्र च क्षुषाम,’’…

म्हणजेच गायीचं तूप हे मेंदूच्या तीन क्रिया, ‘ज्ञान ग्रहण करणं, ते योग्य प्रकारे साठवून ठेवणं आणि वेळेवर स्मरण होणं ह्यासाठी श्रेष्ठ आहे. आधुनिक शास्त्रज्ञांच्या अनेक संशोधनांचा अभ्यास केल्यावर ह्या श्लोकाचा खरा अर्थ कळतो. स्निग्ध पदार्थांचा उपयोग गर्भावस्थेपासून मेंदूच्या पोषणासाठी कसा होतो ह्या विषयी एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. इटलीच्या सेराफिना सल्वाति ह्या शास्त्रज्ञाने मेंदूच्या मायलिन नावाच्या महत्वाच्या आवरणाचा मुख्य घटक स्निग्ध पदार्थ असून त्याचा मेंदूच्या घडण्यामध्ये किती मोलाचा वाटा आहे ह्यावर प्रबंध प्रसिद्ध केला आहे.

नाकातून औषध देणं

‘‘नासा हि शिरसोद्वारं…’’ म्हणजे नाक हा मेंदूचा दरवाजा आहे असं छोटसं वचन आयुर्वेदात सांगितलं आहे. ह्या विषयी ‘विहाई यांग’ नावाच्या शास्त्रज्ञांनी एक प्रबंध लिहिला आहे. फ्युचर न्युरोलॉजी नामक अमेरिकन जर्नल मध्ये (२००८,३ (१) १-४) ह्या विषयी विस्ताराने वर्णन आहे. ब्लड-ब्रेन-बॅरियर मुळे मेंदूच्या अनेक विकारांसाठी उपयोगी ठरणारा मार्ग म्हणजे नाकातून औषध देणे. नाकाच्या आतल्या श्लेष्मल त्वेचेतून स्निग्ध पदार्थ जलद गतीने मेंदूकडे पोचवले जातात. तोंडावाटे घेतलेली औषधं ब्लड-ब्रेन-बॅरियर मुळे मेंदूच्या विकारात कुचकामी होतात किंवा फारच अल्पांशाने उपयोगी पडतात. त्यासाठी नाकातून औषध देणे हा सहज, सोपा आणि परिणाम करणारा मार्ग आहे. विहाई यांग यांच्या प्रबंधाचा हा सारांश आहे.

आयुर्वेदात एक – दोन ओळींच्या श्लोकांत जी माहिती दिली असते ती म्हणजे एखाद्या क्लिष्ट गणिताचं सोपं उत्तर जगात असंख्य शास्त्रज्ञ वर्षानुवर्ष अभ्यास करून जे निष्कर्ष काढतात ते उत्तर आयुर्वेदात एक-दोन ओळींच्या श्लोकात दिलेलं असतं.

अल्झेमर्स मधे आयुर्वेद :

अल्झेमर्स डिसीज मधे मेंदूच्या पेशी क्रमाक्रमाने सुकण्याची क्रिया घडते. मेंदूच्या पेशींची रचना भरपूर स्निग्ध पदार्थांच्या उपस्थितीतून झालेली असते. त्यासाठी आयुर्वेदात वर्णन केल्याप्रमाणे ‘‘घृत नस्य’’ म्हणजे गायीचं तूप ४-६ थेंब नियमितपणे घालण्यामुळे अल्झेमर्स होण्याची शक्यता टाळता येऊ शकेल. इंद्रियांच्या पोषणासाठी तूप नक्कीच उपयोगी होऊ शकेल असा विश्वास आपण बाळगण्यास हरकत नाही. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेव, कानात तेल घालून ऐक, तैलबुद्धी हे वाक्यप्रचार प्रचारात आले त्यामागे काहीतरी शास्त्रीय अभ्यास नक्कीच असणार. नाकातून प्रविष्ट केलेलं एक विशिष्ट फ्लूरोसंट औषध NXX-066 हे मेंदूतल्या CSF (सेरिब्रो स्पायनल फ्लुइड) मधे २ मिनिटांच्या आत शोषलं जातं असा अभ्यास स्वीडन मधील शास्त्रज्ञांनी करून त्याविषयी माहिती प्रसिद्ध केली आहे. EEG म्हणजे मेंदूतील विद्युत यंत्रणेचा वेग तपासण्याची एक यंत्रणा आहे. त्यात P300 नावाची एक रेषा (Wave) ज्ञानेंद्रियांपासुन मेंदूपर्यंत संवेदना पोचवण्याची गती मोजण्यासाठी अभ्यासली जाते. स्निग्ध आहार दिल्या नंतर ही गती कशी वाढते ह्या विषयी शास्त्रीय लेख प्रसिद्ध झाले आहेत.ओमेगा ३ जातीच्या स्निग्ध आहारामुळे ही गती वाढते असं सिद्ध झालं आहे. ओमेगा ३ हे माशापासून काढलेले तेल आहे. अमेरिकेत दुधापासून लोणी काढणं त्यातून तूप तयार करणं ही गोष्ट माहिती नसल्यामुळे कादाचित त्या शास्त्रज्ञांनी ओमेगा ३ चा वापर केला असावा. भारतात साजुक तूप तयार करण्याची कला अवगत आहे त्यामुळे माशा पासून काढलेल्या तेलाची आवश्यकता नाही. आहारात स्निग्ध पदार्थांचा वापर कमी कमी होत चालला आहे हे पण अल्झेमर वाढण्याचं कारण असू शकतं. आयोवा युनिव्हर्सिटी मधे स्टॅटिन्स वर एक संशोधन प्रसिद्ध झालेले नुकतेच वाचण्यात आले. हजारो केसेस मधे अभ्यास करून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, स्टॅटिन्स (रक्तातील चरबी कमी करणारे औषध) मुळे अल्झेमर्सची शक्यता खूप प्रमाणात वाढते. कोलेस्टेरॉल हा यकृतात तयार होणारा घटक मेंदूच्या पोषणासाठी फार महत्वाचा आहे. त्याला प्रतिबंध केल्यामुळे मेंदू शुष्क होऊन त्याची कार्यक्षमता क्रमाक्रमाने कमी होत जाते.

तोंडावाटे औषध घेणं?
अल्झेमर्स विकारात तोंडावाटे औषध घेऊन कितपत फायदा होईल ही शंकाच आहे. ब्राम्ही, शंखपुष्पी, वेखंड, तुळस, केशर अशा अनेक गुणी वनस्पती उपयोगी पडू शकतील पण त्या नाकाच्या मार्गाने दिल्या तर त्यांचा परिणाम नेमक्या ठिकाणी, लवकर आणि अचूक होऊ शकेल. अशा वनस्पतींनी सिद्ध केलेलं गायीचं तूप ४-६ थेंब रोज नाकात सोडावं. वयाची पन्नाशी उलटली की ही एक सवयच लावून घ्यायला हवी. ‘‘काही फायदा झाला नाही तरी अपाय तर नक्कीच होणार नाही’’ आयुर्वेदावर नितांत श्रद्धा असणार्यांना ह्या वाक्याचा खूप राग येतो. पण अल्झेमर विकाराच्या यातना बघितल्या की, खरेच हे वाक्य आवर्जून म्हणावसं वाटते. कारण रोगाची सुरूवात मेंदूच्या पेशींमधे सुरू झाल्यानंतर १० ते १५ वर्षांनी अल्झेमरची लक्षणं दिसायला सुरूवात होते. तेव्हा उपचार करण्याची वेळ केव्हाच टळून गेलेली असते.

डॉ. संतोष जळूकर

फोन:

घर – ०२२-२४२१२५७५

ऑफिस – ०२२-२५७८८३४९

मोबाईल – ९९६९१०६४०४

ईमेल – santoshjalukar@rediffmail.com

 

Avatar
About डॉ. संतोष जळूकर 34 Articles
डॉ. संतोष जळूकर हे आयुर्वेदिक डॉक्टर असून ते आयुर्वेदिक औषधनिर्मितीच्या व्यवसायात आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..