नवीन लेखन...

अमर आभाळा एवढा – अमर शेख नावाचे वादळ

(अमर शेख नावाचे वादळ)- २० ऑक्टोबर १९१६— २९ ऑगस्ट १९६९

‘सुटलाय वादळी वारा’ आणि ‘माझी मैना गावाला राहिली’ या दोन शाहिरी गीतांनी भारावेला कामगार चळवळीचा तो काळ, जीवनातील दु:खे, जीवलगांची ताटातूट आणि पिळवणूकीतील मानहानी या सर्वांना झंजावाताचे रुप देण्याचे कार्य अमर, आणि अण्णा या कामगार  दलित शाहिरांनी केले.

अमरच्या पायांना श्रमिक शोषित्यांचा आंदोलनांची भिंगरी लागली होती. मोजकी पण तेजस्वी आणि अर्थाने परिपक्व अशी गीत रचना अमरकडून आविष्कृत झाली त्याच्या काव्याची प्रमुख विशेषता म्हणजे प्रचंड ताकदीच्या प्रतिमा आणि सामाजिक रुपके. अनेकविध गुंतागुंतीच्या सामाजिक – मानसिक प्रकियांचे अर्थ त्यात दडलेले होते. या सर्व जननिष्ठ निर्मिती मागे शोधक अशा काही प्रेरणा आहेत आणि एकांतातून लोकांतात नेण्याची उर्मी आहे. अमरशेखच्या जयंतीचा निमित्ताने त्यांच्या साहित्य प्ररणांची चर्चा करणे गरजेचे आहे. कारण ही चर्चा एका अस्त झालेल्या युगाकडे जाण्याची वाट दाखवू शकेल.

सन १९१६ मध्ये जन्मलेल्या अमरची पहिली प्रेरणा म्हणजे त्याची माता मुनेरबी! शेतमजूरीने श्रांत झालेली हातात विळा आणि पाठीवर कोवळं पोर घेवून बाहेर पडणाऱ्या माता मुनेरबीला एक गूढ प्रश्न पडत असे.

‘जिण असे जिण! कुत्र्याच्याही वाटेला नसाव’’तेच माणसाच्या वाटयाला का गं याव ?”

हीच सत्यशोधक प्रेरणा अमरला जन्मभर दिशा दाखवीत राहिली. कृष्णा जशी कोयनेला मिळावी तशीच ही प्रेरणा दुसऱ्या प्रेरणेला मिळाली. कामगार जीवनाच्या अनुभवांतून व संघर्षातून ही प्रेरणा जन्मली 1933 ते 1939 या कालखंडात मानसिक भावनिक, वैचारिक व ऐतिहासिक धागेदोरे कापड उद्योगातील वस्त्रासारखे घट्ट विणले गेले. वर्ग संघर्षाला अस्त्राचे रुप देणारा तो धोटा बनला एक प्रतिक आणि प्रतिमा ! सुदर्शन चक्रासारखे त्याचे स्वरुप. 1939 साली अमरने गिरणगावात पहिल्या युध्दाविरोधी संप ठोकला. या ऐतिहासिक संपाच्या हाकेमागे आव्हान देणारा असा हा धोटा।

‘सुटला छोटा ………..छोटा बॉबिन, रहाट खांदयाला खांदा हाताला हात.’’  …… छाती असेल तर या”। सुटला धोटा।I

‘धोटा’ या प्रतिमेने श्रमिकांच्या क्षोभाचा व संघटीत शक्तीचा आविष्कार घडविला. कडवट अनुभव, उपेक्षा व कणखर संघटन या सर्वांची प्रचिती त्याने दिली. अशा अनेक प्रतिमांद्वारे साकार झालेल्या कवितांचा, गीतांचा दुसरा प्रकार म्हणजे अमरने योजलेली रुपके । इंग्रज गेल्यानंतरही भांडवलशाहीचा भूलभुलैया अविरतपणे कार्यप्रवण होता. कामगार समुहांपुढे ही प्रकिया मांडण्याचे कसब अशा रुपकांत आहे. श्रम विक्री, मोबदला, शोषण, भांडवल संचय  व उपभोग व पुन:श्च कार्यशक्तीची विक्री ही चक्राकार प्रकिया भ्रमनिर्मितीची जननी आहे. तिच्या गतिमुळे व अविरत पणामुळे धृडवत झालेल्या भांडवली संचय प्रकीयेचा रहस्यभेद कसा करणार?

हा कावा कसा ओळखणार? “

परिभ्रमणाचे फुटुनीभोपळे। मला कळले इंगित सगळे।
दांडीला कडब्याची पेंड बांधुनिया ठेवली.
म्हणूनी धावत धोडे तिच्याच मागे चकरा घेते,
धावत आधी, कण नच पडला त्यांच्या तोंडी,
स्वातंत्र्याची गती तीच ती…………उठलो पुनरपि झुंजाया।

भांडवली स्वातंत्र्य या कल्पनेच्या उगमाचा रहस्यभेद चक्राकार फिरणाऱ्या उत्पादन प्रकीयेत आहे. याचा हा उत्तम नमुना, कमॉडिटी फेटिशीझम म्हणजे पूजा व फसंगत यांचा रहस्यभेद करण्यासाठीच कार्ल मार्क्सला दि कॅपिटल लिहावे लागले आणि जी ‘डब्ल्यू एफ हेगल’ या जर्मन तत्ववेत्त्याच्या ‘फिनॉमिनालॉजी ऑफ माईंड’ व ‘लॉजिक’ ग्रंथाचा आधार घ्यावा लागला. ही जादुई किमया उध्वस्त करण्यासाठी अशा अनेक रुपकांचा आधार अमरने घेतला. शोध, वेध व रहस्यभेद हाच होता अमरचा जीवनमंत्र.

संयुक्त् महाराष्ट्र चळवळीचा रोख हा भांडवलशाहीवरच होता. नफेखोरी व काळाबाजार या बेमुर्वतखोर व किळसवाण्या वृत्तिबद्दल घृणा व तिरस्कार हा अमरने रुपकाद्वारे असा व्यक्त् केला?

‘गावचा गटार मासा आला,
काळाबाजार त्याने चिकार केला
काढुनी वाळूवर फेका त्याला’

 त्यांना बहिष्कृत करण्याचे सामाजिक – राजकीय आव्हान या रुपकाद्वारे केले. दलित चळवळ अभेद रहावी हे अमर शेख व अण्णाभाऊ साठे यांचे एकच ब्रीद होते.

‘जग बदल घालुनी घाव सांगुनी गेले भिमराव’’

अति अवमानित पांरपारिक दास्यात अडकून पडलेल्या प्रंचड लोकसंख्येच्या या ऐरावताला धर्मांध व धनवंत अश्या दोन्ही शक्तींशी लढाई करावयाची होती. 1942 पासून अमर, अण्णा यांची जीवापाड आमरण दोस्ती झाली. अण्णाभाऊ साठे ही अमर शेखची तिसरी प्रेरणा बनली.

‘माझी मेना गावाला राहिली’——’ ही महाराष्ट्राची लावणी अण्णांची की अमरची, असा संभ्रम व्हावा इतक्या वेळा ती अमरने गायली.

भांडवली शोषण ही गरीबांची रोगराई व यातना यांची जननी आहे. भांडवली शोषणातून रोगराई थयमान घालते व तारुण्यातील मरणांची परंपरा निर्माण करते हे सांगणारी त्यांची कविता.

“क्षयाने मेली बेबिची बहीण,…………….. बेबीपण मेली क्षयानेच”

कुटुंबामागोमाग कुंटुंबाची राखरांगोळी करुन टाकणाऱ्या रोगांच्या थैमानाला भांडवली व्यवस्था कारणीभूत आहे अशी अमरची खात्री होती म्हणूनच

“आज इमारत जुनाट झाली, जीव अकारण मरती खाली,

म्हणुनी आधि – या पाडूनी टाका

मारा हाका जमवी लोका लोकशाहीचा साधुनी मोका.

विनाशकारी शक्तीअवर मात करणारी संघशक्तील अमरने अशी आविष्कारीत केली. हिरोशीमावर अणुबाँब टाकणऱ्या सत्ताधिशांनासुध्दा अमरने असेच ललकारले होते. जुने जाऊ दया मरणा लागुनी म्हणणाऱ्या केशवसुतांचा नवा अवतार, आकांतातून लोकांतात नेणाऱ्या नव्या प्रेरणा घेवून आला होता.

‘कोण जिंकु शकणार आम्हाला, कुठला अॅटेम कुठला बाँब!

कुसुमाग्रजाच्या अमरने गायलेल्या ओळी सुध्दा अशाच अमर झाल्या.

‘सरणावरती आज आमुची प्रेते’’ , उठतिल त्या ज्वालेतुनी भावी क्रांतीचे नेते.

जग बदलण्यासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या अमरच्या ‘सुटलाय वादळी वारा—’’ या तीन शब्दामध्येच एका प्रतिमेमध्ये कामगार चळवळीतील काहूर उफाळणारे अंतरग आणि रोश चित्रीत केले आहे. श्रमिक दलितांच्या शोधक शक्तींना चालना देणारे हे वादळी व्यक्तिमत्व 1969 साली झालेल्या अपघातात काळाच्या पडद्या आड गेले.

1966 सालीच अमरवर धर्मांद माथेफीरुने हल्ला केला. लांडया म्हणून अवहेलना केली. देश भक्तीअचा संशय घेतला. 1969 साली काळ्या नभांनी आसमंत व्यापून टाकले. आचार्य अत्रे, अण्णाभाऊ साठे आणि अमर शेख अस्तंगत झाले.

अशा या वादळी अमरचे अंतकरण तुकारामाचे होते. माता मुनेरबीने पोटच्या बाळासाठी परमेश्वराकडे एक दान मागीतले होते.

उगवला नारायण, माझ्या अंशी परकाटला, पोटाच्या बाळासाठी वटा (ओटी) पसरविला त्याला. नारायण बाळ सर्वांचे बरं कर । या रांगडया शब्दांमध्ये होता एक संदेश आणि परमेश्वराकडे घातलेली गळ।

जे जे जगी जगते तया माझे म्हणा परमेश्वरा हाच तो संदेश आणि आराधना। सर्वात्मकतेचा संदेश देण्यासाठी अमरचा देह झिजला सर्वांचे बरं कर, हा माता मुनेरबीचा आत्माअविष्कार अमरने फुलवला आणि नव्या युगात तुकारामाची परंपरा चालविणारा ‘अमर आभाळा एवढा झाला.’’

 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..