२४ फेब्रुवारी अमर चित्रकथाकार अंकल पै यांचा स्मृतीदिन. यांचा जन्म दि. १७ सप्टेंबर १९२९ रोजी झाला.
पहिल्या भारतीय कॉमिक चित्रमालिकेचे निर्माते ही अंकल पै म्हणजेच अनंत पै यांची प्रमुख ओळख. ही कॉमिक चित्र मालिका अमर चित्र कथा या नावाने जगप्रसिद्ध आहे. वयाच्या बाराव्या वर्षी ते मुंबईत आले, तसा त्यांचा जन्म कर्नाटकातील करकाला गावचा. वयाच्या दुसऱ्या वर्षीच त्यांचे आई वडिल वारले. त्यानंतर त्यांनी मुंबईचा रस्ता धरला.
मुंबईत आल्यावर त्यांनी माहिमच्या ओरिएन्ट स्कूलमध्ये प्रवेश घेतला. पुढे त्यांनी बीएस्सी करताना रसायनशास्त्र, फिजिक्स आणि केमिकल टेक्नॉलॉजीचा अभ्यास केला. आपल्यातल्या चित्रकाराची हौस भागवण्यासाठी त्यांनी १९५४ मध्ये मानव या नावाने एक मुलांसाठीचं चित्र मासिक सुरू केलं. ते टाईम्स ऑफ इंडिया वृत्त समूहात ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह या पदावर काम करत होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली टाईम्स ग्रुपने इंद्रजाल या कॉमिक्स बुकची निर्मिती केली.
अमर चित्र कथा या प्रचंड लोकप्रिय आणि गाजलेल्या कॉमिक मालिकेची सुरूवात त्यांनी १९६७ मध्ये केली. त्यावेळी दूरदर्शनच्या एका लोकप्रिय क्वीज कार्यक्रमात ग्रीक पुराणांवर आधारित प्रश्न विचारले जात. मात्र भारतीय पुराणांचा या प्रश्नावलीत समावेशच केला जायचा नाही,कारण त्याविषयी कुणाला माहितीच नसायची. त्यांना या घटनेनं अस्वस्थ केलं आणि मग जन्म झाला अमर चित्र कथेचा.जी.आर. मीरचंदानी यांच्या इंडिया बुक हाऊस या प्रकाशन संस्थेच्या मदतीने त्यांनी अमर चित्र कथा सुरू केली. अमर चित्र कथेच्या इंग्रजीत आठ कोटी साठ लाख प्रती विकल्या केल्या. हा एक जागतिक विक्रम समजला जातो. १९८० मध्ये त्यांनी रंग रेखा फीचर्सच्या माध्यमातून ट्विंकल या कार्टूनची सुरूवात केली. लहान मुलांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या या ट्विंकल व अमर चित्र कथा तसेच अन्य मालिकेमुळे त्यांना अंकल पै हे संबोधन मिळालं. १९८० पासून ते अंकल पै या नावानेच ओळखले जायचे.
अंकल पै यांनी अमर चित्र कथेबरोबरच रामू आणि श्यामू, लीटल राजी आणि रेखा या कार्टून्सचीही निर्मितीही केली.
गूगलने आपल्या डूडलच्या माध्यमातून अंकल पै यांच्या स्टोरी टेलिंगला सार्थ अभिवादन केले होते.
अंकल पै यांचे २४ फेब्रुवारी २०११ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply