नवीन लेखन...

आंबेटाकळीची आमराई

आपल्या विदर्भातील ३-४ जिल्ह्यात म्हणजे संपूर्ण वर्‍हाडात साधारण १२ टाकया अन् १३ हिंगणे आहेत. गावाच्या नावाबद्दल आबा सांगत, टाकळी आणि हिंगणा या गावांची नावे कुठेही सापडतात. पण आंबेटाकळी मात्र आपल्या भागात एकच आहे. त्यामुळे आंबेटाकळी गावाचा अन् नावाचा फारच अभिमान.

गावाच्या नावात आंबे, त्याप्रमाणेच आमच्या शिवारातही चहुबाजुनं आंब्याच्या आमराई होत्या. म्हणजे ज्या ठिकाणी नुसती आंब्याचीच झाडे आहेत. त्याले आमराई म्हणतात. बहुतेक त्याकाळात आमराया जास्त असतीन म्हणून आमच्या गावाचं नावंही आंबेटाकळी पडलं असावं. हे झालं शुद्ध भाषेतलं नाव. मात्र बोली भाषेत कुणी आंबेटाकळी असा उच्चार वापरत नव्हते. आजूबाजूच्या लाखनवाडा, शिरला, बोरी अडगाव, पळशी, कंचनपूर, गवंढाळा, आसा दुधा, बोथाकाजी, पिंपळखुटा, वाहाळा, अटाळी येथील लोकं आपल्या अडाणी भाषेत उल्लेख ‘आंबेटाकी’ असेच करायचे, अजूनही खेड्यातले बरेच लोकं बोलतांना आंबेटाकीच म्हणतात, पण साक्षरतेचं प्रमाण, दळण वळणाची साधने वाढल्याने आता ‘आंबेटाकळी’ असे म्हटल्या जाते.

काळाच्या ओघात गावाच्या नावातही सुधारणा झाली आहे. एवढं तरी आमच्या गावानं कमावलं. आंबेटाकळी लोकसंख्या १३००.. असा एक लहानसा बोर्ड खामगाव ते मेहकर मार्गावर गावाच्या पश्चिमेस आणि फाट्यापासून शिरल्याच्या दिशेने आसा रस्त्यावर पूर्वी लटकत होता. गाव कोणत्या दिशेने आहे, हे कळत नव्हते. एवढे झाड नि झुडपं होती. रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना गावाबद्दल नव्हे तर फाटाच माहिती असायचा. आता रस्त्यावरील स्वागत कमान, पेट्रोल पंपामुळे गाव कुठे आहे. केवढे आहे, याचा इतरांना अंदाज घेता येतो.

खामगाव तालुक्यात असलेले हे छोटसं गाव तोरणा नदीच्या काठावर वसलेलं आहे. तोरणवाडा येथून उगम पावते. म्हणून तोरणा हे नदीचे नाव पडले असावे. नदी जास्त लांबीची नाही. पश्चिमेकड़ील लाखनवाडा, दुधा, आसा गावाजवळून आलेली नदी कंचनपूर, वाहाळा आणि शहापुरात मन नदीला मिळते. म्हणजे आमच्या नदीची लांबी ३९ किमी पेक्षा जास्त नसेल. पण पूर आले की, कंचनपूरसारखं गाव वाहून नेते. तोरणा नदीचं वैशिष्टे फारच वेगळे आहे. नदीत रेती म्हणून नाहीच, नुसतेच ‘टोयगोटे’ म्हणजे मोठमोठे दगडं आहेत. या दगडांचा फायदा असा की, गावातली बहुतांश जुनी घरे या दगडांनीच बांधलेली आहेत. मंदिराजवळ पश्चिमेला गावाच्या संरक्षणासाठी संत नारायण महाराजांनी दगडांचीच भिंत बांधून ठेवलेली आहे. पुराचे पाणी या भिंतीमुळे गावात अजून शिरले नाही आणि याच्यापेक्षाही या दगडांचा मोठा फायदा म्हणजे ‘डरने का नाम नही’ या गावातले लोकं निडर आहेत. त्यांना कधीच कशाची भीती वाटत नाही. त्याचं कारण हे नदीतले ‘दगडधोंडे’ भांडणात वापरल्या जातात. कुऱ्हाड, विळा, लाठी-काठी वापरण्याचे कामच नाही. पायाखाली दगड हजरच असतो. फक्त खाली वाकायची देरी आहे. हा गमतीचा भाग असला तरी तिकडचे पूर्णा काठचे लोक आमच्या नदीच्या पात्रातून चालू शकत नाही. असा अनुभव आहे.  तोरणा नदी सूर्यातय वाहते. म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे. त्यामुळे गावातले लोकं पश्चिम दिशेला ‘वरतं’ आणि पूर्व दिशेला ‘खालतं’ म्हणतात. अन उत्तर-दक्षिणेला ‘डोंगरतय’ संबोधतात. गावाच्या दक्षिण दिशेला अजिंठा डोंगराची रांग असल्याने ‘डोंगरमुखे’ ही म्हणतात. यंदा वावर कसं पेरलं. तर सूर्यातय किंवा मग डोंगरमुखे अशी सांगायची भाषा आहे.

गावाच्या खालतल्ली जमीन चांगली काळीशार, सुपीक आहे. याच शिवारात आमराया जास्त होत्या. त्यातल्या मोजक्याच आता उरल्या आहेत. चांदण्याची आमराई, महालेची आमराई अन् आप्पाची आमराई, बाकी आंब्याचे झाडं उरले नाही की खोड नाही. वानराच्या त्रासानं बऱ्याच शेतकऱ्यांनी आंब्याची मोठमोठी झाडे तोडली, कापली, विकली. काही लोक दरवर्षी आंब्याच्या झाडाचा छाट काढतात. फांद्या तोडून इंधनाच्या गंज्या, रांगा लावतात. पण ज्यांनी बुडापासून कापून लाकडे बेपाऱ्यांना विकली, त्यांनी एकदाच बक्कळ पैसा कमवला, अन गावरानं आंब्याची चव गमावून बसले, अशातले आम्ही आहो.  रेडिओवरून तेव्हा एक गाणं ऐकायला यायचं, ‘‘आरं ये, ये अमराईत शिरू, जरा बसून गंमत करू.’’ त्याची आठवण आता झाली. त्यावेळी आमच्या शिवच्या वावरात आमराई होती. बोरी शिवारात आणि एकदम गावाच्या सिमेवर असलेल्या या वावरात आमच्या गावातला मजूर यायला तयार नसे, जाण्या येण्यासाठी धड रस्ता नाही, गाडरस्ता आहे तर गवंढाळा फाट्यावरील चौफुलीपासून म्हणजे फेराच फेरा, मग घरच्यांनाच टोले घ्यावे लागत. वावरात रिकामं जाऊन येणं म्हणजे पुरी तल्लफच होई. या वावरात आंब्याचे चांगले सात-आठ झाडं होते. त्यातले एक शेताच्या मध्यभागी काळीच्या माथ्यावर, एक अलिकडच्या धुºयाजवळ आणि पाच झाडं एकाजुटीनं दोन एकराच्या खालच्या डुंग्यात होते. ‘डुंगं’ म्हणजे चांगल्या शेतापासून हलक्या दर्जाचा दोन एकराचा वेगळा केलेला तुकडा, त्यातले हे पाच झाडं पाच रंगाचे, त्यांच्या फळांची चवही एकदम वेगवेगळी, आणि त्या झाडांची नावेही वेगवेगळी ठेवलेली. गाडग्या, गोंगली, शेंदऱ्या या, गोलटी, मिठ्या अशी होती. या आमराईतल्या झाडांचं एक वैशिष्ट्ये म्हणजे दरवर्षी फक्त यातील एकच झाडाला चांगला बार येत होता. गुढीपाडव्याच्या वेळेस मोहोर सर्वांनाचा लागायचा, पण तो काही कारणामुळे गळून जायचा. जे झाड चांगले येई, त्यावर मिठूपासून माकडांचा हमला सुरू   असायचा. अन् ढोरावाले, चारावाले हेही दगड गोटे मारुन दणके घेत. आंबट कैर्‍या यांची चव सगळ्यांनाच चाखावीशी वाटे, गावापासून वावर दूर, रखवालीले कोणी नाही, मंग काय चोराईचेच राज्य, या सगळ्यांच्या तावडीतून जे सापडले, आपल्या हाती आले ते फळं आपले. त्यातही पाडाचे आंबे खाण्यासाठी वावरात काम करणारे मजूर तडफड करायचे. झकोला देऊन घोयात, वटीत दोन-चार आंबे घरी घेऊनच जायाचे. आंब्याचा फुलोर संपला, मोहोर गळला की, कैऱ्या खाण्यासाठी आम्ही झाडावर चढायचो. झाडाच्या पायथ्याशी एक पाय ठेवून दुसरा एका कोनाड्यासारख्या कोपऱ्यात ठेवायचो. खाली उभा असलेला एक जण ढुंगणाला टेका देत वर फांदीवर चढवून द्यायचा. या डांगीहून त्या डांगीवर, खोडाले धरून कैऱ्या तोडायच्या. आंबट कच्च्या कैऱ्या चड्डीच्या अन मनिल्याच्या खिशात ठेवायच्या. नंतर व्हायचा डाबडुबलीचा खेळ सुरू. अंबादास, साहेबराव, नंद्या, सुरशा, गणेश, इशा (विश्वनाथ) एका फांदीवरुन जसे माकड उड्या मारतात तशा उड्या मारत उन्हाच्या टाईमाले डाबडुबलीचा खेळ खेळत होतो. काही खेळ जमिनीवर खेळल्या जातात. काही हवेत खेळल्या जातात, काही मोबाइलमध्ये काही व्हीडीओ गेममध्ये खेळल्या जातात. पण आमचा हा खेळ वावरात आणि झाडावर चालत असे. कैऱ्या जशा मोठ्या होऊ लागल्या तशा भाकरीसंग खायाची मजा येई. त्यात कमाल म्हणजे त्या कैऱ्या मस्तपैकी कापायच्या. त्याच्या फोडी, फाका करायच्या, धुवून घेतल्या की, त्यावर मीठ टाकायचे आणि कागदात गुंडाळून एकमेकांना खायला द्यायच्या. हा कागद बाहेरून ओला झालेला दिसत असल्याने त्याच्यात गरमी जिलेबी तर नसावी, असे वाटे. यामुळे त्या कैर्‍यातील आंबटपण जाऊन त्यात गोडवा यायचा. कोणी भाकरीसंग खात असे तर कोणी निस्त्या. या कैर्‍याचा दुसरा उपयोग म्हणजे रायती घालण्यासाठी, लोणच तयार करण्यासाठी होत होता. यावर्षीचं लोणंच पुढच्या वर्षापर्यंत आमच्या घरी असायचे. पण आत्याच्या गावाकडे अशा आमराई नव्हत्या.एक आत्या शेगावच्या इकडून चिंचोली येथे तर दुसरी तिकडून कवठा बहादुºयात. एकही गाव रोडवर नाही. फाट्यावर उतरा, टोले घेत पायदल जावा. मग आबाची घाई चालायची, कैऱ्या नेण्यासाठी मोजमाप, सुरू व्हायचे. आमच्या गावात तेव्हा फाळानं आंबे मोजल्या जात. एका फळात ६ आंबे असायचे. मंग एक-दोन फाळ एका आत्याच्या घरी, एकदोन फाळ दुसऱ्या आत्याच्या घरी नेण्यासाठी पोतड्या बांधायच्या, त्या पोतड्यात दगड आहेत की कैऱ्या हे आपल्याले डोक्यावरच्या ओझ्यावरुनच समजत होते. आणि आमच्या गावचा स्टॉपही जवळ नाही. नदीतून चालाले डोक्यावर ओझं घेऊन, इकडून तिकडून एस.टी.त चढवलेले आंबे घेत आबासोबत चिंचोलीला उतरायचे. उरलेले आंबे घेऊन कवठ्याला जायाचे. तर त्यासाठी लोहारा येथे उतरून २ मैल पायदळ जायचे. असा हा आंब्याच्या कैरीचा अन् नंतर पिकलेल्या आंब्याचा प्रवास सुरू राहायचा. झाडाच्या कैºया पिकायला लागल्या की, पाडाचा आंबा(शाक) खाण्यासाठी धडपड सुरू व्हायची. आंबा पाडी आला म्हणजे उतरण्याची घाई, ते खुळी, पोते, बकेटा दोन-तीन गडी माणसं, सारा ताफा वावरात असे.पुढे पुढे आंबा राखणीसाठी आम्ही बटाईने देत होतो. मंग अर्धे तुम्ही आणि अर्ध्यात आम्ही अशी गत होत होती. काही नसलं तरी चालीनं, पण आंब्याचा रस अन् आंब्यांच्या रसासाठी लेकीबाईचे माहेरी जाणे येणे सुरू असायचे. आमच्या घरात उन्हायात निरा आंब्याचा सुगंध दरवळत असे.शिंदीच्या डाल्यात, जमिनीवर पोते अंथरून गवतात आंब्याची जवणी घालत, जवणी म्हणजे आंबे पिकू घालणे. आता जवणीची जागा कारपेटने घेतली आहे. आम्हाले आंबे पिकेपर्यंत सबुरी, धीर नसायचा, एक-एक उचलून अख्खं डालकं रिकामं करायचो. आत्याचे-मामाचे मुलं-मुली यायचे. घरासमोर नुसता आठोया म्हणजे कोया-गुठल्या अन् आंब्याचे सालटं पडलेले असायचे. आणि पावसाळ्यात त्या उकिरड्यावर आंब्याचे छोटे झाड उगवायचे. पण आता फळ येणारे झाडंही तोडून टाकले. अन ते वावरंही बुढ्यानं इकून टाकलं. या शिवच्या वावरातले आंबेही गेले, अन आबाही.

— जनार्दन गव्हाळे,
औरंगाबाद

Avatar
About जनार्दन गव्हाळे 9 Articles
दैनिक दिव्य मराठी औरंगाबाद येथे उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी देशोन्नती अकोला, लोकमत अकोला, दैनिक दिव्य मराठी अकोला येथे काम केलेले आहे. तसेच समतेचे आद्य प्रवर्तक गुरू रविदास हे पुस्तक पद्मश्री प्रकाशन सावदा जि. जळगाव ने प्रकाशित केलेले आहे. स्वतंत्र असा विषय लिहिण्यासाठी नसून चालू घडामोडीवर भाष्य करणे आवडते.

2 Comments on आंबेटाकळीची आमराई

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..