नवीन लेखन...

अमेरिका – ३० डॉलरच्या कटींगची कथा

अमेरिकेत सुनेबरोबर नातीचे (दियाचे) केस कापायला (पक्षी: trim करयला) एका केश कर्तनालयात गेलो. स्पेशली लहान मुलांसाठी असलेल्या AC केश कर्तनालयात प्रवेश केला आणि मन गहिवरून गेले. काय थाट होता म्हणून सांगू. दुकानाचा संपूर्ण अँम्बीयन्स एखाद्या नर्सरी स्कूल सारखा होता. जागोजागी कार्टून्स लावलेली. Q असेल तर मन रिझवण्यासाठी खेळणी. मुलांची गाणी आणि कायकाय होते. दियासाठी सकाळी ११ची अपॉइंटमेंट दिली होती. घरापासून साधारण १२ किमी असलेल्या या अलिशान कर्तनालयात प्रवेश केला आणि दियाच्या नाभिकेने (इथून पुढे नाभिका शब्द तुम्ही नाभिकसुंदरी असा वाचायचा) तिने हाय दिया हाऊ आर यू? असे म्हणून सुहास्य स्वागत केले. अपॉइंटमेंट असल्याने ती आणि तिची खुर्ची रिकामीच होती. दुकानात ४ अलिशान खुर्च्या होत्या. त्यातल्या २ कलाकार नसल्याने रिकाम्या होत्या. अमेरिकेत नाभिकाची देखील appointment घ्यावी लागते. तिथे एका साधारण ४ वर्षाच्या मुलाची कटिंग सुरु होती. तो मुलगा खुर्चीवर बसून समोरच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर आवडीचे कार्टून बघत होता. त्या मुलाची आई तिच्या धाकट्या मुलाला घेऊन समोर बसली होती आणि ती सुंदरी त्याची मान हवी तशी वळवून आपला कार्यभाग पूर्ण करत होती. मला आपल्याकडची मुले डोळ्यासमोर दिसली. एका मुलासाठी आपल्याकडे साधारण २ माणसे एक डोकं धरायला आणि एक पाय धरायला लागतात. इथे तो मुलगा शांतपणे तिला कटिंग करून देत होता. इथल्या आया कोणते गर्भसंस्कार करतात कुणास ठावूक. मुलगा अगदी सुतासारखी सरळ कटिंग करून देत होता. हु नाही की चू नाही. दियाला तरुणीने खुर्चीत बसवले. त्या खुर्चीचे डिझाईन चाईल्ड फ्रेंडली आणि अनेक सेफ्टी standardsने घडवलेली होती. दिया अशी बसली की तिला हालचाल करता येणार नाही पण कम्फर्ट मिळेल. इथेच ५०% काम झाले असावे. मग नाभिकेने समोरच्या कॉम्प्युटरवर दियाच्या वयाच्या योग्यतेचे व्हील्स ऑफ द बस गो राउंड अँड राउंड लावले. मग काय विचारता घरी जेवताना आणि अंघोळ करताना दांडगाई करणारी आमची नात इतकी शांत बघून मला गहिवरून आले. दियाच्या अंगावर चित्रविचित्र प्राण्यांची चित्र असलेला एप्रन चढवला आणि कात्री चालवायला सुरवात केली. माने मागील केस trim करताना हातात एक खेळणे दिले तिचे लक्ष समोरच्या कॉम्पुटरवरून खाली खेळण्याकडे गेले. नाभिकेने मागील केस सफाईने दियाचे लक्ष विचलित होण्या आधी trim केले. हे करताना कसा कट मारला की ती बॉईश दिसणार नाही. तिचा फेमिनाईन लूक अजून खुलेल. याची चर्चा माझ्या सुनेशी चालू होती. तिचे केस फार सुंदर आहेत अशी मधून मधून कमेंट चालू होती. हे सगळे घडले साधारण ५-६ मिनटात. दियाने स्वत:चे रुपडे आरश्यात पाहिले खुदकन एक स्वत:लाच स्माईल दिले (मुलींना जात्याच कुठे हसावे हे कळते) आणि ती सुंदरी बिलिंग counter कडे वळली. मात्र २९.९९ US डॉलर (भारतीय रु २४००/ फक्त) बिल झाले. ममताने ते क्रेडीट कार्ड वर दिले. सुंदरीने दियाला छोटा स्टार दियाला दिला. तो तिने आपल्या हातावर चिकटवला. मला कौतुकाने दाखवला आणि आम्ही परतीसाठी गाडीत बसलो.
अमेरिकेत कटिंग महाग असल्याने येण्याआधी “तिथे कटिंग महाग असते. इथूनच करून घ्या” असा सल्ला वजा आदेश इकडून दिला गेला होता. मी त्यामुळे भारतात तब्बल रु १५० ( $ २) जरुरी नसताना खर्च करून कटिंग करून घेतली होती. आदले दिवशी सकाळी ७ वाजता न्हाव्याला झोपेतून उठवून मी कटिंग करायला लावली होती. त्याला गप्पात जागे ठेऊन मी मला त्याच्याकडून मला इजा होणार नाही याची काळजी घेत होतो. पैसे देताना साहेब मी रु १०० दिल्यावर उरलेले परत द्यायची वाट बघत होतो तर तोच म्हणाला साहेब कोविडनंतर कटिंगचे दीडशे झालेत तुम्हीच पन्नास द्या. काय महागाई झालीय असे पुटपुटत मी बाहेर पडलो. तसे म्हणायला माझ्या डोक्यावर आता फारसे काही उरले नाही त्यामुळे मला देखील कटिंगला ५-६ मिनिटावर लागत नाही. ५ मिनिटात न्हावी २ डॉलर कमावतो. त्यांच्या एकंदर उत्पन्नाचा अंदाज मी बांधू लागलो. च्यायला आपल्यापेक्षा जास्त कमावत असणार म्हणून जेलसी वाटून घेतली. काही का असेना तो आपल्याला साहेब म्हणतो आणि कटिंगनंतर डोक्याला थोडे मॉलीश फुकट करतो ना! तेव्हडाच अर्धा डॉलर वसूल.
तुम्हाला सांगतो. अमेरिकन नाभिका माझ्या २ वर्षांच्या नातीला Esteemed Client म्हणून जी रॉयल treatment देत होती ती पाहून मला माझा बापुमामा आणि भोरचा लक्ष्मण न्हावी आठवला. माझा हा मामा तसा इतरवेळी प्रेमळ पण डोक्यावरचे केस इंचाच्या वर वाढले की त्याला काय व्हायचे कुणास ठावूक. भोरला एकत्र जमलो की लक्ष्मण न्हाव्याला घरी बोलावून सगळ्यांची यथेच्छ हजामत करून घेणे हा आवडता उद्योग. केस हातात धरता आले नाही पाहिजे हे त्याचे केसांच्या उंचीचे स्टँडर्ड परिमाण. कटिंग झाली की तो केस ओढून बघणार जर हातात येऊन ओढले गेले तर लक्षाला झापणार आणि मला परत त्याच्या समोर बसवणार. या लक्ष्मणला एक तर लोक बोलावणे धाडत. कोणाचेही आमंत्रण नसे तेव्हा तो “ए दाढी कटिंग” असे ओरडत आळीतून सकाळी जात असे. एका गोणपाटात त्याची आयुधे (म्हणजे ए वस्तरा, एक मोडका आरसा, एक रबराची वा कातड्याची धार लावायची पट्टी, ब्रश, साबण आणि ट्रीमर). काही रेग्युलर घरे ठराविक वारी त्याच्याकडून हजामत आणि दाढी करून घेत. त्याची जागा परसात असे अथवा घराच्या कोपऱ्यात. कुणाची मुंज वा १०वा असेल लक्ष्मणचा रुबाब असे. त्याला नेहमीपेक्षा जास्त मोबदला यजमान देत. लक्ष्मणचा धंदा सकाळी साडेआठ वाजेपर्यंत चाले. कारण एकदा अंघोळ केली न्हाव्याकडे जायचे नाही. हा शिरस्ता. एकदा तो आला की घरातली पुरुष मंडळी आणि मुले एकपाठी एक त्याच्या समोर बसून आपले डोके भादरून घेत. त्यात फारशी कलाकुसर करायची नसेच. केस कापल्यावर मुलगा जेव्हडा बावळट दिसेल तितका संस्कारी. केस कमीतकमी कापले म्हणजे त्याला जो काही आणा दोन आणे द्यायचे ते वसूल झाले ही धारणा. सगळ्यांच्या दाढ्या कटिंगा झाल्या की आजीने ‘लक्ष्मण चहा घे रे.’ असे म्हणत दिलेला चहा ही त्याची वर कमाई. सगळ्यांच्या हजामती झाल्या की लक्षा त्याचे सगळे आवरून जागा स्वच्छ करून बाहेर पडे. इकडे हजामत झाली की बापूमामा भाच्यांना अंघोळ घालायचा. त्याशिवाय घरात प्रवेश नाही.
पुढे वडगावला चित्ते आडनावाच्या न्हाव्याने त्याच्या ६x६ फुट जागेत न्हाव्याची स्पेशल घडवलेली खुर्ची पुढे मागे बिलोरी आरसा, कपाटांच्या एका दारावर डोकावून पाहणारी आशा पारेख आणि दुसऱ्या दारावर आपल्याकडे नटखट बघणारी मुमताज, हेमामालिनी, जितेंद्र, राजेश खन्ना, धर्मेंद्र असे सगळे घेऊन दुकान थाटले. त्याला नाव दिले अमुकतमुक केश कर्तनालय. ते अमुकतमुक आता आठवत नाही पण फॅशनेबल नक्की होते. चित्ते स्वत: मोठा छानछोकीत राहायचा. त्याचा स्वत:च्या केसांचा देवानंद स्टाईल कोंबडा असे. त्याच्याकडे कटिंग थोडी महाग पडे. पण मला घरून हट्ट केल्याने परवानगी मिळाली होती. तो तुम्हाला (customized) पाहिजे तसा कट मारून देई. कटिंग झाल्यावर उरलेल्या केसांचा भांग पाडता आला पाहिजे असे चित्तेला सांगितले की पुढचे तो व्यवस्थित करे. कटिंग झाल्यावर तो स्वत: भांग पाडून बरोबर झाले ना? असे आपल्याकडून वदवून घेई. पुढे घरी अंघोळ केल्यावर काय होई माहित नाही. त्याचा सारखा भांग जमत नसे. मग पुढचे काही दिवस हिरोगिरी करता येणार नाही याचे वाईट वाटे. चित्ते स्वत: अंगावर अत्तर लावत असल्याने त्या छोट्या दुकानात तो दरवळे. त्यामुळे बरे वाटे. चित्तेकडे गावातली सगळी टगे मंडळी दाढी कटिंग करयला येत. या रेग्युलर मंडळींची उधारी त्याच्याकडे असे. दुकानातल्या आवडत्या अभिनेत्याच्या फोटोप्रमाणे केसांची स्टाईलने केस कापून घेत. वडगाव रेल्वे लाईन वर असल्याने लोकलमधल्या पोरींवर लाईन मारायला हेअरस्टाईल करणे आवश्यक असे.
तर मंडळी अशी ही ३० डॉलरच्या कटींगची कथा. भांडवलशाही अमेरीकेतली नाभिका भांडवलदार बनून ग्राहकाचे शोषण करत होती का आपल्या कष्टाला आणि कौशल्याला योग्य असे मोल घेत होती? हे तुम्ही स्वत:ला डावे म्हणवून घेता की उजवे यावर ठरवा. भारतातला लक्ष्मण स्वत:च्या कष्टाची किंमत ठरवू शकत नव्हता. कारण आपण केलेल्या कटिंगवर समोरच्याचे व्यक्तिमत्व खुलवू शकतो याची त्याला जाणीव नव्हती. त्याला केस भादारणे माहित होते. व्यक्तिमत्व खुलवणे कळत नव्हते. इथे त्या नाभिकेने माझ्या २ वर्षाच्या नातीला देखील व्यक्तिमत्व दिले. ती अधिक फेमिनाईन दिसेल याचा भरवसा माझ्या सुनेला दिला. त्याची किंमत. आता भारत बदलतोय. भारतातला लक्ष्मण बदलतोय. त्याच्या जाणीवा बदलतायत. आता केशकर्तनालये उरली नाहीत तर त्यांची जागा पार्लरने घेतली. समता कोणी देऊन येत नसते. ती आपल्या व्यावसायिक कौशल्यातून मिळवावी लागते हे ज्याला कळले तो समतेच्या प्रवाहात सहज मिसळतो.
-श्रीकांत कुलकर्णी
९८५००३५०३७

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..