नवीन लेखन...

अमेरिकन गाठुडं – ९

ऑस्टिन! सकाळी साडेआठची वेळ! पारा पाच अशांवर! आभाळ म्हणजे, राखेडी रंगाचं विशाल घुमट. सूर्याचे अस्तित्व म्हणजे, त्या घुमटातून पाझरलेला, वस्त्रगाळ प्रकाश. पडून गेलेल्या पावसाचे अवशेष परिसरात आणि आसमंतात बिलगून राहिलेले. वातावरणात एक गूढ आणि गोड अशी (‘ती’च्या आठवणींची) कातरता! अधून मधून, गार रेशमी झुळका आसपास लहरून जात होत्या.

असल्या भन्नाट माहोलमध्ये, अस्मादिक मॉर्निंग वॉकला निघाले होते! अंगात अंडरवेयर बनियन. त्यावर थर्मल वेयरचा फुलभाह्याचा शर्ट आणि पॅन्ट! (ते अंगाला इतके घट्ट बसले होते कि, जणू माझ्या अंगावर कोणीतरी कपडे पेंट केलेत अस वाटत होत!) त्यावर रेगुलर जीन पॅन्ट आणि फुल शर्ट हुडीवाला, त्याच्यावर मुलाचं ज्याकिट! डोक्याला सांताक्लाज सारखी, लालभडक गोंड्याची टोपी! त्या कपड्यात बघून देवानंद सुद्धा, माझ्याकडे बघून थोडा जेलस झाला असता! मी सॉक्स आणि बूट घालून बाहेर पडणार, तोच बायकोने बॅगेतले कपडे, घरभर उचकटून मफलर माझ्याकडे फेकली!

देवाशप्पथ, बायकोला मी मफलर घातल्या शिवाय, पुरेसा बावळट दिसत नाही, याची का खात्री वाटते माहित नाही!(मला मफलर नाही आवडत, मी मफलर गळ्यात अडकवली कि, सिनेमातल्या दारुड्या सारखा दिसतो!) आता इतक्या बंदोबस्तात ती मफलरची काही गरज होती का? पण नाही. ‘असू द्या! बाहेर गारवा आहे! कानाला गुंडाळा!’ मी ती मफलर घरा बाहेर गेल्यावर, दाराला बाहेरून अडकून टाकली! अन गारव्यात निघून गेलो!

बाहेर फक्त ‘चिट -पखर’च होती. माणसं नव्हती! स्वप्नातल्या सारखं वाटत होत. थंडीमुळे दोन्ही हात लेदर जॅकीटाच्या खिशात घातली. मोबाईल आणि इयरफोनची कॉर्ड हाताला लागली. त्याचे बोडूला कानात सारून, गाना.कॉम. ऑन केला! पाण्यात भिजवलेल्या घोंगड्या सारखा, जडशीळ आवाजातला हेमंतकुमार, त्याचा माग किशोरदा!! तुम्ही काही म्हणा, ज्या गाण्याची ऐकून -ऐकून चाळणी झाली (माझ्याच कानाची!) ती, गाणी या वातावरणात काय एकट्याने ऐकत जाणे, म्हणजे ———काय म्हणायचं ते सुचल्यावर सांगीन! काहीही म्हणा, परदेशात आपल्या माणसांच्या आवाजाला वेगळाच गोडवा जाणवतो. हा अनुभव अमेरिकेत, जेथे जेथे मराठी माणूस भेटला, तेथे तेथे आला!

मी अमेरिकेत असताना दिवाळीचा सण तेथे साजरा केला.

“दिवाळीसाठी काय, काय खरेदी करायची, याची यादी करा म्हणजे, आयत्या वेळेला घाई नको! चकल्या चिवडा आधीच करून ठेवू!” आमच्या सौ-राष्टाने फतवा काढला.

“आई, कशाला तो घाट घालतेस? त्यानं घरभर धूर होईल!! त्या पेक्षा फराळाचे विकतच आणू! बाकी काही असेल तर सांग!” आमच्या अर्ध्या दिवाळीची सांगता येथेच झाली!

“लाईटच्या चार माळा, आकाशदिवा,आणि चार पणत्या! या गोष्टी लागतील!” मी

“आणि हो वासाचे तेल, उटणं अन मोती साबण!” बायको.

“अरे, घरात तेल आणि साबण आहे! उटणं बघू मिळालं तर! आकाशदिवा आणि पणत्या पण हुड्काव्या लागतील!”

“म्हणजे?”

“या भारतीय वस्तू मॉल मध्ये नसतात! एक इंडियन स्टोअर आहे. तेथे बघू!”

रात्री त्या इंडियन स्टोअरला आम्ही गेलो. ‘मनपसंद!’ नावाचं एक टुमदार सुपरमार्केट होत! दारातून आत गेल्याबरोबर एक तीनचाकी नवीकोरी सजवलेली सायकल रिक्षा ठेवली होती. एकदम भारताचा फील आला! तोवर मुलगा बायको ट्रॉली घेऊन आत घुसले होते. मी त्या रिक्ष्यापाशीं थोडा रेंगाळलो, लहानपणीची, परळीची आठवण दाटून आली.

त्या रिक्षा शेजारच्या टेबलवर गरम चहाची सोय होती. घरच्या मचूळ आणि बिगर शक्कर चहाला कंटाळलोच होतो. घेतला पेपर कप भरून! त्यांनतर जेव्हा, जेव्हा तेथे गेलो, तेव्हा, तेव्हा त्या चहाने माझे स्वागत केले! परदेशातील आपुलकीचे स्वागत!

या सुपरमार्केट्मधे सगळी भारतीय मंडळी भेटली. रामदेव बाबाची उत्पादन. शिकेकाई, गाईचंतूप, होमाच्या समिधा, आणि गौऱ्या सुद्धा! पण आम्हाला हवे असलेले आकाश कंदील,आणि उटणं, मात्र नाही मिळाले!

फराळाच्या विभागात हल्दीराम राज्य करत होते! पुण्याचे चितळे बाखरवडी अंगचोरून एका कोपऱ्यात होती. सोडली नाही हुडकून काढलीच! खाण्याच्या पदार्थात गुजराथी प्रॉडक्ट्स बरेच होते. चितळे शिवाय महाराष्टीयन कोणीच नव्हते. थोडा खट्टू झालो. फक्त चितळे येथवर आले. बाकी? महाराष्ट्र मागे का पडतोय? महाराष्ट्र्राचा झेंडा जगभर फडकावा असं मला नेहमीच वाटत.

एका रॅकवर मला आळूच्या वड्या दिसल्या. घरी आलाल्यावर, ओव्हन मध्ये गरम करून खाल्या. अप्रतिम होत्या. तसेच सामोसे! दोन्ही पदार्थाचे उत्पादक गुजराथी. आपली पुरणपोळी असायला हवी होती.

याच मार्केटच्या एका कोपऱ्यात छोटेशे स्नॅक्स आउटलेट आहे. तेथे भज्यांचे पाचसहा प्रकार, वडे चार प्रकारचे, इडली-डोसा, भारतीय चवीचे! वर फिल्टरकॉफी! आनंदाला अजून काय लागत हो!

दिवाळीच्या फराळाची घनघोर खरेदी झाली. भाज्या, फळ, चकल्या, चिवडा, तेथे असलेल्या सगळ्या व्हरायटी घेतल्या, दोन ट्रॉल्या भरल्या! अन हो पणत्या सुद्धा मिळाल्या! (मी हळूच त्यांची किंमत पहिली. इतक्या पैशात भारतात एक रांजण सहज आला असता!) तरी दिवाळीचा फील येईना! आमच्या ट्रॉल्या बिलिंगसाठी लाईनीत होत्या. मी हळूच एक जस्मिन तेलाची बाटली अन एक म्हैसूर सॅन्डल साबणाची वडी आणून ट्रॉलीत टाकली. हा, आता थोडी दिवाळी वाटली!

पोर बिलिंगच्या घाईत होती, तोवर आम्ही दोघे गप्पा छाटत उभे होतो. तेव्हड्यात एका रॅक मागून एक पोरगी समोर आली.

“मराठी आहेत?”

“हो!”

“पुणे?”

“नाय, परभनी!”

“मी ठाण्याची, आई बाबा आलेत! तुमचा आवाज आला, ओळख करून घ्यावी म्हणून!”

“अरे वा! अमेरिकेत मराठी माणसांना भेटून आनंदच होतो.” तेव्हड्यात तिचे आई बाबा मागून आम्हास जॉईन झाले. खारके सारखा सुकलेला म्हातारा, अन सुकल्या हळकुंड सारखी धम्मक गोरी म्हातारी!

“बरच वय दिसतंय!” बायकोने नको ते विचारले.

“नाही, तसे फारसे नाही, बाबा असतील एकोणांशीचे आणि आई सत्तरीत आहे!”

हे म्हातारपणच वय नाही? मला वाटून गेलं.

“आहे का अजून मुक्काम?” मी विषय बदलण्याचा प्रयत्न केला.

“प्रवास झेपला का? मुंबईपासून इथपर्यंतचा?” बायको सोडायला तयार नव्हती.

“हो! आलेत! आणि चार महिन्यानी न्यूझीलंडला जाणार आहेत! तेथे रहातील सहा महिने! बहीण असते माझी तेथे!”

“छान! वाटलं भेटून!” मी काढता पाय घेतला.

“बघतलंस या वयात एकमेकांच्या सोबतीनं जग फिरत आहेत!”

” तुम्हीच बघा! असं पाहिजे! टाम टूम फिरायलेत! नाही तर तुम्ही? थोडं काही झालं कि, ऍडमिट अन प्लास्टी!” थोडं दूर आल्यावर बायको म्हणाली. हि अशीच आहे. मला थोडस बोललं कि, हिला व्हिट्यामिनची गोळी घेतल्या सारखी वाटते. आणि हिची तबियत टाम-टूम रहाते.

आपली भारतातली दिवाळी, घरभरून आनंद देते, तो आनंद, तेथेही मावत नाही, घराबाहेर उतू जातो! तेथील दिवाळी, अंगचोरून घरात आल्या सारखी वाटली! होत सगळंच, पण उगाच उदासवाणे वाटले. मनाचे खेळ दुसरं काय?

या सुमारास, भारतातून मोठा मुलगा ऑफिसच्या कामा साठी, अमेरिकेत महिन्याभरासाठी आला होता. आम्ही ऑस्टिनला आणि तो सॅनफ्रॅन्सिस्कोला! तरी शेवटचे चारदिवस, तो ऑस्टिनला घरी आला. त्याला पाहिल्यावर, एकदम भारतात परत जाण्यासाठी मनाने उचल खाल्ली. बायको माझ्याकडे ज्या नजरेने पहात होती, त्यावरून तिला काय म्हणायचे ते मला कळले.

“तुझी फ्लाईट कधी आहे?”

“का?”

“नाही, तुझी सोबत आहे. तसेही येथे येऊन तीन महिने झालेत. आम्ही, येतो तुझ्या सोबत!”

“बाबा, अजून खूप बघायचं राहिलंय! सहा महिने रहाता येत! मार्चमध्ये जा!” लहान मुलाने आग्रह केला.

“हो, बाबा, पुन्हा पुन्हा येणं होत नाही! रहा कि? आणि असं आयत्यावेळे तिकीट कसे मिळेल? आणि तेही माझ्याच विमानात आणि माझ्याच कनेक्टिन्ग दुबईच्या विमानात!”

मी गप्प बसलो.

“अरे, बघ तरी!” बायकोने पोराला सांगितले.

दोन दिवसांनी तो चमत्कार झाला. त्याच्या फ्लाईट मध्ये दोन तिकिटे मिळाली! ती हि स्वस्तात! शेवटच्या क्षणी, असे स्वस्त तिकीट मिळू शकते म्हणे!

दोनच दिवसात परतीची सोय, आणि सोबत मिळाली. तीही मुलाची!

घरी परतण्याचा आनंद होता, आणि मुलगा, सून, त्याच्या दोन चिमण्या जुळ्या मुली, दुरावण्याची रुखरुख पण होती. आम्ही अमेरिका पाहायला गेलोच नव्हतो. गेलो होतो ते, मुलाबाळंत रमायला! खूप बघायचे राहिले. असेल हि, पण नाती बागडताना मनसोक्त बघितले. बाकी अमेरिका काय, असेल नशिबी तर पुन्हा दिसेल. पण या लेकरांचे बालपण, बोबडे बोलणे, टीव्ही वरच्या गाण्यावरील नाचणं, नाही पुन्हा बघायला मिळणार! गोड आठवणींचा खजाना मनी भरून घेतलाय!

दोन दिवसात निघायचं!!

(क्रमशः)
सु र कुलकर्णी.
Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..