अमेरिकन ग्रॅंडमास्टर रॉबर्ट जेम्स बॉबी फिशर यांचा जन्म ९ मार्च १९४३ रोजी झाला.
बॉबी फिशर ११ वा बुद्धिबळ विश्वविजेता होता. जन्माने अमेरिकन असला तरी नंतर तो आइसलॅंडचा नागरीक बनला.
आज बुद्धिबळाला जे ग्लॅमर आहे ते प्राप्त करून देण्यात बॉबी फिशरचा मोठा वाटा आहे. १९७२ साली त्याने बोरीस स्पास्कीला रिकडो इथे हरवून, बुद्धिबळातील विश्वविजेतेपद मिळवलं तेव्हा रशियन नसलेला एखादा बुद्धिबळपटू इथवर मजल मारेल ही गोष्ट अशक्य वाटत होती. कारण बुद्धिबळात कल्पनाशक्ती इतकंच शास्त्रशुद्ध अभ्यासाला महत्त्व आहे आणि याबाबतीत रशिया आणि त्यातले ग्रँडमास्टर आघाडीवर होते. शिवाय या स्पर्धेत सुरुवातीलाच तो दोन गुणांनी पीछाडीवर होता. मुळात त्याची खेळायचीच तयार नव्हती, तेव्हा लंडनमधील धनाड्य जीम स्लेटर यांनी स्पधेर्ची रक्कम वाढवून दिली. पहिला डाव हरल्यावर दुसरा डाव खेळायला तो आलाच नाही. चोवीस खेळांची मालिका तिथेच संपणार की काय असं वाटत होतं. पण अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री हेन्री किसिेजर यांनी त्याला खेळण्याची विनंती केली आणि मग तिसरा सामना दर्शक आणि कॅमेरा यांच्या अनुपस्थितीत छोट्याशा खोलीत सुरू झाला. अनेकदा फिशर उशिरा येई आणि स्वत:चा वेळ घालवून बसे. लॉरी इव्हान्स या फिशरच्या बुद्धिबळपटू मित्राने या सामन्याच्या प्रत्येक खेळीचं चित्र आणि विश्लेषण असलेलं पुस्तक लिहिलं आहे.
तो दोन वर्षांचा असताना त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. त्याचे वडील जर्मन होते. पण प्रत्यक्षात पॉल लेमेनी हा अणुबॉम्बवर काम करणारा शास्त्रज्ञ हे त्याचे वडील होते. फिशर सहा वर्षांचा असताना त्याच्या बहिणीने बुद्धिबळाचा पट आणला आणि फिशर रात्रंदिवस बुद्धिबळ खेळू लागला. वयाच्या बाराव्या वर्षी तो अमेरिकेतील मॅनहॅटन या क्लबमध्ये दाखल झाला. तिथे जॅक कॉलिन्स या शिक्षकाने त्याला शिकवलं आणि आपलं बुद्धिबळावरचं ग्रंथालय उघड केलं. पुढील दोन वर्षांत फिशरने अमेरिकेतील राष्ट्रीय स्पर्धा जिंकण्यापर्यंत मजल मारली.
१९५६ साली वयाच्या तेराव्या वर्षी त्याने न्यूयॉर्कमध्ये डोनाल्ड बाय विरुद्ध खेळताना अठराव्या खेळीत आपला वजीर दिला आणि त्यानंतर एकेचाळीस खेळांचा हा डाव जिंकला. या डावाचं वर्णन ‘चेस रिव्ह्यू’ या मासिकाने ‘गेम ऑफ द सेंच्युरी’ असं केलं. त्याकाळात फिशर अनेकदा पैशांसाठी प्रदर्शनीय सामने खेळत असे. पारितोषिकाची रक्कम जास्त असली पाहिजे याविषयी त्याचा आग्रह असे. १९५७ साली तो अमेरिकन चॅम्पियन झालाच; पण १९५७-५८च्या अमेरिकन राष्ट्रीय स्पधेर्त त्याने आठ डाव जिंकले आणि पाच अनिर्णीत राखले.
वयाच्या पंधराव्या वर्षी एकही सामना न हरता तो चॅम्पियन होता. त्यानंतर १९६६ साली ‘जगज्जेते पदा’साठीच्या स्पधेर्ची जी कँडिडेट स्पर्धा होती, त्यात तो पाचवा आला. मिखाईल ताल याने त्याला चार डावांत हरवले. पण पहिले चारही स्पर्धक रशियन होते. १९६२मध्ये स्टॉकहोममधल्या आंतरराष्ट्रीय स्पधेर्त त्याने बावीसपैकी साडेसतरा गुण मिळवले. रशियन खेळाडू त्याचा खेळ पाहून थक्क झाले. त्यानंतरच्या स्पधेर्त पेट्रो शान जिंकल्यावर बॉबी फिशरने ‘रशियन खेळाडूंनी मॅच फिक्स केली आहे’ अशा आशयाचा लेख लिहिला, तेव्हाचा जगज्जेता बॉथान विक याला बॉबी फिशर जवळजवळ हरवणार होता. पण सप्टेंबर १९६२मधल्या या ऑलिम्पियाडमध्ये फिशरचा डाव प्रथेप्रमाणे चाळीसाव्या खेळीला स्थगित झाला आणि रात्रभर विचार करून रशियनांनी बोथानविकची सुटका होईल अशी खेळी शोधून काढली.
पाल बेनको या फिशरचा रूममेट असलेल्या खेळाडूलाही ती माहिती होती. पण बॉबी फिशरने सामन्याचं विश्लेषण करायला नकार दिला. सामना ‘ड्रॉ’ झाल्यावर फिशरने म्हटलं की बोथानविक सामना चालू असताना सल्ला घेत होता.
अर्थातच जगज्जेत्यावर असले आरोप करणं मूर्खपणाचं होतं. पण फिशर हा अत्यंत लहरी आणि शॉर्ट टेंपर होता. या सामन्यानंतर त्याने बुद्धिबळ खेळणं बंद केलं. जगज्जेतेपदाची आस सोडली. पण पुन्हा तो उमेदीनं खेळू लागला.
१९६९मध्ये ‘माय सिकस्टी मेमोरेबल गेम्स’ नावाचं पुस्तकही लिहिलं, जे न वाचता चांगलं बुद्धिबळ खेळणं केवळ अशक्य आहे. ‘द लाईफ अँड गेम्स ऑफ बॉबी फिशर’ हे फ्रॅन्क ब्रॅडी याने लिहिलेलं पुस्तक ‘प्रोफाईल ऑफ अ प्रॉडिजी’ म्हणून प्रसिद्ध झालं. ज्यात त्याने फिशरच्या लहानपणात आईने त्याच्यासाठी काय केलं याची माहिती दिली आहे. त्याला बुद्धिबळपटू बनवण्यात त्याचा मोठा वाटा होता. पण त्याच समाजातलं वागणं मात्र सदैव विचित्र राहिलं. समाजाबरोबर त्याला कधीच जमवून घेता आलं नाही. सहकाऱ्यांबरोबर आणि इतर खेळाडूंबरोबर त्याची भांडणं होत. बोथानविकसारख्या जगज्जेत्याबरोबर फिशर आयुष्यात फक्त तीन शब्द बोलला. स्पास्कीबरोबर झालेल्या जगज्जेतेपदाच्या सामन्यानंतर पुन्हा फिशर त्या स्पर्धेत उतरला नाही. अनातोली कापोर्वशी त्याचा सामना होणार होता. फिशरने त्यासाठी ‘फिडे’ या संचालक संस्थेला १७९ अटी घातल्या. त्या सर्व ‘फिडे’ने मान्य केल्या तरीही अनियमित संख्येचे सामने खेळवावेत आणि दहा डावांत विजयी होणाऱ्याला जगज्जेतेपद द्यावे ही त्याची अट मान्य होऊ शकली नाही. त्यानंतर तो बुद्धिबळ क्षितिजावरून दिसेनासा झाला. ‘वर्ल्डवाईड चर्च ऑफ गॉड’ नावाच्या संस्थेचं तो काम करू लागला. आपले बरेचसे पैसे त्याने त्याला दिले. १९८१ साली तर एका बँक दरोडेखोराशी त्याचं वर्णन जुळतं म्हणून त्याला पकडलं आणि त्याने कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला नकार दिल्याने त्याच्यावरचा संशय अधिक गडद झाला. बुद्धिबळाचे जागतिक जगज्जेतेपदाचे सामने आधी ठरवल्याप्रमाणे होतात असे आरोपही त्याने केले.
१९८८ साली बुद्धिबळाच्या डिजीटल घड्याळाचं पेटंट त्याने घेतलं. १९९२ साली पुन्हा फिशर आणि स्पास्की यांच्यात सामना झाला. यात जिंकणाऱ्यासाठी ३३ लाख डॉलर्सची रक्कम मिळणार होती. सामना युगोस्लाव्हियात होणार होता. ‘युनायटेड नेशनने’ या देशावर निर्बंध घातले होते. तिथे खेळल्यास तुरुंगात जावे लागेल, असं अमेरिकन सरकारने धमकावले होते. फिशरने १०-५ असा हा सामना जिंकला आणि त्याच्या अटकेचं वॉरंट निघालं. तो परत कधीही कॅलिफोनिर्याला परतू शकला नाही.
१९९८मध्ये जागतिक विजेतेपदकातील त्याचे ‘मेमेंटोज’ इंटरनेटवर विकायला काढण्यात आले. त्यावर चिडून फिशरने अमेरिकन सरकारविरुद्ध भाषणं केली. २००० साली त्याने एका फिलीपाईन महिलेशी लग्नं केलं. ११ सप्टेंबर रोजी अमेरिकेवर झालेल्या हल्ल्याची त्याने प्रशंसा केल्यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. २००४मध्ये त्याला ‘टोकियो’ विमानतळावर पासपोर्ट संपल्यानंतर पकडण्यात आले, तेव्हा त्याने आपण वडिलांमुळे जर्मन नागरिक आहोत आणि आईसलँडचे नागरिकत्व घेतले आहे असे सांगितले.
फिशरचे खेळणे नेहमी आक्रमक असे. त्याने कधीही प्रतिर्स्पध्याने ऑफर केलेला ‘ड्रॉ’ स्वीकारला नाही. तो शेवटपर्यंत झुंजत राही. त्याने भाग घेतलेल्या सगळ्या टुर्नामेंटस मोठ्या फरकाने जिंकल्या. त्याच्याबद्दल कॅस्पोरोव्हने म्हटलं आहे की, ‘फिशर आणि त्याचे समकालीन यांच्यातील फरक वेगवेगळ्या बुद्धिबळ जगज्जेत्यांमधील फरकांपेक्षा मोठा होता.’ अलीकडे प्रसिद्ध झालेल्या अँड्र्यू सॉलिस्टच्या ‘बॉबी फिशर रिडिस्कव्हर्ड’मध्ये त्याने म्हटलं आहे ‘फिशर मोठ्या प्रमाणावर बळी देणारे डाव (सॅक्रीफिशल गेम) खेळला. यातील बरेच डाव वयाच्या एकविसाव्या वर्षाअगोदर खेळण्यात आले.
सोंगट्यांच्या मारामारीतील किमतीचं त्याला खूप आंतरिक भान होतं. डावातील छोटाशा फरकाचंदेखील तो विजयात रूपांतर करीत असे.
जगज्जेता झाल्यावर त्याने पारितोषिकाची १/३ रक्कम ‘वर्ल्डवाईड चर्च ऑफ गॉड’ला दिली आणि बोरीस स्पास्कीला एक कॅमेरा भेट दिला. त्याच्या माणूसपणाच्या अशा खुणा दुर्मिळ होत्या; पण बुबिळाच्या दुनियेतला तो एक अद्वितीय माणूस होता. त्याने खेळाला कलेच्या दर्जावर नेऊन ठेवले.
बॉबी फिशरचा १७ जानेवारी २००८ रोजी निधन झाले.
— शशिकांत सावंत.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply