नवीन लेखन...

अमेरिकेकडून शिकण्यासारखं काही

अमेरिकेचं औद्योगिक साम्राज्य, अमेरिकेचं विज्ञानातील प्राबल्य आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील अमेरिकेचं वर्चस्व यावर आजवर अनेकांनी लिहिलं आहे.अमेरिकेच्या दैनंदिन जीवनातून शिकण्यासारखं काय आहे यावर मला थोडसं सांगावंसं वाटतं. अलिकडेच अमेरिकेत महिनाभर राहण्याचा योग जुळून आला.अमेरिकेची ही माझी दुसरी वारी. पहिल्या भेटीत मी तिथे आठवडाभरच राहिलो होतो व फक्त एक दोन ठीकाणीच फिरलो होतो. दुसऱ्या फेरीत मात्र महिनाभर राहण्याचा योग जुळून आला व अनेक ठिकाणी फिरण्याची संधीही मिळाली. या दुसऱ्या भेटीत अमेरिकेतल्या सामान्य माणसाचं दैनंदिन जीवन आणि तिथले रोजचे व्यवहार याची थोडी अधिक ओळख झाली. या ओळखीमुळेच अमेरिकेकडून आपल्याला शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत हे प्रकर्षाने जाणवलं. अगदी साध्या साध्या गोष्टीचं अनुकरण करण्याचं ठरवलं तरी आपल्या राहणीमानात कसा बदल घडू शकेल हे मी आता नमूद करणार आहे.

अमेरिकेत विमानतळावरुन बाहेर पडलो तेव्हा मनाला सर्वप्रथम भावली तिथली आश्चर्यकारक शांतता. खुद्द विमानतळावरलं वातावरण आपल्यासारखंच होतं. प्रवाशांची लगबग, डयूटी फ्री स्टॉलमधली आणि रेस्टॉरन्टसमधली गडबड आणि लाऊडस्पिकर्सवरुन बरसणारा सूचनांचा ओघ या गोष्टी थोडयाफार फरकाने आपल्या विमानतळांची आठवण करुन देणाऱ्याच होत्या. विमानतळाबाहेर पाऊल टाकल्याबरोबर मात्र आपण एका वेगळ्याच विश्वात प्रवेश करीत असल्याची जाणीव झाली. विमानतळाबाहेर अनेक वाहनं जातयेत होती, बसेस धावत होत्या, प्रवासी गाड्यात चढत होते. सर्व काही जसंच्या तसंच होतं, नव्हता फक्त कसलाही आवाज! रस्त्यावरील एकही वाहनचालक हॉर्न वाजवीत नव्हता आणि दुसऱ्या कुणाला पुढे अथवा मागे जाण्यासाठी दटावणी करीत नव्हता. एकूणएक गाडीवाले आपापल्या गाड्या शांतपणे हाकीत होते. विमानतळावर ओळखीचीच गडबड, धांदल असताना कसलाही आवाज मात्र नसतो हे आश्चर्य मी लगेचच टिपलं. पुढे अमेरिकेतल्या महिनाभराच्या वास्तव्यात हे आश्चर्य सर्वच ठिकाणी मला अनुभवता आलं. त्या पार्श्वभूमीवर आपल्या देशात सर्वांनाच हे सहज करता येणं शक्य आहे याचीही खात्री पटली. आवाज, गडबड, गोंधळ यांना रामराम करत शांततेचं मनाला उभारी देणारं वातावरण आपण सहजरित्या अनभवू शकतो. फक्त त्यासाठी गरज आहे सर्वांची मानसिकता बदलण्याची, एक नवीन पायंडा पाडण्याची.

अमेरिकेत भटकताना मनात भरल्या त्या जागोजागी आढळणाऱ्या सुंदर बागा. अमेरिकेतील जवळ जवळ प्रत्येक इमारत हिरव्यागार गालिच्याने, सुंदर फुलांच्या सजावटीने नटलेली असते. मी बारकाईनं लक्ष दिलं तेव्हा बहुतेक ठिकाणी साधी सदाफुलीची फुलं बागेची शान वाढवत असतात हेही माझ्या ध्यानात आलं. साध्या गवताचे गालिचे आणि विविधरंगी सदाफुलीचे ताटवे साऱ्या परिसराला सौंदर्याचे परिमाण देऊन जातात. हे आपल्याला सुद्धा करता येण्यासारखं नाही का? दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारतींच्या प्रवेशद्वाराजवळ सदाफुलीच्या दोन कुंडया ठेवणं सहजसाध्य नाही? मोकळ्या जागी सुंदर लॉन्स पसरवणं खर्चाचं आहे? इथे देखील प्रश्न येतो मानसिकता बदलण्याचा. मी माझ्या इमारतीचा परिसर सुंदर ठेवीन असा वसा रहिवाशांनी उचलला तर मुंबई सारख्या शहराचंही रुप पालटून जाईल हे कुणीही मान्य करेल.

प्रसाधनगृहांची सोय ही अमेरिकेतील आणखी एक वाखणण्याजोगी बाब. अमेरिकेत तुम्ही कोणत्याही रेस्टॉरन्ट मध्ये जा, मॉलमध्ये जा, पेट्रोल पंपावर जा, अगदी कुठेही जा तिथे रेस्टरुमची म्हणजेच प्रसाधनगृहांची उत्तम सोय उपलब्ध असते. मुख्य म्हणजे कुठलंही प्रसाधनगृह असतं अगदी स्वच्छ आणि टापटीप. याउलट आपल्याकडे कधी रस्त्यात अथवा प्रवासात ही नैसर्गिक गरज भागविण्याची पाळी आली की अक्षरशः कापरं भरतं. ऐनवेळी जायचं तरी कुठं आणि जिथं जाऊ तिथल्या स्वच्छतेची हमी कोण देणार? सार्वजनिक प्रसाधनगृहांत जाण्याऐवजी अनेकजण ‘नंतर बघू’चाच मार्ग अनुसरतात. रस्त्यावरल्या प्रत्येक हॉटेलमध्ये आणि एखाद्या इमारतीत केवळ दुकानेच असल्यास त्या इमारतीमध्ये स्वच्छ प्रसाधनगृह असलंच पाहिजे असा नियम करणं अशक्य आहे का? पण यासाठी पुढाकार कोण घेणार हा कळीचा मुद्दा ठरतो.

अमेरिकेतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शारीरिकदृष्टया अपंग असलेल्यांसाठी उपलब्ध सोयी. प्रसाधनगृहांमध्ये, पार्किंगसाठी, कुठल्याही इमारतीत प्रवेश करण्यासाठी या मंडळींना खास सुविधा पुरविल्या जातात. साहजिकच ही मंडळी कुठेही मोकळेपणाने हिंडू फिरु शकतात व दैनंदिन व्यवहार सहजरित्या उरकू शकतात. अमेरिकेत ऐन ट्रॅफिक मध्येही चालणाऱ्या मंडळींना सर्व ठिकाणी प्राधान्य दिलं जातं. रस्त्यावरुन धावणारी प्रत्येक गाडी वळणावळणावर मग तिथे सिग्नल असो वा नसो, थांबून पादचाऱ्यांना अग्रक्रम देतात व मगच आपलं वाहन पुढे हाकतात.

अमेरिकेत ट्राफिकची शिस्त पाहून आपण अक्षरश: थक्क होऊन जातो. अमेरिकेतील सर्व शहरे परस्परांना हायवेनी जोडलेली आहेत. अनेकदा इप्सित ठिकाणी जाण्यासाठीही हायवेंचाच आधार घ्यावा लागतो. या हायवेंवर जाणाऱ्या आणि येणाऱ्या बाजूने प्रत्येकी किमान तीन लेन्स उपलब्ध असतात. सर्वात डावीकडची लेन वेगाने धावणाऱ्या वाहनांसाठी, मधली लेन कमी वेगाने जाणाऱ्या वाहनांसाठी, आणि उजवीकडची लेन हायवेवरुन बाहेर पडण्यासाठी अथवा पुन्हा हायवेवर येण्यासाठी व पोलिसांची गाडी, आगीचे बंब, रुग्णवाहिका यांच्यासाठी असते. त्या लेनवरुन विनाकारण कोणतीही गाडी जात नाही. ट्रॉफिकच्या कडक शिस्तीमुळे हायवेवर मैलोनमैल आपण सरळ दिशेने जाऊ शकतो. साहजिकं इथे पाचसहा तासांचा प्रवास नॉर्मल समजला जातो. शुक्रवा संध्याकाळीच मंडळी विकएन्डसाठी आऊटिंगला बाहेर पडतात. पाठीमागे केवळ सायकलीच नव्हेतर छोटया बोटीही बांधण्याची सुविधा उपलब्ध असते! सुट्टीचे दिवस मौजमजेत घालवून पुन्हा पुढील आठवड्यातील कामांसाठी सज्ज होणं हा इथला शिरस्ता. या शिरस्त्याचं पालन करुन आयुष्याचा आनंद लुटणे म्हणजे अमेरिका असं म्हंटलं तर ते वावगं ठरु नये.

शिस्तीचं पालन हा अमेरिकेतील दैनंदिन जीवनाचा मुख्य कणा म्हणता येईल. साध्या बर्गरच्या आणि पिझांच्या दुकानातही सर्व लोक शिस्तीत उभे असतात. आपली टर्न आली की पैसे देणं, खाद्य पदार्थ घेऊन टेबलावर जाणं. तिथे खाऊन झाल्यावर स्वतः बश्या उचलणं ही संस्कृती आता आपल्याही देशात परिचयाची झाली आहे. मात्र अमेरिकेत शिस्तीचं वर्चस्व पदोपदी जाणवत राहतं आणि हे आपल्या देशात का घडत नाही असा सवाल मनात उभा राहतो. अर्थात अमेरिकेतही शिस्त मोडणारे महाभागही असतात, मात्र त्यांची संख्या अगदीच किरकोळ असते हे आपण ध्यानात ठेवायला हवं. अमेरिकेसारखी औद्योगिक प्रगती आपल्याला साधता येईल का? आतंरराष्ट्रीय राजकरणात भारत अमेरिकेसारखी महासत्ता बनणार का? हे नेतेमंडळींनी सोडवायचे प्रश्न आहेत. मात्र अमेरिकेसारखी आपल्याला आपली शहरं स्वच्छ व देखणी ठेवणं शक्य आहे का? कर्कश गोंगाटावर मात करुन शांततेचं आयुष्य जगणं शक्य आहे का? आणि सिव्हिक सेन्स ची कास धरुन रोजची दगदग टाळणं शक्य आहे का? या प्रश्नांचं उत्तर होय असंच आहे. यासाठी जनजागृती करणं ही काळाची गरज आहे असं अमेरिकेला भेट दिल्यावर प्रकर्षाने जाणवतं राहतं.

सुनील रेगे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..