कर्करोगाने ग्रासलेल्या आणि अत्यवस्थ झालेल्या माझ्या जवळच्या नातलगाची शेवटची भेट व्हावी म्हणून पत्नीसमवेत मी मध्यंतरी तातडीने अमेरिकेला गेलो. न्यूयॉर्क येथे पोहोचल्यावर आंघोळ वगैरे उरकून ‘हॉस्पिस’(हॉस्पिटल नव्हे) गाठले. ज्या रुग्णांना कुठल्याही औषधोपचारांनी बरे करणे शक्य नसते आणि रुग्णाचा अंत:काळ जवळ आलेला असतो अशांना ‘हॉस्पिस’मध्ये ठेवतात. त्या ठिकाणी कुठलाही रोग बरा करणारा औषधोपचार होत नाही, परंतु अटळ असणारा मृत्यू सर्वार्थाने शांतपणे व्हावा, वेदना न होता यावा यासाठी वेदनामुक्तीच्या उपचाराची सर्व व्यवस्था हॉस्पिसमध्ये असते. (‘हॉस्पिस’ ही संकल्पना आता भारतातही रुजू लागली आहे. भारतातील काही शहरांमध्ये ‘हॉस्पिस’ आहेत.) अमेरिकेतील ‘हॉस्पिस’मध्ये रुग्ण जास्तीत जास्त किती काळ जगण्याची शक्यता आहे, याची स्पष्ट कल्पना रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांना देण्यात येते. स्वच्छ आणि टापटीप असणाऱ्या या हॉस्पिसमध्ये भेटायला जाणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांवर वेळेचे बंधन नसते. रात्री- अपरात्री केव्हाही, कितीही नातेवाईक हॉस्पिसमध्ये जाऊन मरणासन्न रुग्णाला भेटू शकतात. रुग्णाच्या नातेवाईकांची आस्थेने विचारपूस होते. त्यांना कॉफी, केक इत्यादी पदार्थ मिळण्याची आणि विश्रांती घेण्याची स्वतंत्र व्यवस्था असते. हात र्निजतुक करण्यासाठी ठिकठिकाणी सॅनिटायझर्स ठेवलेले असतात. हॉस्पिसमधील कर्मचारी आणि नर्सेस अत्यंत अदबीने वागतात. रुग्ण मरणासन्न अवस्थेत असल्याने त्याच्या मनाने खचलेल्या नातेवाईकांची काळजी सातत्याने जाणीवपूर्वक घेतली जाते. रुग्णाच्या नातेवाईकांसाठी इंटरनेटची आणि फोनची व्यवस्था असते.
आम्ही सकाळी ११ च्या सुमारास हॉस्पिसमध्ये पोहोचलो आणि दुपारी ४.२५ वाजता माझ्या पत्नीची वहिनी निवर्तली. हॉस्पिसमधल्या सुंदर, शांत आणि आरामदायी वातावरणात हळूहळू श्वास मंद होत तिला मृत्यू आला. योग्य प्रमाणात वेदनाशामके दिल्यामुळे मृत्यू येताना तिच्या चेहऱ्यावर अथवा शरीरावर कुठलीही वेदना अथवा घुसमट जाणवली नाही. हॉस्पिसमधील डॉक्टर जवळच होते. त्यांनी व्यवस्थित तपासले आणि ‘सॉरी’ म्हणून मृत्यू झाल्याचे जाहीर केले.
मृत्यू एक-दोन दिवसांत येईल, याची पूर्वकल्पना दिलेली असल्यामुळे फ्यूनरलची व्यवस्था आधीच करून ठेवली होती. न्यूयॉर्कमधील लाँग आयलन्ड या भागात असलेल्या ‘फ्यूनरल होम’ या संस्थेस अंत्ययात्रेचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते. दु:खाचा पहिला आवेग ओसरल्यावर फ्यूनरल होमच्या व्यवस्थापकास फोन केला गेला. काही मिनिटांच्या आत सुटाबुटातील एक तरुण आणि त्याचा साहाय्यक शववाहिका घेऊन आले. त्याने डेथ सर्टिफिकेट ताब्यात घेतले. मृतदेहाचा ताबा घेतला. चेन असलेल्या कापडी बॅगेत मृतदेह काळजीपूर्वक ठेवून तो शववाहिका घेऊन गेला. जाताना त्याने हळुवारपणे सर्व नातेवाईकांचे सांत्वन केले आणि अत्यंत खुबीने पुढील कार्यक्रमाची माहिती दिली.
शास्त्रशुद्ध पद्धतीने मृतदेह स्वच्छ करण्यात आला. काही रासायनिक द्रव्ये शरीरात सोडली गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी काही जवळचे नातलग फ्यूनरल होममध्ये गेले. त्या मृत शरीरास साडी-चोळी नेसवण्यात आली. फ्यूनरल होममधील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी मृतदेहाला चक्क मेकअप केला. मखमली पेटीत पहुडलेला तो मृतदेह एखाद्या सुंदर बाहुलीसारखा दिसत होता. दुपारी २ ते ४ आणि संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत त्या मृतदेहाच्या अंत्यदर्शनाचा (viewing) चा कार्यक्रम होता. सुंदर मखमली पेटीत मृतदेह ठेवला होता. ज्या हॉलमध्ये मृतदेह ठेवला होता, तो हॉल उंची फर्निचर, गुबगुबीत गालिचे आणि चांगल्या आसन व्यवस्थेने सजवला होता. फ्यूनरल होमचे सर्व कर्मचारी सुटाबुटात होते. इमारतीच्या समोर सुमारे २०० गाडय़ा उभ्या राहतील, अशी पार्किंगची सोय होती. प्रवेशद्वारावरील दोन तरुणी अंत्यदर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाचे अदबीने स्वागत करीत होत्या. अमेरिकेतील भारतीय मंडळीसुद्धा सुटाबुटात आली होती. येताना अत्यंत शोभिवंत असे फुलांचे मोठे गुच्छे मृतदेहाशेजारी ठेवण्यासाठी आणत होते. शवपेटीच्या मागे अमेरिकेचा राष्ट्रध्वज होता. मंद आवाजात श्रीमद्भगवद्गीतेच्या १५ व्या अध्यायाची सीडी लावलेली होती. वातावरणात खिन्नता होती पण कुठल्याही प्रकारची भयाणता, भीती, दडपण जाणवत नव्हते.
तिसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता क्रिमेशन होते. स्थानिक ब्राह्मणांनी फ्यूनरल होममधील हॉलमध्ये काही धार्मिक विधी केले. मंत्रघोषात शवपेटी बंद करण्यात आली. त्या वेळी सर्व भारतीय आणि अमेरिकन मंडळींनी हात जोडून नमस्कार केला. शवपेटी एका लांब रुंद शववाहिकेत ठेवण्यात आली. शववाहिका मार्गस्थ होण्यापूर्वी शववाहिकेबरोबर असलेल्या गाडय़ांचा जो ताफा होता, त्या ताफ्यातील प्रत्येक चालकाच्या हातात क्रिमॅटॉरिअमपर्यंत जाण्याचा मार्ग आणि नकाशा दिला गेला. शववाहिका मुख्य रस्त्याला लागण्यापूर्वी विशिष्ट प्रकारचे दिवे लावून गाडय़ांचा ताफा मार्गस्थ झाला. प्रचंड ट्रॅफिक असूनही या अंत्ययात्रेतील गाडय़ांच्या ताफ्याला कुणीही ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत नव्हते. उलट सन्मानाने पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा करीत होते. क्रिमॅटॉरिअममध्ये जाण्यापूर्वी शववाहिका मृताच्या घरापाशी गेली. घराच्या दरवाजात फ्यूनरल होमच्या कर्मचाऱ्यांनी गुलाबाची फुले ठेवली. काही काळ सर्वजण स्तब्ध उभे राहिले आणि पुन्हा गाडय़ांचा ताफा मार्गस्थ झाला.
सुमारे ३५ मैलांवर असलेल्या क्रिमॅटॉरिअममध्ये सर्वजण पोहोचले. पुन्हा मंत्रपठण होऊन विद्युत दाहिनीमध्ये हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार पार पडले. फ्यूनरल होमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार होण्यासाठी साहाय्य केले. मंत्रपठण होत असताना मान खाली ठेवून आणि अदब दाखवून आपल्या धार्मिक भावनांचा आदर राखला जात होता.
विद्युतदाहिनी असलेली इमारत भव्य नक्षीकाम केलेली होती. एखाद्या चर्चसारखी तिची रचना होती. सभोवती सुंदर फुलांची बाग होती, कारंजी होती. हल्ली दफन करण्यासाठी जमिनीचा तुटवडा असल्याने पुष्कळ अमेरिकन लोकही पुरण्याऐवजी विद्युतदाहिनीमध्ये दहन करण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये विद्युत दहन करण्याच्या पर्यायावर एका पत्रकाराने भलामोठ्ठा लेख लिहून विद्युतदहनाची आवश्यकता असल्याचे ठासून सांगितले होते.
ज्या दिवशी दहन झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी अस्थी देण्यात आल्या. व्यवस्थितपणे एका खोक्यात प्लॅस्टिकच्या झिपलॉक असलेल्या पिशवीत पॅक करून अस्थी देण्यात आल्या. या अस्थींबरोबर डेथ सर्टिफिकेट आणि क्रीमेशन सर्टिफिकेट एका फाईलमध्ये देण्यात आले. ही सर्व कामे फ्यूनरल होमच्या कर्मचाऱ्यांनी केली होती. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना कुठलीही तसदी नव्हती. या सर्टिफिकेटबरोबर फ्यूनरल होमतर्फे सांत्वनाचे पत्र होते आणि एका भल्या मोठय़ा पुडय़ात केक्स्, बिस्किटे, कुकीज वगैरे पदार्थ दिले होते.
(२७ नोव्हे.२०१० साली चतुरंग लोकसत्ता मधे सदर लेख मी प्रसिद्ध केला होता. तो पुन्हा या ठिकाणी देत आहे.)
— चिंतामणी कारखानीस
कारखानीस साहेब,
– तुमचा लेख मनाला भिडला. माझ्या पत्नीचेंही नुकतेंच कॅन्सरनें निधन झालें. त्यामुळे, आपला लेख अधिकच ‘जवळचा’ वाटला. धन्यवाद.
– आपण लिहिलेला अमेरिकेतील अनुभव मी घेतलेला नाहीं, पण मुलगा तिकडे असल्यामुळे अन्य अनुभव आहेत, व पदोपदी ‘तिथें आणि इथें’ , असा फरक जाणवत राहतो.
स्नेहादरपूर्वक
सुभाष नाईक
सांताक्रुझ, मुंबई