अमिताभ बच्चन यांच्या वडिलांचे मूळ आडनाव श्रीवास्तव असले तरी बच्चन या टोपणनावाने ते कविता प्रसिद्ध करीत असत. अमिताभ बच्चन यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९४२ रोजी झाला.चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना अमिताभ यांनी हे टोपणनाव आडनाव म्हणून वापरायला सुरुवात केली आणि पुढे संपूर्ण कुटुंबाचेच बच्चन हेच आडनाव व्यवहारात रूढ झाले.
प्रसिद्ध हिंदी साहित्यिक सुमित्रानंदन पंत यांनी बच्चन कुटुंबातल्या या बाळाचं ‘अमिताभ’ या नावानं बारसं केले होते, अमिताभ बच्चन यांचे शिक्षण अलाहाबादच्या ज्ञानप्रबोधिनी आणि बॉईज हायस्कूल येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण नैनितालच्या शेरवूड महाविद्यालयात झाले आणि त्यानंतर दिल्लीच्या किरोडीमल महाविद्यालयातून त्यांनी विज्ञानाची पदवी संपादन केली. त्यांनी आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला कोलकाता येथे एका कंपनीत काम केले. नंतर चित्रपटात संधी शोधण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले. मुंबईत त्यांना ख्वाजा अहमद अब्बास यांच्या सात हिंदुस्थानी या चित्रपटात सर्वप्रथम भूमिका मिळाली. त्यानंतर हृषीकेश मुखर्जी दिग्दर्शित आनंद या चित्रपटात त्यावेळचे लोकप्रिय सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या समवेत काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यांनी आनंदमधील भूमिकेचे सोने केले. त्यावर्षीचा सर्वोष्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही त्यांना मिळाला.
नमक हराम या चित्रपटातील त्यांची भूमिकाही लक्षवेधी ठरली. त्या पाठोपाठ आलेला जंजीर चित्रपटातील पोलीस इन्स्पेक्टरची त्यांची भूमिका विशेष गाजली आणि येथूनच त्यांची अंग्री यंग मॅन ची प्रतिमा जनमानसात प्रस्थापित झाली. प्रचलित समाजव्यवस्थेच्याविरोधात बंडखोरी व क्रोध व्यक्त करणाऱ्या संतप्त युवकाचे प्रतिनिधित्व त्यांनी पडद्यावर आपल्या भूमिकांद्वारे केले. त्यामुळे त्यांच्या भूमिका रसिकांना आपल्याशा वाटल्या. उंच शरीरयष्टी, भेदक डोळे, भारदस्त घनगंभीर आवाज आणि गहिरी भावगर्भ अभिनयशैली यांमुळे बच्चन यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ते लवकरच ‘सुपरस्टार’ पदावर पोचले व रूपेरी पडद्यावर जणू अमिताभ युग सुरू झाले. आजतागायत त्यांच्याइतकी लोकप्रियता अन्य कोणत्याही अभिनेत्याला लाभलेली नाही. बच्चन हे त्यांच्या काळात भारतातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते.
अमिताभ बच्चन चित्रपटात असले म्हणजे चित्रपट आर्थिक दृष्ट्याही फायदेशीर ठरणार, असा चित्रपट उद्योगाचा वर्षानुवर्षांचा अनुभव होता. आतापर्यंत त्यांनी सुमारे १६८ चित्रपटांतून भूमिका केल्या असून त्यांचे मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, यश चोप्रा यांसारख्या दिग्दर्शकांबरोबर केलेले चित्रपट विशेष गाजले. त्यांच्या यशस्वी, लोकप्रिय चित्रपटाच्या यादीत अभिमान, दीवार, शोले, कभी कभी, अमर अकबर अँथनी, मुकद्दर का सिकंदर, त्रिशूल, डॉन, काला पत्थर, नसीब, लावारीस, सिलसिला, नमकहलाल, कुली, शराबी, अग्निपथ यांसारख्या अनेक चित्रपटांचा उल्लेख करता येईल. मा. अमिताभ बच्चन यांनी १९ चित्रपटांसाठी पार्श्वगायनही केले आहे. मि. नटवरलाल या चित्रपटातील पार्श्वगायनासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. धीरगंभीर, भारदस्त आवाज हे बच्चन यांचे आणखी एक वैशिष्ट्य. आपल्या भारदस्त आवाजाचा वापर त्यांनी भूमिका साकारताना तर केलाच, शिवाय काही चित्रपटांना त्यांनी आपल्या भारदस्त आवाजात पार्श्व-निवेदनही दिले आहे. त्यांत भुवनशोम, शतरंज के खिलाडी, लगान आदी चित्रपटांचा उल्लेख करता येईल. ज्येष्ठ अभिनेत्री जया भादुरी याच्याशी १९७३ मध्ये त्यांचा विवाह झाला.
१९८४ मध्ये ते अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. त्यांचे मताधिक्यही विक्रमी ठरले. राजकारणातली त्यांची कारकीर्द मात्र त्यांना मानवली नाही. १९८२ साली कुली या चित्रपटाच्या चित्रीकरणाप्रसंगी त्यांना अपघात झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली; त्यावेळी त्यांच्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी देशभर प्रार्थना, नवस केले व शुभेच्छा दिल्या. आतापर्यंत त्यांना १४ वेळा फिल्मफेअर पुरस्कार, तर दोन वेळा उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून, १९८४ मध्ये पद्मश्री, २००१ मध्ये पद्मभूषण आणि २०१५ साली पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करून भारत सरकारने या महानायकाचा गौरव केला आहे. या शिवाय अनेक मानद उपाध्याही त्यांना मिळाल्या आहेत.
विदेशांतही त्यांचे सन्मान झाले आहेत. त्यांनी १९९६ मध्ये अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लि. ही चित्रपटनिर्मितिसंस्था स्थापन केली होती. आर्थिक नुकसानीमुळे त्यांना ती बंद करावी लागली. २००० मध्ये ‘कौन बनेगा करोडपती’ या दूरचित्रवाणीवरील प्रश्नमंजुषा मालिकेने त्यांच्या लोकप्रियतेत अधिकच भर घातली. दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कसे करावे, याचा आदर्श वस्तुपाठच बच्चन यांनी आपल्या निवेदनानेघालून दिला. वाढत्या वयानुसार बच्चन यांनी आपल्या भूमिकांचा बाज बदलला असला, तरी त्यांचा अभिनय उत्तरोत्तर अधिकाधिक परिपक्व होत गेलेला दिसून येतो. अमिताभ बच्चन यांची कारकीर्द अद्यापही चालू असून वयाच्या पंचाहत्तरीतही ते तरुणांना लाजवेल अशा उत्साहात कार्यरत आहेत. गेली १७ वर्षे ते केबीसी साठी सूत्रसंचालन करत आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply