नवीन लेखन...

ॲ‍ॅमनिओ पॅच – एक वरदान

ज्या गर्भार महिलेच्या गर्भाशयातील पाणी काही कारणास्तव अचानकपणे कमी झालेले किंवा निघून गेलेले असते, अशा गर्भाची नीट वाढ होत नाही व त्याच्या जगण्याची शक्यताही धूसर होते. अशा वेळी ‘ॲ‍ॅमनिओ पॅच’ या वैशिष्ट्यपूर्ण शस्त्रक्रियेद्वारे त्या बाळास जीवदान देता येते व प्रसूतीही चिंतामुक्त होऊ शकते. हे शक्य केले आहे नाशिकच्या एका सहृदय महिला डॉक्टरने!


आज एकविसाव्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अति वेगाने जी प्रगती होत आहे, ती बघितली की अचंबितव्हायला होते. त्यातही वैद्यकीय क्षेत्रात मानवाने जी भरारी घेतली आहे, तिला तोडच नाही. गेल्या २५-३० वर्षांपासून या क्षेत्रात मानवाने असे काही शोध लावले आहेत, की त्यामुळे मानवाला ते वरदानच ठरलेले आहेत. त्यामुळे जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टी काही आपल्या हातात नाहीत असे जे म्हटले जाते, त्याला कुठेतरी मानवानेच छेद दिलेला आहे, असे म्हणावे लागेल. मृत्यूलाही रोखून धरण्याचे कसब मानवाने या नवनवीन शोधांमुळे, आधुनिक तंत्रज्ञानामुळे अवगत केले आहे असे आज दिसून येत आहे. त्यामुळेच आज कोणत्याही प्रश्नावर उत्तर नाही किंवा एखाद्या कठीण समस्येवर उपाय नाही असे नाही. म्हणूनचइच्छा तिथे मार्ग निघत असतो. अशीच एक अचंबित करणारी बातमी नुकतीच वाचनात आली आणि म्हणून तिचा शोध घेतला, तर ती खरोखरच थक्क करणारी ठरली.

गर्भातील बाळास धोका

पूर्वी एखाद्या महिलेला दिवस गेले आणि अतिश्रम, अवजड वस्तू उचलणे, गर्भपिशवीचे तोंड सैल असणे किंवा धकाधकीचा प्रवास केला अशांपैकी कोणत्याही कारणामुळे सुरुवातीच्या दोन-चार महिन्यांत किंवा नंतरही मातेच्या गर्भाशयातील पाणमोट फुटल्यामुळे जर गर्भजल वाहून गेले, तर गर्भातील बाळाला धोका उत्पन्न होऊन ते जगण्याची शक्यता उरत नसायची. अशा वेळी एक तर अपुर्‍या दिवसांचे बाळ तरी जन्मते किंवा महिलेचा गर्भपात तरी करावा
लागतो. म्हणजे त्या महिलेने शारीरिक आणि भावनिक असे दुहेरी त्रास सोसायचे आणि पुन्हा काही दिवस थांबून नंतर परत गर्भावस्था स्वीकारायची म्हणजे परत त्याच चक्रात अडकायचे, या सगळ्या त्रासातून वाचण्यासाठी कोणताच उपाय नाही.

अशा या जाचातून आजतागायत कितीतरी महिलांना जावे लागले आहे. पण आता अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर पुण्या-मुंबईतल्या नव्हे, तर नाशिकमधल्या एका महिला स्त्री-रोगतज्ज्ञ, प्रसूतितज्ज्ञ डॉक्टरांनी एक अतिशय अनोखा, पणयशस्वी उपाय शोधून काढलेला आहे की ज्यामुळे अनेक मातांना सुटेकाचा निःश्वास टाकता येणार आहे आणि तितक्याच बालकांनाही आनंदाने, सुदृढतेने या जगात जन्म घेता येणार आहे. या माता-बालकांना पुनर्जन्म देणार्‍या डॉक्टर आहेत नलिनी बागूल. म्हणूनच डॉ. बागूल यांना भेटायला जेव्हा मी गेले, तेव्हा त्यांनी आपल्या या नवीन प्रयोगाबद्दल मला भरभरून माहिती दिली आणि ती देतानाही त्यांच्या चेहर्‍यावर एक प्रसन्नतेचे, सार्थकतेचे स्मितहास्य होते. तीच त्यांच्या कार्याची पावती होती.

स्त्री-प्रसूतितज्ज्ञ

डॉ. नलिनी बागूल या नाशिकमधील स्त्री-प्रसूतितज्ज्ञ असून त्यांचे सुसज्ज असे हॉस्पिटल आहे. येथील प्रसन्न वातावरणातअनेक रुग्ण महिला दररोज त्यांच्याकडे गरोदरावस्थेतील तपासणीसाठी, प्रसूतीसाठी वा महिलांशी संबंधित इतर आजारांसाठी येत असतात. अशाच रुग्णांमध्ये काही रुग्ण महिला त्यांच्याकडे गरोदरावस्थेत गर्भाशयातील गर्भजल निघून गेल्यामुळे निर्माण झालेल्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी डॉ. बागूल यांच्याकडे येऊ लागल्या आणि ‘‘आता डॉक्टर, तुम्हीच काही याच्यावर उपचार करा आणि आमच्या बाळाला वाचवा. त्यासाठी आम्ही नऊ महिनेही तुमच्या हॉस्पिटलमध्ये राहून ट्रीटमेंट घ्यायला तयार आहोत,’’ अशी विनवणी करू लागल्या. आणि रुग्णांच्या या मागणीतूनच डॉ. बागूल यांनी ‘अॅमनिओ पॅच’ ही बालकांना जीवदान देणारी शस्त्रक्रिया शोधून काढली.

या वैशिष्ट्यपूर्ण शस्त्रक्रियेत ज्या मातेच्या गर्भाशयातील पाणी अचानकपणाने निघून गेलेले असते, त्या मातेच्या गर्भाशयातील बाळाची नीट वाढ होत नाही. बहुतांशी वेळा बाळाच्या जगण्याची शक्यताही नाहीशी होते. अशा वेळी त्या मातेचे ३०० एम.एल. रक्त काढून, रक्तपेढीत हे रक्त पाठवून रक्तातील कम्पोनन्ट (प्लेटलेट) वेगळे करून ते एका पिशवीतून गर्भाशयात सोडले जातात. यामुळे बाळाला पुन्हा संरक्षण मिळून जीवदान मिळते असे डॉ. बागूल यांनी सांगितले. हे असे गर्भजल गर्भाशयात सोडण्यामुळे बाळाला व मातेला, दोघांनाही कोणतेच इन्फेक्शन तर होत नाहीच; पण बाळाला अॅन्टिबायोटिक्सचाही कोणताच डोस द्यावा लागत नाही. त्यामुळे बाळामध्येही काहीच दोष निर्माण होत नाही, असे डॉ. बागूल म्हणतात.

शस्त्रक्रियेनंतर

डॉ. बागूल यांनी विकसित केलेल्या आणि यशस्वी करून दाखवलेल्या ‘अॅमनिओ पॅच’ या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण महिलेला पूर्णतः नऊ महिने हॉस्पिटलमध्ये ठेवून घेण्याची त्यांना गरज वाटत नाही. इथे त्या स्पष्ट करतात, की ज्या महिलेवर ही प्रक्रिया केलेली असते, तिला पहिले दोन-तीन दिवस ठेवून घेतले जाते आणि मग महिन्या-महिन्याने तिला तपासणीला बोलावले जाते आणि तिची तब्येत, बाळाची वाढ यांचे त्या निरीक्षण करतात. ही महिला सतत नऊ महिने डॉक्टरांच्या देखरेखीखाली आपल्या बाळाला वाढवत असते. नऊ महिन्यांनंतर किंवा गरज पडल्यास त्यापूर्वीही डॉक्टर या महिलेचे बाळंतपण करतात. बर्‍याच वेळा या प्रक्रियेनंतर सीझेरियन पद्धतीने बाळंतपण केले जाते; कारण बाळंतपणात जर जास्त रक्तस्राव झाला, तर एवढ्या कष्टाने बाळ वाढवलेले असते तेव्हा कोणतीच गुंतागुंत व्हायला नको असते, असे डॉक्टरांचे म्हणणे पडले. पण काही केसेसमध्ये नॉर्मल डिलिव्हरीही होते; पण ते प्रत्येक महिलेच्या प्रकृतीवर अवलंबून असते असेच त्यांचे मत आहे.

कौशल्य आणि प्रगत तंत्रज्ञान

मातेला आणि बाळाला वरदान ठरणार्‍या या शस्त्रक्रियेमुळे डॉ. बागूल यांनी या क्षेत्रात एक क्रांतीच घडवून आणली आहे आणि तीही पुण्या-मुंबईऐवजी नाशकात! डॉ. बागूल यांनी आपले कौशल्य आणि प्रगत तंत्रज्ञान वापरून आजवर सात ‘अॅमनिओ पॅचेस’च्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत. नुकतीच त्यांनी ज्या महिलेवर ही

प्रक्रिया केली, ती महिला त्यांच्याकडे तिसर्‍या महिन्यात गर्भजल निघून गेल्यावर आली होती. डॉ. बागूल यांनी तिला चौथ्या महिन्यापासून आपली ट्रीटमेंट सुरू केली आणि आठव्या महिन्यात त्यांनी तिची प्रसूती केली. त्या वेळी त्या बाळाचे वजन अवघे एक किलो होते; पण त्यांनी पेटीत ठेवून या बाळाची वाढ केली. आता दोन महिने झालेल्या या बाळाचे वजन अडीच किलो झाले आहे, असे डॉक्टर सार्थ समाधानाने म्हणाल्या. त्यांच्या चेहर्‍यावरचे हे समाधान एका बाळाला जीवदान दिल्याचे; एका मातेला, एका कुटुंबाला बाळाच्या जन्माचा आनंद दिल्याचे होते. त्यांनी एका कुटुंबात जे चैतन्याचे, उत्साहाचे वातावरण आणले, ज्यांना बाळाच्या जन्मानंतर बर्‍याच काळाने मातृत्व-पितृत्व लाभले होते, त्यांच्या दृष्टीने तर डॉ. बागूल देवदूतच ठरल्या. या अपत्यप्राप्तीनंतर या महिलेने डॉ. बागूल यांना जे आभाराचे पत्र पाठवले, ते खूपच बोलके आहे. त्यांच्या डॉक्टरांबद्दलच्या भावनाच या पत्रातून वाचकांना कळतील.

नाशिकमधीलच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांना वरदान ठरलेल्या या ‘अॅमनिओ पॅच’ या दुर्मीळ शस्त्रक्रियेत डॉ. नलिनी बागूल यांना त्यांच्या हॉस्पिटलमधील सहकारी डॉक्टर्स, इतर स्टाफ, त्यांचे पती श्री. बागूल या सर्वांचेच सहकार्य लाभत आहे.

वैद्यकीय क्षेत्रात डॉ. बागूल यांनी ही जी काही नवीन क्रांती केली आहे, त्यामुळे नक्कीच त्यांना अनेक मातांकडून दुवा मिळणारआहे. सेवाभावी वृत्तीने त्यांनी घेतलेले हे व्रत अनेक माता-पित्यांच्या चेहर्‍यावर हास्य पसरविणारे ठरणार आहे आणि त्यामुळेचअनेक बालकांनाही हे सुंदर जग त्या दाखवणार आहेत. त्यांच्या या सर्व कार्याला आणि पुढील वाटचालीला माझ्या शुभेच्छा!

सुषमा देशपांडे
८, परशुराम पार्क, रचना बालवाडीशेजारी, कॅनडा कॉर्नर, शरणपूर, नाशिक ४२२ ००२
भ्रमणध्वनी : ९४०३५०९९१९

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..