नवीन लेखन...

अमृताते पैजा जिंकायच्या तर….

परखाच एका मुलाखतीमध्ये मला प्रश्न विचारला गेला की भाषेच्या क्षेत्रात एकच गोष्ट बदलायची असेल तर तुम्ही काय बदलाल? क्षणाचाही विलंब न लागता उत्तर आलं की ‘भाषा शिक्षणाची पद्धत.’

खरं म्हणजे आपली मातृभाषा म्हणून आपण मराठी अगदी जन्मापासून ऐकत असतो. यथावकाश बोलायला लागतो. शाळेत जायला लागलो की अक्षरओळख होते आणि मग लेखनाची होते! म्हणजे श्रवणकौशल्य हे सर्वात आधी विकसित होतं. नंतर क्रमाक्रमानं बोलणे-वाचणे-लिहिणे ही कौशल्ये विकसित होतात. भाषाशिक्षणाचा हाच आदर्श क्रम मानला गेला आहे.

श्रवण हे मुलभूत कौशल्य विकसित व्हायला सुरुवात होते ती अगदी बाल्यावस्थेत! तान्ह्या वयात! आणि अर्थात त्या वयात जी व्यक्ती सर्वात अधिक काळ संपर्कात असेल तिच्याकडून. सामान्यतः अजून तरी आई हीच ती व्यक्ती असते. त्यामुळे आई हीच पहिला गुरु असल्याचं मानलं जातं. आणि तेच वास्तवही आहे. त्यामुळे आईचं व्यक्तिमत्त्व जितकं अधिक समृद्ध, अधिक सुजाण तसे संस्कार मुलांवर होणार. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी’ अशा म्हणी अनुभवातून निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे लहान मुलांशी खूप बोलायला हवं. ‘त्यांना काय कळतंय’ अशी दृष्टी नसावी. त्यांच्या वयाला साजेल असं सुलभ रीतीने त्यांना समजून देता यायला हवं. त्यासाठी आईची भाषा, तिचं वाचनही समृद्ध असायला हवं. मात्र आपण स्त्रीवर आधीच जबाबदारीचं खूप ओझं टाकलं आहे. त्यात नव्यानं हे ओझं आलं, असं होता कामा नये. त्यामुळे हेही लक्षात घ्यायला हवं की घरातील स्त्रियांना या कामासाठी थोडी उसंत, थोडी सवड मिळायला हवी. आणि ती मिळावी ही जबाबदारी घरातील इतर पुरुष सदस्यांचीही आहे.

लहान वयात मुलांच्या सर्वाधिक सहवासात असते घरातील स्त्री म्हणजे सहसा आई, आजी. हा सहवास अधिक अर्थपूर्ण आणि फलदायी व्हायला हवा. इतर अनेक गोष्टींचं नियोजन आपण करतो. मुलांच्या शिक्षणाची, त्यांच्या सुरक्षित भवितव्याची काळजी घेतो. त्यासाठी पैशाची व्यवस्था करतो. त्यांचे आरोग्य डोळसपणे सांभाळतो. लसीकरण करतो. त्यांना खाण्या पिण्याच्या, स्वच्छतेच्या योग्य सवयी आपण लावतो, त्यासाठी वेळ देतो, चिकाटी ठेवतो. अगदी त्याच भावनेनं भाषेचे संस्कार मुलांवर व्हावेत म्हणून दक्ष असायला हवं.

सध्याच्या वेगवान आयुष्यात आई व वडील दोघेही कामासाठी घराबाहेर पडत असतील तर लहान मुलांना त्यांचा सहवास साहजिकच कमी मिळतो. सहजपणे जे भाषासंस्कार पूर्वी घरातूनच मिळत असत त्याला आजची पिढी वंचित आहे. शांता शेळके यांनी आपल्या ‘धूळपाटी’ या आत्मचरित्रपर लेखनात असं म्हटलं आहे की ‘शेळकेवाड्यातील स्त्रिया अशिक्षित होत्या पण लहानपणी त्यांच्या ठसकेबाज बोलण्यातून, म्हणी-उखाणे आणि त्यांना पाठ असलेल्या असंख्य गाण्या-ओव्यांतून म्हणजे थोडक्यात मौखिक रूपांतून शांताबाईंचा भाषेशी परिचय झाला. अनेक मोठ्या लेखकांनीही लहानपणी कानांवर पडलेल्या गाण्या-गोष्टींचा उल्लेख मोठ्या जिव्हाळ्यानं केला आहे. बालवयात झालेले हे भाषेचे संस्कार अत्यंत मोलाचे असतात. कारण त्यांचे ठसे खोलवर उमटतात.

समृद्ध आणि वैविध्यपूर्ण शब्दसंग्रह न कळत होण्याचा काळ हा बालपणीचा असतो. भाषेची गोडी लागण्याचा, तिचा सुयोग्य वापर करण्याचा संस्कारही त्याच वयात लाभला तर आज आपल्या भाषेची जी हेळसांड चालू असलेली दिसते ती थांबवता येईल. बघा, टीव्ही, वर्तमानपत्रे अगदी आकाशवाणीसारखं माध्यमही आता अपवाद राहिलं नाही. कशीतरी ढिसाळ भाषा तिथे आढळते. आणि त्याची खंत कोणाला नाही, हे अधिक वेदनादायक आहे.

मध्यंतरीच्या इंग्रजी माध्यमातील शिक्षणाच्या रेट्यामुळे सर्वाधिक नुकसान झालं ते आपल्या भाषेचं. काळाची गरज म्हणून शिक्षणाचं इंग्रजी माध्यम निवडलं तरी जाणीवपूर्वक मुलांच्या भाषिक विकासाकडे लक्ष पुरवायला आपण कमी पडलो. त्यामुळे धड ना इंग्रजी, धड ना मराठी असा सगळा धेडगुजरी प्रकार होऊन बसला आहे.

मुळात आता विभक्त कुटुंबात आजी-आजोबा असतातच असं नाही. जिथे असतात तिथे आजीजवळ बसून गोष्टी ऐकण्याचं सुख, निवांतपणा टीव्ही सारख्या माध्यमांनी हिरावून घेतला आहे. आता वेळ आली आहे पुन्हा या सर्व गोष्टी जाणीवपूर्वक आणि सातत्यानं सुरु करण्याची. विभक्त कुटुंबात ही जबाबदारी आई-वडील यांची आहे हे नव्यानं जाणवून देण्याची.

अनेकदा असं दिसतं की आई-बाबांकडेही ही भाषिक समृद्धी असतेच असं नाही. ‘गोष्ट सांगता येत नाही.’ ही अनेकांची समस्या असते. पण म्हणून आता ही जबाबदारी झटकून चालणार नाही. त्याची जागा गोष्ट वाचून दाखवण्याने घ्यायला हवी. दिवसाचा ठराविक वेळ मुलांसह वाचनाचा असायला हवाच. ठराविक जागी, ठराविक वेळी वाचन ही सवय व्हावी. सुरुवातीला मुलांबरोबर पुस्तक वाचलं की पुस्तकं हळूहळू आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक होत जातात. त्यांच्याशी मैत्री होते आणि हे मैत्र अखेरपर्यंत सोबत देणारं, मार्गदर्शन करणारं आणि आपल्याला संपन्न करणारं, श्रीमंत करणारं असतं. पुस्तकं हाताळणं, जपणं आणि त्यांचा संग्रह करणं हा आपल्या जगण्याचा अत्यावश्यक भाग व्हायचा तर त्याची सुरुवात अशी जाणीवपूर्वक करायला हवी.

सर्व गोष्टींचे ‘इव्हेंट’ करण्याच्या या काळात दरवर्षी भाषा पंधरवडा आला, मराठी भाषा दिवस आला की धामधुमीत साजरा करायचा. उरलेले वर्ष भाषेची अक्षम्य हेळसांड करत राहायची… हा सध्याचा युगधर्म झाला आहे. हे चित्र बदलायला हवं असेल, ‘मातृभाषा’ म्हणून मोठ्या गौरवानं मराठीचा उल्लेख व्हावा असं वाटत असेल तर त्याची सुरुवात घरातून व्हायला हवी. कुटुंबातील सर्वांनीच भाषेचा संस्कार रुजवण्यात सहभाग घ्यायला हवा.

बदलत्या काळानुसार आपण आपले पेहराव बदलले. आपल्या खाण्यापिण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या कल्पना बदलल्या. आपली सणवार साजरे करण्याची, लग्नसमारंभ करण्याची पद्धत बदलली. अगदी आपल्या दिनक्रमातही बदल केले.मग याबाबतही अगदी आवर्जून, जाणीवपूर्वक बदल करायला हवा.

आपण लहान असताना आपल्याला कविता, गाणी गोष्टी यांचा जो अवर्णनीय ठेवा आपल्या आसपासच्या माणसांनी, आपल्या शिक्षकांनी दिला तो आपल्याला आजही पुरून उरला आहे. त्या आठवणी आजही आनंद देतात. असा ठेवा आपण आपल्या मुलांना नको का द्यायला… आपल्या भावना, आपले विचार योग्य प्रकारे मांडता येणं आवश्यक आहे. व्यवस्थित उच्चार करणं यासाठी वाणी स्वच्छ आणि स्पष्ट असणं हीदेखील आवश्यक बाब आहे. पाठांतराची सवय तर आता आपल्या जगण्यातून पारच हद्दपार झाली आहे. ती पुन्हा सुरू करायला हवी. उत्तम ऐकणं आणि उत्तम वाचणं या भाषिक विकासाच्या अत्यंत मुलभूत पायऱ्या आहेत. चांगली भाषा कानावर पडत राहायला हवी आणि उत्तम पुस्तके घरात यायला हवीत, त्यासाठी विविध ठिकाणी मुलांना आवर्जून घेऊन जायला हवं. पुस्तक प्रदर्शनं, लहान मुलांची नाटके इथे जायला हवं. ज्ञान आणि मनोरंजन एकाच वेळी देणाऱ्या या सार्वजनिक पाणपोया असतात. त्यांचा लाभ घ्यायला हवा. महिन्यातून एकदातरी मल्टीप्लेक्स सिनेमागृहात जाऊन भरपूर पैसे खर्च केले जातात. त्याचबरोबर हेही नको का करायला?

पण आपला तो अग्रक्रम व्हायला हवा. भाषाशिक्षण ही आपल्याला महत्त्वाची गोष्ट वाटायला हवी. तसं झालं तरच ज्ञानदेवांनी ‘अमृताते पैजा जिंकण्याचा’ जो अभिमान प्रकट केला तो खरा ठरेल. नाहीतर नुसतीच ‘बोलाची कढी आणि बोलाचाच भात’ !

– डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी

व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..