महाराष्ट्रामध्ये खासगी मराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या कार्यक्रमांचे प्रक्षेपण सुरू झाल्यानंतर सुरुवातीची काही वर्षं उत्तमोत्तम कार्यक्रम रसिकांच्या वाट्यास आले. मात्र गेली काही वर्ष बहुसंख्य चॅनेल्सवर नाच-गाण्यांचे रिऍलिटी शोज, रेसिपी शोज, क्वीज – कॉमेडी शोज, कौटुंबिक सुखदु:खाच्या मालिकांचे अमाप पीक आलेले दिसते. या मनोरंजक कार्यक्रमांमध्ये साहित्यविषयक कार्यक्रमांना कुठेच स्थान नव्हतं आणि आजही नाही. या पार्श्वभूमीवर मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून दर बुधवारी रात्री ८.३० वा. प्रसारित होणारा ‘अमृतवेल’ हा साहित्यविषयक कार्यक्रम हा एकमेव अपवाद आहे.
कथा-कविता विविध साहित्यिकांच्या मुलाखती आणि लेखनविश्वाच्या नव्या-जुन्या प्रवाहांचा वेध घेणार्या या रसिकप्रिय कार्यक्रमाने १५० भागांचा टप्पा नुकताच पार केला. या कार्यक्रमाचे निर्माते श्री. रविराज गंधे हे सत्यकथेतून कथा लिहिणारे लेखक – पत्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या चोखंदळ आवडी-निवडीतून अमृतवेलचे बहुरंगी कार्यक्रम साकार होतात.
या कार्यक्रमाच्या संकल्पनेविषयी विचारता श्री गंधे सांगतात, “मराठी सारस्वतांनी निर्माण केलेल्या साहित्यकृतींचा अन् लेखक-कवींचा एकेकाळी साहित्यविश्वात मोठा दबदबा होता. चि. त्र्यं. खानोलकर, श्री. ना. पेंडसे, विजय तेंडुलकर, जी. ए. कुलकर्णी, भालचंद्र नेमाडे, विंदा करंदीकर, कवी ग्रेस अशा प्रतिभावंतांनी मराठी रसिकांच्या मनावर राज्य केलं होतं. आजच्या साहित्यविश्वाला ती झळाळी नाही. काही अपवाद वगळता अभिजात दर्जेदार साहित्यकृतींची निर्मिती होताना आज दिसत नाही. वीसएक वर्षांपूर्वी सुरू झालेल्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे वर्षानुवर्षे साहित्य – नाटक – भावसंगीतामध्ये रमणारा मराठी रसिक माणूस हा सांस्कृतिकीकरणापासून थोडा दुरावल्यासारखा झाला. अशावेळी प्रेक्षकांना – वाचकांना विशेषत: नव्या पिढीला आधी मराठी साहित्यविश्वाची ओळख होणं, त्यांना वाचनाची गोडी लागणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्या दृष्टीने कादंबर्या, कथा-कविता, ललितलेखन, चरित्र – आत्मचरित्र, पर्यटन, पर्यावरण, तंत्रज्ञान अन् संगणकविषयक पुस्तक अशा अनेकविध समृद्ध साहित्य प्रकारांची अन् लेखकांची ओळख करून देणारे असंख्य कार्यक्रम आम्ही
सादर केले. ते रसिकांना खूप वेगळे वाटले, आवडले. तसेच पुस्तकविश्वाची ओळख करून देणारं पुस्तक – परिचय हे सदरही खूप लोकप्रिय आहे, असे गंधे यांनी सांगितले.
या कार्यक्रमात स्वत: श्री. गंधे ‘पुस्तक – परिचय’ या सदरात बाजारात नव्यानं आलेल्या पुस्तकांची थोडक्यात, मुद्देसूदरीत्या आणि मार्मिकपणे ओळख करून देतात. हे सदर चांगलंच लोकप्रिय झाले असून लेखक – प्रकाशकांची या सदरातून आपल्या पुस्तकांचा, वाचकांचा परिचय व्हावा ही इच्छा असते. अमृतवेल या कार्यक्रमास वाचक – प्रकाशकांनीही उत्तम प्रतिसाद दिला असून राजहंस, पॉप्युलर, रोहन, ज्योत्स्ना आदी मातब्बर प्रकाशन संस्था हा कार्यक्रम प्रायोजित करीत असतात. साहित्यिक कार्यक्रमांना सहसा प्रायोजक मिळत नाही त्या पार्श्वभूमीवर अमृतवेलचं यश उल्लेखनीय म्हणावं लागेल. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय भुस्कुटे आपल्या सहजसुंदर प्रसन्न शैलीत करतात. मराठी दूरचित्रवाणी विश्वातील अशा या एकमेव साहित्यिक कार्यक्रमाला गतवर्षी ‘सह्याद्री माणिक सन्मान’ पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं.
अमृतवेलच्या आगामी कार्यक्रमात ‘काव्यांजली’ हा कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या कवितांवर विशेष कार्यक्रम तीन भागांत लवकरच प्रसारित होणार आहे. २, ९ आणि १६ फेब्रुवारी रोजी या तीन भागांचं प्रसारण होणार आहे. यात ज्येष्ठ कवी शंकर वैद्य आणि डॉ. घनश्याम बोरकर हे सहभागी होणार आहेत.
ग्रंथप्रसार करणारा हा मराठी पुस्तकांना आधार असलेला कार्यक्रम. ‘नाबाद १५०’चे पर्व पूर्ण करतेय हे विशेष!
— बातमीदार
Leave a Reply