सूर्यास्ताची वाट पहात बालीच्या एक निवांत समुद्र किनार्यावर मी उभा होतो. सोनेरी प्रकाशात फेसाळी लाटांवर क्रीडा करणाऱ्या गोरंग स्त्री- पुरुषांना पहात समुद्री लाटांचे कधी न ऐकलेले संगीताचा आनंद घेत होतो. अचानक दिसली मला ती, मलयवासिनी, वस्त्रांच्या कोशात दडलेली जलपरीच, ती संकोचलेल्या डोळ्यांनी पहात होती फेसाळी लाटांवर कल्लोळ करणाऱ्या गोर्या मत्स्य ललनांना, पण डोळ्यांत दिसत होती तिच्या एक अनामिक भीती. दूर समुद्रात तिचा राजा खुणावत होता तिला समुद्रात उतरण्यासाठी, राजाची मर्जी राखण्यासाठी शेवटी ती बाहेर पडली वस्त्रांच्या कोषातूनी. सोनेरी रंगाच्या टू -पीस बिकनी मधे. घाबरलेली, बावरलेली, संकोचलेली, लाजत-लाजत हातानी डोळे झाकत धावत निघाली समुद्रांच्या लाटांवर स्वार होण्यासाठी, ती जलपरी. पाय फिसलुनी थेट पडली माझिया अंगावरती. सर्वांग भिजले. तिच्या स्पर्शाने रोमांचित झालो. तांबूस रंगाची सडपातळ भिजलेली सोनेरी प्रकाशात दिसत होती ती विश्व सुंदरी सारखी. ती चक्क भारतीय स्त्रियांसारखी लाजली व बिलगली जाऊन आपल्या राजाला. मला ही हसू आले पहिल्यांदाच बिकनी मधील सुंदरीला लाजताना पाहिले होते. किंबहुना पहिल्यांदाच तिने बिकनी घातली असेल. न जाणे का, सारखे लक्ष तिच्याचकडे जात होते.
थोड्या वेळात तिचा संकोच दूर झाला, कोणी पहात असेल तर पाहू द्या आपल्याला काय. जगाला विसरून ती जलपरी आपल्या राजाबरोबर समुद्री लाटांवर खेळू लागली. दुरून का होईना त्यांचा आनंदात मी ही नकळत शामिल झालो होतो. दोघही किनार्यावर आले, ती निसंकोचपणे बिकनी घातलेले फोटो आपल्या राजाला काढू देत होती. अचानक तिचा राजा माझ्याजवळ आला व आपला कॅमेरा देत, दोघांचे फोटो काढण्याची विनंती केली. नकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. आनंदाने निरनिराळ्या पोजमधे त्यांचे फोटो काढू लागलो. मधेच तिच्या राजाने तिला खुणावले व आपल्या तोंडावर बोट ठेवले. ती हसू लागली. हसता-हसता एखाद्या खट्याळ मुलीप्रमाणे राजाला बेसावध पाहून त्याचे कडकडीत चुंबन घेतले. गोर्या ललना सुद्धा लाजतील असे. तो क्षणभर बावरला पण त्यानेही तिचे तेवढ्यात जोशात चुंबन घेतले. मीही क्षणभर बावरलो, पण आतला फोटोग्राफर जागा झाला. त्या दिव्य क्षणांचे जेवढे काढू शकलो फोटो काढले. पण त्यांच्या प्रेमाच्या ओल्याव्याची जाणीव मलाही झाली. ती परत आपल्या राजा बरोबर समुद्रांच्या लाटांवर खेळू लागली.
संध्याकाळ झाली. सूर्य देवता समुद्रांच्या सोनेरी लाटांत विलीन झाले. अद्भुत दृश्य होते ते. मी ही परत फिरलो. ती जलपरी सुद्धा पुन्हा एकदा काळ्या-बुरख्याचा कोशात सामावली होती. मनात एक प्रश्न उद्भवला, स्वत:च्या देशात गेल्यावर तिला जलपरी सारखं आपल्या राजाबरोबर समुद्राच्या लाटांबरोबर खेळता येईल का? पुरुषप्रधान समाजात महिलांच्या कित्येक इच्छा अपूर्णच राहतात. किंबहुना जलपरी होण्याचे स्वप्न कधीच पूर्ण होत नाही. कमीत-कमी तिच्या जवळ बालीची आठवण म्हणून फोटो तर राहतील.
— विवेक पटाईत
Leave a Reply