भारतीय कला प्रकार जगविख्यात बनवण्यासाठी , त्यांना प्रसिध्दीच्या शिखरावर नेण्यात अनेक धाडसी, चिकाटी, महत्वाकांक्षी तसंच थोर कलातपस्वींची अपार मेहनत कारणीभूत आहे. हाच नियम भारतीय संगीतासाठी ही लागु पडतो, कारण आपल्याकडे अशी अनेक वाद्य, शास्त्रीय वाद्य, शास्त्रीय गायनवाद्याचे ही प्रकार आहेत जे मूळ भारतीय मातीतलेच आहेत, पण विश्वात त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन जाण्यात अनेक संगीत विशारद आहेत. यामध्ये सनईवादक उस्ताद बिस्मीला खॉं असतील, बासरी वादक हरिप्रसाद चौरसिया, तबला उस्ताद झाकीर हुसेन अश्या मातब्बर कलाकारांचा समावेश होतो; पण अशी ही काही वाद्य आहेत जी सुरुवातीपासून बरीचशी उपेक्षित होती; पण त्यातही संगीताचे विविध राग, ताल यांची सुरेल निर्मिती करुनशास्त्रीय संगीत वाद्यप्रकारात समाविष्ट करण्यात आलंय. आणि असंच एक सुश्राव्य, नादमधुर वाद्य म्हणजेच “संतूर”.
सहसा फारसं चर्चेत नसणारं आणि अगदी अलिकडेच त्याची लोकप्रियता निर्माण झालेलं. खरंतर पं.शिवकुमार शर्मा यांनी संतूर या वाद्यप्रकाराला नावलौकिक मिळवून देऊन त्याला शास्त्रीय संगीताचा दर्जा प्राप्त करुन दिला.मग या क्षेत्रात करियरच्या ही अनेक संधी उपलब्ध झाल्या; अनेक तरुणांना आकृष्ट करण्यात या वाद्यानं यश मिळवलं , आणि देशाला अनेक नामवंत संतूरवादक दिले, या संतूरवाद्यापासून प्रेरणा घेत आणि त्याला आपलंस म्हणत ठाण्याचा गौरव देशमुख यानी या क्षेत्रात काहीतरी आगळं-वेगळं संगीत निर्मिती करण्याचं पाऊल उचललं ते पं.शिवकुमार शर्मा यांचाकडून प्रेरणा घेत; लहान असल्यापासूनच संगीताची विशेष आवड असलेल्या गौरवला संतूरची ओळख झाली ती आकाशवाणीवरील शास्त्रीय आणि ड़ाद्यसंगीताचे कार्यक्रम ऐकूनच. पण महाविद्यालयात असताना या वाद्याची गोडी आणखीन निर्माण झाली आणि सतीश व्यास यांचाकडून संतूरचं शास्त्रोक्त शिक्षण आणि मार्गदर्शन घेतलं; पुढे अनेक संतूर वादनाचे, शास्त्रीय संगीताचे विविधांगी कार्यक्रम ऐकून गौरव यांनी संतूर मध्ये संगीताची निर्मिती करुन स्वत:ची स्वतंत्रशैली निर्माण केली; कोकणी भाषेची उत्तम समज असलेल्या गौरवने, कोकणी गीत तसंच दुर्मीळ लोकसंगीतामध्ये “दादरा ताल”चा योग्य वापर करुन उपशास्त्रीय पध्दतीनं वादन केल्याचं ही तो सांगतो; एका विद्यालयात संतूर शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या गोरव देशमुखांना सतत नवीन प्रयोग संतूर मध्ये करायला आवडतात. तसं ते त्यांच्या विद्याथ्यांना ही आवर्जुन सांगतात; कारण जेवढे नवीन प्रयोग तितकीच त्या वाद्याची आणि संगीताची लोकप्रियता ही. यासाठी त्यांनी दाक्षिणात्य भाषा तिथलं संगीत त्याचबरोबर अरेबिक, पर्शियन, पोर्तुगिज अशा अनेक आंतरराष्ट्रीय भाषा आणि त्या देशातील संगीताचा अभ्यास करुन तशा पध्दतीचं, पण त्याला “गौरव टच”असेल असं अनोख शास्त्रीय संगीत त्यांना निर्माण करायचंय असा ही ते मानस व्यक्त करतात. ता क्षेत्रात जर का कारकीर्द घडवायची असेल तर प्रथमत: अनेक संगीत प्रकाराचं ज्ञान, त्याबरोबरच प्रयोगशीलता, कल्पकता आणि नवनिर्मितीची वृत्ती असायलाच पाहिजे, आणि या क्षेत्रात विशेषत: संतूरवादनात बराच ‘स्कोप’ आहे. कारण स्पर्धा कमी असल्यानं तरुणांनी या क्षेत्रात करियर करण्यास काहीच हरकत नाही, पण त्यासाठी याच क्षेत्रातल्या शिक्षकांकडून ज्ञानार्जन करावं तर ते भविष्यात ही तुम्हाला उपयोगी पडेल; २००७ पासून ते आत्तापर्यंत संतूरवादनाचे अनेक ”लाईव्ह परफॉर्मन्स”आणि विविध मंडळांमध्ये कार्यक्रम केल्यांचही ते सांगतात. यामध्ये औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, दापोली, सुरत अशा शहरांचा समावेश आहे. सह्याद्री वाहिनीच्या युवाचेतना मालिकेत ही मुलाखत आणि संतुरवादनाचा कार्यक्रम झाला आहे.
“सध्या रंगभूमीवर अनेक संगीत नाटकांची निर्मिती नव्यानं सुरु आहे,अशातच जर संतूरवर आधारीत एखाद्या व्यक्तीरेखेची भूमिका मिळाल्यास आणि नाटकांमध्ये, चित्रपटांमध्ये, संतूर वाद्याचा सुयोग्य वापर करुन, संगीतातही नवीन प्रयोग करायला आवडेल” असं ही ते उत्तरतात; शास्त्रीय संगीतात संतूर सारख्या कठीण वाद्याने लयबध्द संगीत निर्माण करणार्या गौरव देशमुखांचं संतूरवादन “भविष्यातही” गौरवपूर्ण असेल आणि राहील यात काहीच शंका नाही!
— सागर मालाडकर
Leave a Reply