एखादे बहुप्रतीक्षित आनंदी करणारे वृत्त (उदा. नव्या पुस्तकाचे प्रकाशन, किंवा हुकलेल्या नाट्यप्रयोगाची नवी तारीख जाहीर होणे, मित्रांचे स्नेहमेळावे) कानी आले की हर्षोल्हासाने मन क्षणिक अतिरेकाच्या प्रतिक्रियेपर्यंत जाऊन येते. थोड्या वेळाने लक्षात येते की आपलं आयुष्य त्यामुळे फारसे वेगळे झालेले नाहीए आणि बऱ्याचजणांनी त्या वृत्ताची (आपल्याला अभिप्रेत असलेली) साधी दखलही घेतलेली नाहीए. त्यांच्या दृष्टीने ती एक दैनंदिन,चाकोरीवाली घटना असू शकते.
बहुतांशी लोकांना मग असं जाणवतं की हा जो काही “मैलाचा दगड ” आपण साध्य केलाय तो तात्कालिक आहे आणि तो अपेक्षित असलेला टिकाऊ,स्थायी स्वरूपाचा आनंद देण्यास अक्षम आहे. “मंजिले और भी हैं ” टाईप हे फिलिंग असते. अशी मंडळी त्या क्षणावर जास्त वेळ न थांबता नवे ध्येय ठरवायला पुढे सरसावतात.
भलीथोरली आर्थिक खरेदी (कार, घर) केल्यावर झालेला आनंद याच जातकुळीतला असतो. सध्या APPRAISAL चे दिवस आहेत- पगारवाढ अथवा पदोन्नती असाच एक-दोन दिवस लांबीचा आनंद देऊन जाते आणि ” मा. प्र. पु . चा. ” !
नवी खरेदी अथवा कष्टसाध्य असं काहीही फक्त असे आनंदाचे बुडबुडे तयार करत असतात.
जागतिक किर्तीचा नेतृत्व प्रशिक्षक “मार्शल गोल्डस्मिथ ” यासाठी एक संज्ञा योजतो- ” हॅपी व्हेन —— ” ! कमावलेल्या आयुष्यात असे किती चिरस्थायी आनंद देणारे प्रसंग असतात?
आपला आनंद बाह्य गोष्टींवर अवलंबून नसतो. स्वतःसाठी भव्यदिव्य स्वप्ने, उद्दिष्ट्ये जरूर असावीत पण ती साध्य झाल्यावर आपल्या आनंदाची पातळी कायमची उंचावेल असा भाबडा विश्वास असू नये. हे “हॅपी व्हेन —– ” वाले बुडबुडे बऱ्याचवेळा बाह्य प्रमाण ठरू शकतात पण आयुष्यातील स्वतःच्या स्थानाबद्दल असलेल्या आंतरिक संवेदना बदलू शकत नाहीत.
आतला आनंद हा जीवनहेतूंच्या स्पष्ट असणाऱ्या संकल्पनांवर अवलंबून असतो आणि पादाक्रांत केलेल्या छोट्या-मोठ्या शिखरांवर, आकडेवारीवर नसतो.
पाश्चात्य भोगवादी,चंगळयुक्त संस्कृतीने, विशेषतः जाहिरातबाजीने आपल्या भिंगावर पुट चढवलंय –
आपल्याला काहीतरी मिळाले की मगच आपण आनंदी होतो. आपली स्वतंत्र, एकमेवाद्वितीय ओळख मग दुय्यम मानली जाते. स्वतःच्या नीतिमूल्यांशी आणि जीवनहेतूंशी सुसंगत असे ध्येय बाळगले तर चुकीच्या डोंगरमाथ्यावर चढल्यामुळे येणारे पोकळ, भकास संवेदन टाळता येईल.
साधा वातावरणातील, भवतालातील किरकोळ बदलही आनंददायी ठरू शकतो. आनंदाचा खरा कस अथवा पारख तेव्हाच होऊ शकते,जेव्हा बाह्य परिस्थिती न बदलताही मी माझ्या अंतर्गत जाणीवा बदलून “जैसे थे” व्यवस्थेत स्थिरावतो.
गांव, स्वप्नातले घर, नोकरी या साऱ्या गोष्टींचा शोध एका मर्यादेनंतर “प्रोफेशनल फँटसी ” बनू शकतो, त्यापेक्षा सध्याचे घर/गांव/नोकरी यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तरी आनंद वाढू शकतो.
“स्थितप्रज्ञता ” या संकल्पनेच्या मुळाशी हा एक विचार आहे. स्थितप्रज्ञता म्हणजे सगळ्या गोष्टी अपरिवर्तनीय अशा निसर्गनियमांनी बद्ध आणि नियंत्रित असतात. शहाणी माणसे याला आव्हान न देता, ते शांतपणे स्वीकारतात आणि सदाचरणाने मार्गक्रमण सुरु ठेवतात. स्थितप्रज्ञता म्हणजे वर्तमानाचा स्वीकार,विशेषतः जे बदलू शकतो त्यांवर लक्ष केंद्रित करणे.
त्यामुळे “हॅपी व्हेन ” ऐवजी “हॅपी नाऊ ” ही विचारसरणी चिरकाल आनंद देऊ शकेल. जे आहे त्याबद्दल कृतज्ञता आणि बाह्य बदल न करताही आनंदाची पातळी वाढविण्याचे प्रयत्न सुरु ठेवणे हे इष्ट !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply