पिंपळ हा पानझडी वृक्ष मोरेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव फायकस रिलिजिओसा आहे. पिंपळ मूळचा भारत, बांगला देश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि चीन या देशांतील आहे. वड व उंबर हे वृक्षदेखील मोरेसी कुलातील आहेत. मात्र पिंपळाला वडाप्रमाणे पारंब्या नसतात. भारतात हा वृक्ष अनेक गावांमध्ये मंदिराच्या आवारात तसेच पश्चिम बंगाल व मध्य प्रदेश येथील वनांमध्ये आढळून येतो. हिमालयाच्या उताराचा भाग, पंजाब, ओरिसा व कोलकोता येथे जास्त संख्येने आढळतो.
पिंपळ वृक्ष सुमारे ३० मी. उंच वाढतो. पाने साधी, एकाआड एक व हृदयाकृती असून टोकाला निमुळती असतात. पानांचे देठ लांब असून पाने लोंबती असतात आणि वाऱ्याबरोबर सतत हलणारी, सळसळणारी, डोळ्यांना, कानांना सुखावणारी असतात. उन्हाळ्यात पाने गळून पडतात. मात्र, त्याच वेळी नवीन पालवी येते. कोवळी पाने तांबूस तपकिरी असून ती नंतर हिरवी होतात. अग्रस्थ अंकुर, उपपर्णानी झाकलेला, उपपर्णे लांबट तांबूस-गुलाबी असतात. हिरव्या रंगाची फुले, अतिशय लहान आकाराच्या गडूसारखी दिसतात याचे पुष्पाशय (फळासारखा दिसणारा भाग) पानाचा देठ आणि फांदी यामध्ये आणि फांदीवर येतो. पुष्पाशय सुरुवातीला हिरवा तर नंतर जांभळा होतो. यामध्ये तीन पाकळ्यांची नरपुष्पे व पाच पाकळ्याची मादीपुष्पे असतात. यावर सतत कीटक बसतात. याची खरी फळे अतिशय लहान नळीच्या आकाराची असतात. ही पिकलेली फळे पक्ष्यांना खूप आवडतात. ही फळे पचण्यास कठीण असतात. न पचलेल्या फळांच्या बिया, पक्ष्यांच्या विष्ठेमार्फत इतरत्र पडून सहज उगवतात.
पिंपळाचे पौराणिक महत्व :
हा अलौकिक सामर्थ्याचा पवित्र वृक्ष आहे. वेद काळापासून हा वृक्ष पूजनीय आहे. पिंपळाला संस्कृत मद्धे अश्वत्थ असेहीं आहे. अश्वत्थ या शब्दाचा अर्थ संस्कृत मद्धे पुढील प्रमाणे होतो, “पुढील क्षणात जो पूर्ववत राहत नाही तो “( अ = नाही, श्व = येणार काळ , त्थ = स्थिर)” प्रथम हा वृक्ष प्रजापतीचे प्रतिक मानले जाई. परंतु नंतर विष्णूचे प्रतिक मानले गेले. भगवान विष्णूचा जन्म या झाडाखाली झाला असे पुराणात लिहिले आहे. या वृक्षाला दैवी महत्व आहे. भगवान श्री कृष्ण या झाडाखाली बसले असताना व्याधाचा बाण लागून निजधामास गेले असा उल्लेख आहे.
स्कंद पुराणात पिंपळाच्या झाडाबाबत,
मूले विष्णु: स्थितो नित्यं स्कन्धे केशव एव च।
नारायणस्तु शारवासु पत्रेषु भगवान् हरि:।।
फलेऽच्युतो न सन्देह: सर्वदेवै: समन्व स एवं ष्णिुद्र्रुम एव मूर्तो महात्मभि: सेवितपुण्यमूल:।
यस्याश्रय: पापसहस्त्रहन्ता भवेन्नृणां कामदुघो गुणाढ्य:।।
असे सांगितले आहे.
अर्थात, पिंपळाच्या मुळामध्ये भगवान विष्णू, केशव, फांद्यांमध्ये नारायण, पानांमध्ये देव हरि आणि फळांमध्ये सर्व देवतांचा वास असतो.
जसे वटवृक्ष हा शंकराचे रूप मानले जाते तसे पिंपळ हे श्रीकृष्णाचे पर्यायाने श्री विष्णूचे रूप मानले आहे. म्हणून पिंपळ हेच भगवान विष्णूचे एकमेव रूप आहे आणि जेथे भगवान विष्णू असतील, तेथे लक्ष्मी असेल.
भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, सर्व वृक्षांमद्धे मी अश्वत्थ आहे.
अश्वथ: सर्ववृक्षाणां देवर्षियाच नारद: ।
गंधर्वाणाम चित्ररथ: सिद्धानां कपिलो मुनी: ।। (भगवद्गीता अ.१० श्लोक २६)
या वृक्षाला भरपूर आयुष्य असते म्हणून याला ‘अक्षय’ वृक्ष असे म्हणतात. म्हणून पिंपळाची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो व सर्व कार्ये पूर्ण होतात
पिंपळाचे आध्यात्मिक महत्व :
पिंपळाला भारतीय समाजात मानाचे व पूजनीय स्थान आहे. हिंदू संस्कृतीत, ज्या वृक्षांना ‘तोडू नये’ असा दंडक आहे, त्यापैकी हा एक. अश्वत्थ मारुतीचे (पिंपळाखाली असलेल्या मारुतीचे) मारुतीचे पूजन हितकारी, पुण्यकारक म्हणून वर्णिले आहे. श्रावण महिन्यातील शनिवारी पिंपळाची पूजा करतात. पिंपळ हा पुष्य नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.
या वृक्षाखाली बसले असताना गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या विशिष्ट वृक्षाला बोधिवृक्ष म्हणजेच ‘ज्ञानाचा वृक्ष’ म्हटले जाते. हा वृक्ष बिहारमधील बोधगया येथे आहे.
बोधिवृक्ष किंवा महाबोधी वृक्ष म्हणजेच ‘ज्ञानाचा वृक्ष’ होय. बोधगया येथील महाबोधी विहाराच्या पश्चिमेला जो पिंपळ आहे, तोच महाबोधी वृक्ष या नावाने प्रसिद्ध आहे. या पिंपळाच्या वृक्षाखाली सिद्धार्थाला इ.स.पू. ५२८ मध्ये वयाच्या ३५ व्या वर्षी संबोधी (ज्ञान/बुद्धत्व) प्राप्ती होऊन ते बुद्ध बनले, तेव्हापासून पिंपळांच्या झाडाला बोधिवृक्ष संबोधिण्यात येते. ज्या स्थानी बुद्धांना संबोधी प्राप्त झाली, त्या जागी वज्रासनाचे प्रतीक म्हणून एक विस्तीर्ण लाल शिलाखंड एका चबुतऱ्यावर बसवलेला आहे. सम्राट अशोक बुद्धांचा अनुयायी झाला व नित्यनियमाने बोधिवृक्षाचे दर्शन घेऊ लागला. चिनी प्रवासी झ्यूझांग यांने बोधिवृक्षाबाबत विस्ताराने लिहिले आहे. परंतु जेव्हा जेव्हा बोधिवृक्ष तोडला गेला तेव्हा प्रत्येक वेळी नवा बोधिवृक्ष त्याठिकाणी लावला गेला.[१]
बौद्ध धर्मीय या वृक्षाला अतिशय पवित्र मानतात व त्याची पूजा करतात. भारहूत व बोधगया येथील शिल्पकामात गजराज (हत्ती) हे बोधिवृक्षाची पूजा करीत आहेत अशी चित्रे कोरलेली दिसतात. गया माहात्म्य, अग्नी पुराण, वायू पुराण इ. ग्रंथात बोधगया व बोधिवृक्ष यांचा पुष्कळ महिमा गायलेला आहे. इ.स. १८६२ मध्ये ब्रिटिश पुरातत्त्व अधिकारी अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या पहिल्या खंडामध्ये याची प्रथम नोंद घेतली.
प्रख्यात बोधिवृक्ष आजही अस्तित्वात आहे. परंतु त्याचा पुष्कळसा ऱ्हास झालेला आहे; एक मोठे खोड, पश्चिमेकडील तीन फांद्या, अजूनही हिरव्या आहेत, परंतु अन्य फांद्या सालीसह वाळल्या आहेत. त्या हिरव्या फांद्या कदाचित् मूळ बोधिवृक्षाच्या असाव्यात, कारण तेथे असंख्य एकत्रित खोडे उघडपणे दिसतात. बोधिवृक्षाचे नियमितपणे निश्चित पुनरुजीवन झाले आहे. सध्याचा पिंपळ आजूबाजूच्या परिसरापेक्षा ३० फूट उंच ओट्यावर आहे. इ.स. १८११ मध्ये बोधिवृक्ष पूर्ण चैतन्याने बहरलेला होता.
आळंदीला श्री ज्ञानदेव माउली यांच्या समाधीसमोरच स्थान प्राप्त झालेल्या पिंपळ वृक्षाला ” जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ ” असे नावाजले आहे. त्याचे महत्व ज्ञानेश्वरीच्या टीकाकारांनी त्याचे सुंदर वर्णन करून अधोरेखीत केले आहे.
भगवंताच्या आरंभ व अंताचा साक्षीदार असणाऱ्या या वृक्षाचे भारतीय संस्कृतीत शतकानुशतके असलेले आध्यात्मिक महत्व म्हणूनच वादातीत आहे.
पिंपळाचे पर्यावरणीय महत्व:
आजकालच्या कोरोना महामारीच्या भाषेत बोलायचे झाले तर पिंपळ हा वृक्ष ऑक्सिजनचा न संपणारा सिलिंडर आहे. दिवसा व रात्री दोन्ही वेळा हा वृक्ष हवेत प्राणवायू सोडतो हे याचे खास विशेश आहे. ज्या घराजवळ पिंपळ आहे त्याच्या घरी कोणी आजारी पडण्याची शक्यता खूपच कमी असते, कारण हा वृक्ष आजूबाजूची हवा स्वच्छ ठेवतो.
त्याच्या डेरेदार वृक्षाची फळे अनेक पक्षांना आकर्षित करतात. बहुतेक पक्षांची घरटी तेथे असतात कारण हा वृक्ष तोडणे हे हिंदू धर्मात पाप समजले जाते. त्यामुळे पक्षांना पूर्ण संरक्षण मिळते. त्याच्या डेरेदार झाडाखाली थांबून पांथस्थांना भरपूर ऑक्सिजन मिळतो व ते उत्साही होऊन पुढील मार्गास प्रस्थान करतात.
पिंपळाचे उपयोग व आयुर्वेदिक गुणधर्म:
हा वृक्ष अतिशय औषधी असून दमेकरी लोकांना हा वृक्ष कामधेनु सारखा आहे. या झाडाचा प्रत्येक भाग औषधी आहे. पिंपळ बुद्धीवर्धक, शक्तिवर्धक, रक्तशुद्धीकारक आणि रोगनाशक आहे. पोटाच्या विकारापासून दम्यासारख्या असाध्य विकारांमध्ये हा वृक्ष गुणकारी आहे.
या झाडाच्या सालीचे चूर्ण पाण्यात चांगले उकळवून त्याचा चहा नियमित घेतल्यास शक्तिवर्धक व रक्तदोष दूर करणारा आहे. अंगाला खाज, पुरळ, त्वचा काळी होणे अश्या विकारात हा काढा उपयुक्त आहे. कडुलिंबाच्या तेलात या सालीचे चूर्ण मिसळून केलेले मलम त्वचा रोगात बाह्य उपचारासाठी अतिशय गुणकारी आहे.
संतान प्राप्तीसाठी या झाडाची कोवळी पाने किंवा सुक्या फळांचे चूर्ण घेतात. वसंत ऋतूत येणारी ताजी फळे खाल्यास स्मरणशक्ती वाढते. मानसिक श्रम करणार्या व्यक्ती आणि आणि विद्यार्थ्यांना हि फळे गुणकारी आहेत.
अशक्त माणसाने नियमित पणे पिंपळाला प्रदक्षिणा घातल्यास त्याचे आरोग्य सुधारते कारण त्याला भरपूर शुद्ध हवेचा पुरवठा होतो. लहान मुलांची वाचा सुधारावी किंवा बोलण्यातील तोतरेपणा कमी व्हावा म्हणून या झाडाची पिकलेली फळे खाण्यास देतात. तसेच या झाडाच्या पानाच्या पत्रावळीवर गरम भात, तूप आणि मीठ कालवून मुलांना खायला देतात. या वृक्षाच्या सहवासात राहिल्यास मानसिक बल प्राप्त होते. असा हा महान वृक्ष भारत आणि श्रीलंकेत सापडतो. हा वृक्ष गावात, रानात सर्व ठिकाणी आढळतो आणि खूप वर्ष जगतो. श्रीलंकेतील एक झाड २००० वर्षापूर्वीचे जुने आहे. प्राण्यांमध्ये बुद्धिवान समजल्या जाणार्या हत्तीला या झाडाची पाने खूप आवडतात.
पिंपळवृक्षाचे औषधी गुणधर्म
पिंपळ हा भारतात सर्वत्र आढळणारा वृक्ष, बोधी वृक्ष या नावानेही ओळखला जातो. कारण भगवान बुद्धाना ज्ञानाची प्राप्ती पिंपळ वृक्षाखालीच झाली होती. हा वृक्ष केवळ हवा शुद्ध करणारा नाही तर त्यात अनेक औषधी गुणधर्मही आहेत. आयुर्वेदातील अनेक औषधे यापासून बनतात तसेच हा वृक्ष दिवसा व रात्रीही ऑक्सिजन वायूच बाहेर टाकतो त्यामुळे हवेचे शुद्दीकरण होत राहते. अनेक प्रकारच्या व्याधी दूर करण्यासाठी पिंपळाची पाने, साल वापरली जाते.
हृदय विकारापासून दूर राहण्यासाठी पिंपळाची ताजी १० ते १५ पाने १ ग्लास पाण्यात उकळून ते मिश्रण एक तृतीयांश होईपर्यंत आटवावे. नंतर ते गाळून गार झाल्यावर तीन सम भागात सकाळच्या वेळात दर तीन तासांनी घ्यावे. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.
दांत मजबूत व पांढरे शुभ्र दिसण्यासाठी पिंपळ सालाची राखुंडी बनवून वापरावी. त्यासाठी १० ग्रॅम साल, कात व २ ग्रॅम काळी मिरी एकत्र करून त्याची बारीक पूड करावी व हे मंजन वापरून दात घासावेत. दात मजबूत हेातील. पिंपळाच्या पानांचा रस कावीळीवर उपयुक्त आहे.
ज्यांना दमा, अस्थमाचा त्रास आहे त्यांनी पिंपळाच्या सालीच्या आतला गाभा काढून वाळवावा. त्यानंतर त्याचे बारीक चूर्ण करून पाण्यासोबत घेतल्याने दम्याचा त्रास कमी होतो. त्याचबरोबर हवा बदलल्याने होणारी सर्दी, खोकला, पडसे यावर पिंपळाची ५ पाने दुधात उकळून ते साखरेसह सकाळ सायंकाळ घ्यावे.
मधुमेहासाठी फायदेशीर : पिंपळाची पानं मधुमेह नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरतात. पिंपळाच्या पानांचा रस रक्तातील साखरेची पातळी कमी करतात. पिंपळाची पानं इन्सुलिन आणि ग्लुकोज वापरण्याची शरीराची क्षमता वेगाने ऊर्जेमध्ये बदलतात.
अतिसारापासून त्वरित आराम
पिंपळाची पानं अतिसारावर उपचार करण्यास देखील मदत करतात.
आयुर्वेदानुसार पिंपळाच्या झाडाचा प्रत्येक भाग म्हणजे बी, साल, पानं आणि फळं औषधी गुणांनी परिपूर्ण आहेत.
कावीळची लक्षणं कमी करतं : कावीळची लक्षणं कमी करण्यासाठी पिंपळाची पानं उपयुक्त ठरू शकतात. यासाठी पिंपळाची पानं आणि खडीसारख यांचा रस बनवा. आपण दिवसातून 2-3 वेळा हा रस पिऊ शकता.
बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी : बद्धकोष्ठतेमुळे मूळव्याधसारख्या इतर अनेक समस्या उद्भवतात. पिंपळाची पानं पाचन तंत्रास योग्य प्रकारे मदत करण्यासाठी वापरली जाऊ शकतात. दूधात या पानांची पावडर,
गूळ आणि बडीशेप पावडर मिसळा. झोपण्यापूर्वी हे दूध प्या. यामुळे बद्धकोष्ठता दूर होईल
साप चावल्यावर : विषारी साप चावल्यावर पिंपळाच्या कोवळ्या पानांचा रस दोन थेंब घ्या आणि त्याची पाने चावून खा. त्यामुळे विषाचा असर कमी होण्यास मदत होईल.
तर असा हा पिंपळ वृक्ष आपल्या लहान पणी पासून चा मित्र आहे, कारण ज्याने लहानपणी पिंपळाच्या पानाला वहीत ठेऊन त्याची जाळी केली नाही असा विध्यार्थी विरळाच.
— डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
संदर्भ :
१. विकिपीडिया
२. मोहन, व्ही. के., पराशरामी, वर्षा., (२०१७): “Peepal – A divine tree” पुस्तक. प्रकाशक, ग्रीन पब्लिकेशन, बाणेर, पुणे.
पाने: १-२०४
३. इंटरनेट वरील या विषयाचे बरेच लेख.
३. इंटरनेट वरील या विषयाचे बरेच लेख.
सद्य स्थितीच्या संदर्भात हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष, भाग 2- पिंपळ
Leave a Reply